Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

परभणी जिल्हा बँक निवडणूक : आमदार बाबाजानीसह अनेकांचे अर्ज अवैध
आमदार बोर्डीकर, नखाते, चोखट, शिवाजी माने बिनविरोध
परभणी, १० जून/वार्ताहर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत २६ संचालकांच्या जागांसाठी भरण्यात आलेल्या २३१ उमेदवारी अर्जापैकी तब्बल निम्मे अर्ज अवैध ठरले असून त्यात आमदार बाबाजानी, माजी आमदार व्यंकटराव कदम आदींसह अनेक मान्यवरांना फटका बसला आहे,

नांदेडच्या १४ इंग्रजी शाळांना ‘कारणे दाखवा’ नोटीस!
नांदेड, १० जून/वार्ताहर

‘हम करे सो कायदा’ च्या अविर्भावात शासनाचे नियम पायदळी तुडवत पालकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या नांदेड शहरातल्या १४ इंग्रजी शाळांना शिक्षण विभागाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. शिक्षणाधिकारी वैजनाथ खांडके यांनी बजावलेल्या या नोटिसीमुळे एकच खळबळ उडाली असली तरी अद्याप एकाही शाळेने त्याचा खुलासा केलेला नाही.

गावभंडारा
पूर्वी गावात गावभंडारं होत असत. गावोगाव यात्रा-जत्रा भरत. या गावजत्रांच्या अखेरी गावभंडारा व्हायचा. या गावभंडाऱ्यात सारा गाव सहभागी व्हायचा. यात वतनदार, बिचायती लोक, बारा बलुतेदार गाव अन् गावकुसाबाहेरचा सारा गावसमाज एक व्हायचा. आपापल्या ऐपतीनुसार या गावभंडाऱ्यात बेगमी टाकली जायची. वर खर्चासाठी वर्गणी जमा व्हायची. याद्या तयार व्हायच्या. आपखुशीनं माणसं मोकळ्या हाताने ‘हातभार’ लावायची. घरटी पायली- आखा गहू जमायचा. गुळाच्या ढेपी चावडीत लागायच्या.

लंडनच्या डॉ. मेधा सकपाळ यांची बारगजे यांच्या ‘इन्फन्ट इंडिया’ ला मदत
बीड, १० जून/वार्ताहर

जन्मत:च एड्सची बाधा झालेल्या बालकांना आपल्या कुटुंबात सामावून घेत त्यांच्या जीवनात काही काळ उष:काल उगवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दत्ता बारगजे यांच्याविषयी ‘लोकसत्ता’मधून प्रसिद्ध झालेले वृत्त संकेतस्थळावरून वाचल्यानंतर लंडनच्या डॉ. मेधा सकपाळ यांनी दखल घेऊन मुलांसाठी खास आयुर्वेदिक औषधे हवाईमार्गे रवाना केली.

माजी सैनिकाची होतेय पेन्शनसाठी परवड!
प्रदीप नणंदकर
लातूर, १० जून

१९६५ साली भारत-पाकिस्तानच्या युद्धात युद्धभूमीवर लढलेल्या लान्सनायक नागनाथ सावळा कदम यांना सप्टेंबर १९६६ मध्ये पाय मोडल्याच्या कारणावरून निवृत्त व्हावे लागले. मात्र त्यानंतर आजतागायत पेन्शन मिळण्यासाठी त्यांचे पत्रव्यवहार सुरूच आहेत. नागनाथ कदम यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४२ चा. सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शीजवळील कारीगावचे ते रहिवासी.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यासह दोघांच्या विभागीय चौकशीचे आदेश
अविवाहित तरुणावर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया
उस्मानाबाद, १० जून/वार्ताहर
अविवाहित अमोल सूर्यभान पंडागळे या २९ वर्षे वयाच्या तरुणाची दारू पाजून शस्त्रक्रिया केल्या प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एम. साळुंके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आऊलवार यांची विभागीय चौकशी व या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवर्तक परिचारिका एस. एम. दणाने यांना निलंबीत अथवा बडतर्फ करण्याची शिफारस आरोग्य उपसंचालकांनी केली आहे.

जयप्रकाश दगडे यांना पत्रकारभूषण पुरस्कार
लातूर, १० जून/वार्ताहर
महाराष्ट्र राज्य मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई या संस्थेच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा पत्रकारभूषण पुरस्कार पत्रकार जयप्रकाश दगडे यांना घोषित झाला आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी मुंबईत ही घोषणा केली. आपल्या आदर्श योगदानातून समाजजीवन समृद्ध करणाऱ्या पत्रकारांना संघातर्फे प्रतिवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या भूमिकेतून संघाचे मानद सल्लागार यशवंत पाध्ये यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारासाठी जयप्रकाश दगडे यांची निवड केली आहे. येत्या २० जूनला मुंबईला होणाऱ्या संघाच्या दशकपूर्ती सोहळ्यात श्री. दगडे यांना सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ स्वरूपात हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे शासनाचे लाखो रुपये वाचले
भोकर, १० जून /वार्ताहर
येथील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या पाहणीमुळे बोगस विहिर अधिग्रहणाने हजारो रुपये गिळंकृत करणाऱ्यांचे मनसुबे यंदा धुळीस मिळाले असून, या अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे शासनाचे लाखो रुपये वाचले.भोकर तालुक्यात पाणीटंचाईमुळे विहिर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा करून तात्पुरती तहान भागविली जाते. ग्रामपंचायतीद्वारे विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठवून लाखो रुपयांचा भरूदड शासनावर टाकला जातो. परंतु यावर्षी तहसीलदार के. बी. जक्कल व गटविकास अधिकारी निमेकर यांनी गावनिहाय संयुक्त दौरा करून विहिर अधिग्रहणाची स्थळपाहणी केली.या वेळी अनेक गावांत बोगस विहिर अधिग्रहणाचे ठराव आढळल्याने मंजुरी तहसीलदारांनी नाकारली. यामुळे यावर्षी केवळ ३९ विहिर अधिग्रहणालाच मंजुरी देण्यात आली. गतवर्षी १२३ विहिर अधिग्रहण करण्यात आले होते.

नांदेडमध्ये शिक्षकांच्या आज समुपदेशनाद्वारे बदल्या
नांदेड, १० जून / वार्ताहर
प्राथमिक शिक्षकांच्या उद्या (११ जून) समुपदेशनाद्वारे बदल्या होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.बदल्यांना शासनाने यंदा स्थगिती देऊन १५ जूनपर्यंत विनंती बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज बांधकाम, कृषी, आरोग्य व पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्या झाल्या.मात्र, शिक्षकांच्या बदल्या होण्याबाबत शिक्षक संघटना साशंक होत्या. समुपदेशनद्वारे बदल्या होवू नयेत यासाठी काही सदस्य प्रयत्नशील होते, परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी गतवर्षीप्रमाण शिक्षकांच्या बदल्याही समुपदेशनाद्वारेच करण्याची भूमिका घेतली. आज सकाळी दहा वाजता ज्या शिक्षकांनी विनंती केली अशांना बोलावण्यात आले आहे. विनंती अर्जात सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन उपलब्ध रिक्तपदी बदली करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.

मुळी ग्रामपंचायत स्वच्छतेत प्रथम
गंगाखेड, १० जून / वार्ताहर
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत गावपातळीवरील स्वच्छता अभियानात मुळी ग्रामपंचायतने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावीत अडीच हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले आहे. मुळी ग्रामपंचायतीचे सरपंच माणिकराव पवार, ग्रामसेवक राहुल मानोलीकर, उपसरपंच नारायण भोसले, स्वच्छता समिती अभियान अध्यक्ष नारायण भोसले आदींच्या विशेष प्रयत्नातून ग्रामपंचायतीने २००७-०८ मध्ये स्वच्छतेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे या ग्रामपंचायतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल पंचायत समितीचे सभापती राजेश फड, गटविकास अधिकारी मंजुषा कापसे आदींनी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे.

