Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अण्णा हजारेंची भीती आणि पक्षांतर्गत दबावामुळेच कारवाई
मुंबई, १० जून / खास प्रतिनिधी

 

खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांची पाठराखण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने अवघ्या २४ तासांमध्ये आपल्या भूमिकेत बदल करून त्यांना पक्षातून निलंबित केले. पक्षाने कारवाई न केल्यास त्याचा विधानसभा निवडणुकीत फटका बसेल, असे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि अजितदादा पवार यांनी पवारांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यात याच मुद्दय़ावर भर दिला जाईल ही भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना होती.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना गेली ४० वर्षे सातत्याने साथ देणाऱ्या डॉ. पाटील यांच्या विरोधात कारवाई करण्यात राष्ट्रवादीचे नेते सुरुवातीला फारसे उत्सूक नव्हते. पवारांच्या पडत्या काळातही डॉ. पाटील यांनी त्यांना साथ दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे पवारांच्या विरोधात गेले होते तेव्हा काँग्रेस विधिमंडळ पक्षात नाईक यांच्यावर धावून जाण्यात डॉ. पाटील हेच पुढे होते याची आठवण काँग्रेसचे नेते करून देतात. ही पाश्र्वभूमी असल्यानेच पवारांनी डॉ. पाटील यांची पाठराखण करण्यावर भर दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत याच मुद्दय़ावर विरोधी पक्षाचे नेते तर भर देतील तसेच काँग्रेसही राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याची संधी सोडणार नाही याची राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाणीव झाली होती. यामुळेच प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ व अजित पवार यांनी डॉ. पाटील यांच्यावर कारवाई करून सुटका करावी अशी मागणी पवारांकडे केली होती, असे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
त्यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राज्यव्यापी दौरा सुरू होणार आहे. हजारे यांनी आधीच डॉ. पाटील यांच्यावर कडाडून हल्ला चढविला आहे. डॉ. पाटील यांची पाठराखण करून नाहक अण्णा हजारे यांच्या हातात कोलीत देऊ नये, असा पक्षात सूर होता. अण्णा हजारे यांच्यामुळेच सुरेश जैन व नवाब मलिक या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना घरी जावे लागले होते. डॉ. पाटील यांच्या विरोधातही अण्णा हजारे यांनी आरोप केले होते. न्या. सावंत आयोगाने डॉ. पाटील यांच्यावर ताशेरे ओढले होते.