Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

पद्मसिंह पाटील अखेर निलंबित
राष्ट्रवादीच्या स्थापनादिनीच सर्वात कटू निर्णय..
नवी दिल्ली, १० जून/खास प्रतिनिधी
दहावा स्थापनादिन साजरा करीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आज आपल्या दहा वर्षांंच्या वाटचालीतील सर्वात कटु निर्णय घेण्याची वेळ आली. काँग्रेसनेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या आरोपाखाली सीबीआय कोठडीत असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते व उस्मानाबादचे नवनिर्वाचित खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला नाईलाजाने जाहीर करावे लागले.

अण्णा हजारेंची भीती आणि पक्षांतर्गत दबावामुळेच कारवाई
मुंबई, १० जून / खास प्रतिनिधी

खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांची पाठराखण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने अवघ्या २४ तासांमध्ये आपल्या भूमिकेत बदल करून त्यांना पक्षातून निलंबित केले. पक्षाने कारवाई न केल्यास त्याचा विधानसभा निवडणुकीत फटका बसेल, असे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि अजितदादा पवार यांनी पवारांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यात याच मुद्दय़ावर भर दिला जाईल ही भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना होती.

दहावी-बारावीचा निकाल यापुढे विभागवार जाहीर करणार?
आशिष पेंडसे
पुणे, १० जून

केंद्रीय मंडळांच्या तुलनेत महाराष्ट्रात दहावी-बारावीचा निकाल जाहीर करण्यास विलंब होत असल्याची समाजभावना लक्षात घेऊन यापुढील काळात तो विभागीय मंडळनिहाय जाहीर करण्याचा विचार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विचाराधीन आहे. मुंबईतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमुळे संपूर्ण राज्याचा दहावीचा निकाल ‘ऑफलाइन’ ठेवण्यात आला आहे, असा आरोप केला जात असताना मंडळाचा हा प्रस्ताव निश्चितच व्यवहार्य ठरण्याची शक्यता आहे.

पवनचक्की जमीन घोटाळा
ऐश्वर्या, सचिन, अमरसिंह यांच्या जमीनखरेदीची चौकशी
मुंबई, १० जून/प्रतिनिधी
राज्यातील धुळे, नंदूरबार, नाशिक, सांगली, सातारा या जिल्ह्यांमधील पवनचक्क्यांसाठी संपादित केलेल्या जमिनींचा स्थानिक शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नसून या ठिकाणी ऐश्वर्या राय, ट्विंकल खन्ना, अमर सिंग, सचिन तेंडुलकर यांनीही जमिनी घेतल्या असल्याचा मुद्दा आज विधान परिषदेत चर्चेला आला. त्यावर अखेर अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी एका निवृत्त सचिव व महसूल आणि अपारंपरिक ऊर्जा खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव या तीनजणांच्या समितीतर्फे केली जाईल, असे सांगितले.

‘उद्धव यांनी शिवसेनेचा इतिहास तपासून पहावा’
मुंबई, १० जून/ खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पद्मसिंह पाटील यांना पवनराजे निंबाळकर खून प्रकरणी अटक झाल्याच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचा इतिहास काढणाऱ्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा इतिहास प्रथम तपासून पाहावा. यात कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई व खोपकर यांच्या हत्येसह अनेक ऐतिहासिक दाखले त्यांना पाहावयास मिळतील, असा टोला उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज लगावला.

आर्यलड अडचणीत झहीर खानचे चार बळी
ट्रेन्ट ब्रिज, १० जून / वृत्तसंस्था

डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खानने आपल्या दर्जाला साजेशी गोलंदाजी करताना आयर्लंडचे चार फलंदाज झटपट तंबूत धाडत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील साखळीतील अखेरच्या सामन्यात आयर्लंडला चांगलेच अडचणीत आणले. आयर्लंडने तरीही शतकाचा टप्पा ओलांडत ८ बाद ११२ अशी मजल मारली. झहीरने पोर्टरफिल्ड (५), ब्रे (०), बोथा (१९) या आघाडीच्या फलंदाजांना माघारी धाडत आयर्लंडच्या आव्हानातली हवाच काढून टाकली.

