Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पवनचक्की जमीन घोटाळा
ऐश्वर्या, सचिन, अमरसिंह यांच्या जमीनखरेदीची चौकशी
मुंबई, १० जून/प्रतिनिधी

 

राज्यातील धुळे, नंदूरबार, नाशिक, सांगली, सातारा या जिल्ह्यांमधील पवनचक्क्यांसाठी संपादित केलेल्या जमिनींचा स्थानिक शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नसून या ठिकाणी ऐश्वर्या राय, ट्विंकल खन्ना, अमर सिंग, सचिन तेंडुलकर यांनीही जमिनी घेतल्या असल्याचा मुद्दा आज विधान परिषदेत चर्चेला आला. त्यावर अखेर अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी एका निवृत्त सचिव व महसूल आणि अपारंपरिक ऊर्जा खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव या तीनजणांच्या समितीतर्फे केली जाईल, असे सांगितले. विधानसभेत विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनीही आदिवासी व मागासवर्गीयांच्या एक लाख हेक्टर जमिनी कवडीमोल भावाने घेऊन पाच हजार कोटी रुपये संबंधित कंपनीने कमावल्याचा आरोप केला. तसेच एक माजी महसूलमंत्र्याच्या आदेशामुळे हा घोटाळा झाल्याचा आरोप करीत कदम यांनी या प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.
विधान परिषदेमध्ये प्रकाश शेंडगे, पांडुरंग फुंडकर, नितीन गडकरी आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. शेतकऱ्यांच्या जमिनी पवनचक्क्यांसाठी घेण्यात आल्या. मात्र त्यातून शेतकऱ्यांना कोणतीही भरपाई मिळाली नसल्याचे या सदस्यांनी निदर्शनास आणले. यावर विनय कोरे म्हणाले की, ज्यांच्या जमिनी पवनचक्क्यांसाठी घेण्यात आल्या आहेत, त्यांच्यासाठी आम्ही एक योजना बनविली आहे, ज्यामुळे त्यांचा फायदा होईल. ही योजना येत्या आठ दिवसांमध्ये लागू केली जाईल. यावर नितीन गडकरी म्हणाले की, ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना महिन्याला एक एकरी लाख रुपये भाडे मिळायला पाहिजे, अशी तरतूद या कायद्यात करायला हवी. तसेच सुझलॉन या कंपनीने धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत पवनचक्की लावण्याकरिता गुंतवणूकदारांच्या संगनमताने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.