गंगाखेडच्या पेट्रोल पंपावर भेसळ असल्याची तक्रार
गंगाखेड, १० जून / वार्ताहर
गंगाखेड शहरानजीकच्या परळी रस्त्यावरील तोष्णीवाल सवरे केअर या पेट्रोल पंपावर सर्रास पेट्रोलमध्ये रॉकेलची भेसळ होत आहे. मात्र तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागास वारंवार कळवूनही प्रशासन पंपचालकाविरुद्ध कारवाई करीत नसल्याने लवकरच आमरण उपोषण करण्याचे निवेदन रिपाइंचे (आठवले गट) तालुका सरचिटणीस दिनबंधू हत्तीअंबिरे यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.शहरानजीकच्या परळी रस्त्यावरील तोष्णीवाल सवरे केअरमध्ये पेट्रोलमध्ये रॉकेलची भेसळ होत आहे. यासंबंधी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार (पुरवठा) चव्हाण तसेच तत्कालिन तहसीलदार श्री. कदम यांना वारंवार निवेदन देऊन कारवाईत तसेच पेट्रोलचे नमुने तपासणीसाठी घेण्यास टाळाटाळ केली जाते, अशी तक्रार दिनबंधू हत्तीअंबिरे, नामदेव साठे, किशन रायभोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
गेवराई, १० जून / वार्ताहर
दुचाकी घेण्यासाठी माहेराहून पैसे घेऊन येत नाही म्हणून होत असलेल्या त्रासास कंटाळून विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.रेणुका नंदकिशोर धुर्वे (रा. खेर्डा बु.) या विवाहितेस सासरच्या मंडळींनी दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पन्नास हजार रुपये आण म्हणून तगादा लावला होता. त्याकरीता ते तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून रेणुका (वय २०) हिने सोमवारी (दि. ८) विषारी औषध प्राशन केले. बीड येथे उपचारार्थ जात असताना तिचा मृत्यू झाला. रेणुकाचा भाऊ महादेव भगवान बटुळे (रा. हनुमान घाट, जालना) यांच्या फिर्यादीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात पती नंदकिशोर, सासरा रघुनाथ धुर्ले, सासू कस्तुराबाई, दीर परमेश्वर, त्र्यंबक व गोपीचंद धुर्वे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांसाठी बसफेऱ्या वाढविण्याची गरज
परतूर, १० जून / वार्ताहर

ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी येथील आगारातून ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी होत आहे.येत्या सोमवारपासून (१५ जून) शालेय शैक्षणिक सत्राला प्रारंभ होत आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी परतूरला येतात. मुलींना शासनातर्फे बसचा पास मोफत दिला जातो. परंतु, परतूरला येण्यासाठी ग्रामीण भागातून बसफेऱ्या अत्यंत कमी आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात वेळेत पोहोचता येत नाही. तसेच सायंकाळपर्यंत गावाकडे जाण्यासाठी वेळेवर बस उपलब्ध नसते. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. एस. टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेऊन ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी आहे.

वाहतुकीच्या नियमाने अपघात टळतो-कोळेकर
लोहा, १० जून / वार्ताहर

वाहतूक व रहदारीचे नियम वाहनधारकांनी व पादचाऱ्यांनी पाळले तर अपघात टाळता येतो, असे प्रतिपादन लोह्य़ाचे पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी केले.पुनर्रचित अभ्यासक्रमांतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिरात ‘वाहतुकीचे नियम व अपघात’ या विषयावर पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे. आय. शिंदे तर प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षणाधिकारी एम. आर. राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी बोडसकर उपस्थित होते. श्री. कोळेकर म्हणाले की, वाहतुकीचे नियम व पालन करायला हवे. वाहनधारकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये. विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम माहीत असायला हवेत. वाढत्या अपघातांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. अपघात टाळता येतात त्यासाठी वाहनांचा वेग आणि नियमाचे पालन करायला हवे. प्रास्ताविक साधनव्यक्ती संजय मक्तेदार यांनी केले. याप्रसंगी मोठय़ा संख्येने प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते. आभार श्रीमती पेनूरकर यांनी मानले.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा विकास साधावा - डॉ. गोरे
लातूर, १० जून / वार्ताहर

शिक्षक हा ज्ञानी, पारंगत व चतुरस्र असावा, तो संभाषण कलेत निपुण असावा. तसेच, त्याने विद्यार्थ्यांचा विकास साधणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांनी केले.संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित सेवापूर्व प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. आर. पाटील होते. प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ८ जून ते १३ जून या कालावधीत केले आहे.डॉ. गोरे म्हणाले, प्राध्यापकाने भरपूर तयारी करावी व पाठाचे व्यवस्थित नियोजन करावे. विविध कौशल्ये वापरून अध्यापन आनंददायी करणे गरजेचे आहे. प्रास्ताविक प्रा. संभाजी सांगळे यांनी, तर आभार प्रा. एन. टी. खान यांनी मानले.

वीज कामगार महासंघाचे आज धरणे आंदोलन
औरंगाबाद, १० जून/खास प्रतिनिधी
वेतनवाढीसाठी त्वरित चर्चा करून करार करा, निवृत्तीचा गुंता सोडविण्यासाठी विश्वासात घ्या या अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघातर्फे विभागीय कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात येत आहे.मृत कामगारांच्या वारसांना विनाविलंब त्यांच्या निवासी झोनमध्ये बदली द्यावी अशी मागणीही महासंघाच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भावना वैष्णव यांना महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
औरंगाबाद, १० जून /प्रतिनिधी
उद्योगशील महिलांना प्रोत्साहीत करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून मिटकॉन संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘महाराष्ट्र उद्योगिनी’ पुरस्कार भावना वैष्णव-रत्नाळीकर यांना जाहीर झाला आहे. त्या मराठवाडा तसेच महाराष्ट्रात बांधकाम क्षेत्रात काम करतात. नुकत्याच झालेल्या एका समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू
औरंगाबाद, १० जून /प्रतिनिधी

करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडगाव येथे एका १५ वर्षांच्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. भगवान ज्ञानेश्वर कुबेर असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्याला काढण्यासाठी शहरातून अग्निशामक दलाचे पथक गेले होते. तो पोहण्यासाठी विहिरीत उतरला होता. त्याला खोलीचा अंदाज आला नाही.

पाकिटमार महिलेला अटक
औरंगाबाद, १० जून /प्रतिनिधी

पाकिटमारी करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक केली. आशाबाई वसंत जाधव (रा. रमानगर) असे या महिलेचे नाव आहे. काल सायंकाळी वरद गणेश मंदिराजवळील गर्दीत ती थांबलेली होती. भाविकांची खिसे चाचपडत असताना पोलिसांना तिला पाहिले. चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. तिला अटक करण्यात आली आहे.

पुलाच्या कामासाठी उपोषणाचा इशारा
औरंगाबाद, १० जून /प्रतिनिधी

दमडी महल येथील पुलाचे काम सुरू करण्यात यावे या मागणीसाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रभागाचे नगरसेवक जावेद कुरेशी यांनी दिला आहे. १६ जूनपासून पालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदन कुरेशी यांनी आयुक्त वसंत वैद्य यांना दिले आहे. या पुलाचे काम सुरू झाले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते बंद करण्यात आले. काम बंद असल्यामुळे नाल्याचे पाणी मोठय़ा प्रमाणावर साचते. यामुळे दूर्गंधी पसरली आहे. शिवाय वाहतुकीलाही अडचण होत आहे. हे काम पुन्हा सुरू करण्यात यावे यासाठी अर्ज, विनंत्याही करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाने दूर्लक्ष केल्यामुळे हे आंदोलन हाती घेण्यात येत असल्याचे कुरेशी यांनी म्हटले आहे.

युवकाला लुटले
औरंगाबाद, १० जून/प्रतिनिधी

दुचाकी सुरू करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महाविद्यालयीन युवकाच्या खिशातून १० हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने काढून नेला. काल दुपारी करोडी शिवारातील महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ ही घटना घडली. तिलकराज अशोक शेळके (वय१९,रा. उल्कानगर) असे या युवकाचे नाव आहे.

सब्बनवार कॉलेजचा ९८ टक्के निकाल
बिलोली, १० जून /वार्ताहर
कुंडलवाडी येथील कै. गंगाबाई पोतन्ना सब्बनवार मुलींच्या ज्यु. कॉलेजचा इयत्ता बारावीचा ९८ टक्के निकाल लागला. परीक्षेत जयश्री देवराव सोनपारखे (७३.१७) प्रथम, रुख्मिणी जळबाजी मोरे (७० टक्के) द्वितीय तर संगीता सायबू प्याटेकर ही तृतीय आली आहेसंस्थेचे सचिव गंगाधरराव सब्बनवार, मुख्याध्यापिका राजलक्ष्मी ठाकूर, प्रा. शंकर पवार, प्रा. श्रीनिवास गोविंदलवार व प्रा. सुरेश कंकाळ यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत चार प्रकरणे निकाली
जालना, १० जून /वार्ताहर
जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक जिल्हाधिकारी आर. डी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत १२ प्रकरणांवर चर्चा झाली. त्यातील ४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रलंबित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देऊन पाठपुरावा करण्याबाबत सूचित करण्यात आले. ८ जूनला प्राप्त झालेल्या दोन अर्जाची माहिती या बैठकीत देण्यात आली. त्यातील एक अर्ज निकाली काढण्यात आला तर दुसरा अर्ज संबंधित विभागाकडे चौकशीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस जुमान बी. नासेर चाऊस, चंद्रकांत रत्नपारखे, सुरेश वैद्य हे अशासकीय सदस्य तर एम. ए. रऊफ, कार्यकारी अभियंता व इतर शासकीय सदस्य उपस्थित होते.

गंगाखेडमध्ये रामकथा उत्सव
गंगाखेड, १० जून/वार्ताहर

संत जनाबाईंच्या जन्मभूमीत श्रीसद्गुरू सच्चिदानंद काशिनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त १३ ते २० जूनच्या कालावधीमध्ये राष्ट्रसंत माता कनकेश्वरी यांच्या श्रीरामकथा दिव्य उत्सव तसेच सत्संग भजन संध्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. महोत्सवाचा प्रारंभ शनिवारी (दि.१३) श्री. सोमयाजी यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या टोळीस अटक
कळंब, १० जून/वार्ताहर

शहरातील एका विवाहितेस मोबाईलवर तुझे छायाचित्रे आहेत. ती सर्वाना दाखवून तुझी बदनामी करू, असे धमकावत गेल्या तीन वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या सहा जणांच्या टोळीस संबधित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांना अटक केली एक आरोपी फरारी आहे. एका विवाहितेस गेल्या तीन वर्षांपासून धाकदडपशाही करून तुझे मोबाईलवर क्लिपिंग व छायाचित्रे आहेत. ती सर्वाना दाखवून तुला बदनाम करू, असे म्हणून तिच्यावर बलात्कार केल्याची फिर्याद महिलेने कळंब पोलीसठाण्यात सहा जणांविरुद्ध दाखल केली. फिर्यादीवरुन सरताज खान (रा. गणेशनगर), वसीम शेख (रा. मदिना चौक), जलाल ऊर्फ जल्ल्या शेख (रा. इस्लामपुरा), फारुख तांबोळी (रा बाबानगर), अन्वर ऊर्फ अन्नू तांबोळी (रा. बाबानगर) यांना अटक केली. यातील रफीक शेख (रा. देवीमंदिर रोड) हा फरारी आहे.