एक्स्प्रेस इन्व्हेस्टिगेशन
अतिरेकी वाटाघाटींसाठी तयार होते, पण..
शिशिर गुप्ता, श्वेता देसाई, सागनिक चौधरी
नवी दिल्ली, मुंबई,१० जून

मुंबईवर हल्ला करण्यासाठी लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांना आत्मघाती मोहिमेवर पाठविण्यात आले असल्याचे दिसत असले तरी ओलीस ठेवलेल्यांचा वापर करून आपल्या पदरी काही पाडून घेण्यासाठी अतिरेकी वाटाघाटीसाठी तयार असल्याचे संकेतही मिळत होते. मात्र हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात गुंतलेले मुंबई पोलीस वा केंद्रीय सुरक्षा रक्षकांकडून ओलिसांचे प्राण वाचण्यासाठी वाटाघाटीच्या मार्गाचा हत्यार म्हणून वापरण्याचाही प्रयत्न केला गेला नाही. प्रत्यक्षात राज्याचे पोलीस महासंचालक ए. एन. रॉय यांनी हल्ला झाल्यानंतर पहिल्या सहा तासांतच अतिरेक्यांशी कुठल्याही परिस्थितीत वाटाघाटी केल्या जाणार नाहीत, असे जाहीर करून अतिरेक्यांविरुद्धच्या कडक कारवाईचे सूतोवाच केले होते. वाटाघाटीसंदर्भात कुठलीही योजना तयार नसल्याचेही त्यावरून स्पष्ट झाले. वास्तविक अतिरेकी हल्ल्याच्या वेळी अतिरेक्यांशी वाटाघाटी कशा कराव्यात याचे अमेरिकेत जाऊन खास प्रशिक्षण घेतलेले दोन आयपीएस अधिकारी मुंबई पोलीस दलात असतानाही तसेच विमानतळावर अशाच प्रकारचे पथक तैनात असतानाही त्याचा वापर करून न घेण्यामागे हल्ल्यामुळे किती धक्का बसला आणि धोरण कसे फसले याचे उत्तम उदाहरण आहे.( उर्वरित वृत्त )

हवाई दलाचे कोसळलेले विमान व १३ जवानांचे मृतदेह सापडले
इटानगर, १० जून/वृत्तसंस्था
तब्बल २४ तासांच्या शोधानंतर अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग जिल्'ाातील एका खेडय़ालगत आज हवाईदलाच्या कोसळलेल्या विमानाचे अवशेष तसेच १३ जवानांचे मृतदेह हाती लागले आहेत. हवाईदलाचे एएन-३२ हे मालवाहू विमान काल दुपारी भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत हेयो खेडय़ाजवळच्या रिंची पर्वतराजीत कोसळले होते. या विमानात हवाईदलाचे सात आणि लष्कराचे सहा जवान होते. त्यात दोन विंग कमांडर आणि दोन स्क्व्ॉड्रन लीडर आणि एक लेफ्टनंट यांचा समावेश होता. काल सकाळी हे विमान मेचुका तळावर उतरले होते. तिथून ते आसामातील मोहनबाडी येथे निघाले होते. दुपारी दोननंतर मात्र रडारवरून ते गायब झाले होते. या गावालगतच्या लोकांनी मोठा आवाज ऐकल्याचे व दूरवरच्या डोंगरातून मोठा धूर निघाल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार शोधपथकाने या भागावर लक्ष केंद्रित केले होते. या मोहिमेत विमानाचे अवशेष आणि जवानांचे मृतदेह शोधण्यात यश आले.

‘सीईटी’ निकाल येत्या रविवारी
पुणे, १० जून/खास प्रतिनिधी

अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या सामयिक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल येत्या रविवारी (दि. १४) सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येणार आहे.राज्यभरातील सुमारे अडीच लाख विद्यार्थी ‘सीईटी’साठी बसले होते. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक वासुदेव तायडे यांनी निकालाबाबत माहिती दिली. ५८ वैद्यकीय महाविद्यालयांमधील तीन हजार ७८५ जागा, २२१ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील ७१ हजार ७०१ जागा आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या १३१ महाविद्यालयांमधील सात हजार ६७५ जागांवर या ‘सीईटी’च्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहेत.‘सीईटी’चा निकाल १४ जूनपूर्वी जाहीर करण्यात येईल, असे प्रवेश समितीच्या संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, आतापर्यंत निकालाची तारीख अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आली नव्हती. या पाश्र्वभूमीवर विद्यार्थी-पालकांमध्ये असलेला संभ्रम आता दूर झाला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया www.dte.org.in या संकेतस्थळावर तपशीलवार उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी