Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पद्मसिंह पाटील अखेर निलंबित
राष्ट्रवादीच्या स्थापनादिनीच सर्वात कटू निर्णय..
नवी दिल्ली, १० जून/खास प्रतिनिधी

 

दहावा स्थापनादिन साजरा करीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आज आपल्या दहा वर्षांंच्या वाटचालीतील सर्वात कटु निर्णय घेण्याची वेळ आली. काँग्रेसनेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या आरोपाखाली सीबीआय कोठडीत असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते व उस्मानाबादचे नवनिर्वाचित खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला नाईलाजाने जाहीर करावे लागले.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीने पाटील यांची कालपर्यंत अतिशय भक्कमपणे पाठराखण केली होती. पण जनमानसात पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांना निलंबित करून राष्ट्रवादीचा त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगावे लागले.
सार्वजनिक व राजकीय जीवनात साधन शुचिता, उच्च परंपरा आणि आदर्शांचे पालन करण्यासाठी पद्मसिंह पाटील यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे आज सायंकाळी पक्ष मुख्यालयात घाईघाईने बोलविलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नागरी उड्डयण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले.
गेल्या शनिवारी पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने अटक केल्यानंतरच्या घडामोडींवर आम्ही बारकाईने नजर ठेवून होतो. आज पक्षाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीच्या बैठकीत पद्मसिंह पाटील यांच्याविषयी बरेच मंथन केल्यानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पटेल यांनी सांगितले. या समितीचे अध्यक्ष खुद्द प्रफुल्ल पटेलच असून तारीक अन्वर, डी. पी. त्रिपाठी आणि एस. आर. कोहली या समितीचे सदस्य आहेत. पत्रकार परिषदेला समितीचे तिन्ही सदस्य उपस्थित होते. गेली चार दिवस पद्मसिंह पाटील यांचे भक्कमपणे समर्थन केल्यानंतर आज त्यांच्यावर कारवाई करण्याची राष्ट्रवादीला उपरती झाली. पद्मसिंह पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर ताबडतोब कारवाई करणे शक्य नव्हते, असा युक्तिवाद पटेल यांनी या प्रकरणी झालेल्या विलंबाचे समर्थन करताना केला.
खुनाच्या आरोपाचे प्रकरण हे सीबीआय आणि पद्मसिंह पाटील यांच्यातील आहे. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही. पाटील यांची चौकशी पूर्ण होऊन ते न्यायालयात निर्दोष असल्याचे सिद्ध होईपर्यंत त्यांचे निलंबन कायम राहील. ते दोषी ठरले तर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल. सार्वजनिक व राजकीय जीवनात उच्च परंपरांवर पूर्ण विश्वास असल्यामुळे पाटील यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही प्रकारचे सहकार्य करू इच्छित नाही. त्यांना न्यायालयीन लढाईसाठी कायदेशीर वा कोणत्याही प्रकारचे सहाय्य करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले.