Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दहावी-बारावीचा निकाल यापुढे विभागवार जाहीर करणार?
आशिष पेंडसे
पुणे, १० जून

 

केंद्रीय मंडळांच्या तुलनेत महाराष्ट्रात दहावी-बारावीचा निकाल जाहीर करण्यास विलंब होत असल्याची समाजभावना लक्षात घेऊन यापुढील काळात तो विभागीय मंडळनिहाय जाहीर करण्याचा विचार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विचाराधीन आहे.
मुंबईतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमुळे संपूर्ण राज्याचा दहावीचा निकाल ‘ऑफलाइन’ ठेवण्यात आला आहे, असा आरोप केला जात असताना मंडळाचा हा प्रस्ताव निश्चितच व्यवहार्य ठरण्याची शक्यता आहे. मंडळाच्या राज्य अध्यक्षा डॉ. विजयशीला सरदेसाई यांनी विभागवार निकाल जाहीर करण्याबाबत प्रथमदर्शी अनुकूलता दर्शविली. ‘जनतेची गैरसोय टाळण्यासाठी यापुढील काळात अशा प्रकारचा प्रयोग करण्यास हरकत नाही. अर्थात, त्यापूर्वी त्यामधील सर्व कायदेशीर व तांत्रिक बाजू तपासून घेणे आवश्यक आहे,’ अशा शब्दांत डॉ. सरदेसाई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना मतप्रदर्शन केले.
सीबीएसईसारख्या केंद्रीय मंडळांचा निकाल लवकर लागतो. त्या तुलनेमध्ये राज्य मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल उशिराने जाहीर होतो. राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे त्यामुळे नुकसान होते. त्याचप्रमाणे दहावी-बारावी निकालाविषयी कोटय़वधी जनतेला असलेली उत्कंठा लक्षात घेता निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करण्यात येते. दुसरीकडे, राज्य मंडळाकडून केंद्रीय मंडळाच्या निकाल प्रक्रियेतील त्रुटी दर्शविल्या जातात. आपल्याकडे गुणपत्रिकाही निकालाबरोबरच दिली जाते. केंद्रीय मंडळांमध्ये आठ-दहा दिवसांनंतर गुणपत्रिका प्राप्त होते. त्यामुळेच महाराष्ट्रातील निकाल तुलनेने उशिरा जाहीर केला जातो, अशा शब्दांत समर्थन केले जाते. राज्य मंडळाचा निकाल हा पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक अशा आठ विभागीय मंडळ स्तरावर जाहीर केला जातो. हे प्रत्येक विभाग स्वायत्त आहेत. त्याचप्रमाणे ‘दहावी-बारावी परीक्षेत राज्यात पहिला,’ असे मंडळाच्या निकालामध्ये औपचारिकदृष्टय़ा कुठेही म्हटले जात नाही. प्रत्येक विभागीय मंडळनिहाय पहिला, असाच निकाल जाहीर केला जातो. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेला पुणे विभागात दोन लाख १४ हजार ८४२ विद्यार्थी, नागपूरमध्ये एक लाख ७० हजार १००, औरंगाबादमध्ये एक लाख ३८ हजार ९५८, मुंबईत (सर्वाधिक) दोन लाख ८९ हजार ५८१, कोल्हापूरमध्ये एक लाख ७२ हजार, अमरावतीमध्ये एक लाख ४८ हजार ९६७, नाशिकमध्ये एक लाख ६० हजार ८३७ आणि लातूरमध्ये सर्वात कमी ९३ हजार ७९६ विद्यार्थी बसले होते. या संख्येतील तफावतीमुळे मोठय़ा मंडळाच्या निकालापूर्वी काही आठवडे आधीच छोटय़ा मंडळातील निकाल तयार असतो. केवळ राज्यातील सर्व मंडळांचा निकाल एकत्रित जाहीर करण्याची प्रथा असल्याने लाखो विद्यार्थ्यांचा निकाल खोळंबून राहतो.
मुंबईतील अकरावीच्या ऑनलाइन प्रक्रियेला राज्य शासन व राज्य मंडळाने प्राधान्य दिल्याने दहावीचा निकाल लांबणीवर पडत आहे, या टीकेवर गेल्या काही वर्षांच्या निकालाच्या तारखा उत्तर देत आहेत. गेली दोन वर्षे दहावीचा निकाल २६ जूनला जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षी बारावीचा निकाल सात जूनला, तर यंदा तो चार जूनलाच जाहीर करण्यात आला. यंदाही दहावीचा निकाल २६ जूनपूर्वीच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईमुळे दहावीचा निकाल वेठीस धरला जात असल्याची टीका निराधार आहे, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.