Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘उद्धव यांनी शिवसेनेचा इतिहास तपासून पहावा’
मुंबई, १० जून/ खास प्रतिनिधी

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पद्मसिंह पाटील यांना पवनराजे निंबाळकर खून प्रकरणी अटक झाल्याच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचा इतिहास काढणाऱ्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा इतिहास प्रथम तपासून पाहावा. यात कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई व खोपकर यांच्या हत्येसह अनेक ऐतिहासिक दाखले त्यांना पाहावयास मिळतील, असा टोला उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज लगावला. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्यावरही घणाघाती हल्ला चढवत कदम हे ४२० प्रवृत्तीचे नेते असल्याचे त्यांनी सांगितले.
छगन भुजबळ आणि सुरेश नवले यांच्या घरावर शिवसैनिकांनी केलेला हिंसक हल्ला पाहाता हल्ल्यांचा इतिहास कोणी निर्माण केला, असा सवाल करत शिवसेना नगरसेवक खंडणीप्रकरणी पकडले जात असताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचा इतिहास काढण्याचे उद्योग करू नये, असा अप्रत्यक्ष इशाराही राणे यांनी विधानभवनात पत्रकार परिषदेत दिला. विरोधी पक्षनेता कसा नसावा हे पाहायचे असेल तर रामदास कदम यांच्यासारखे दुसरे उत्तम उदाहरण सापडणार नाही, असे सांगून नारायण राणे म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदाला कलंक लावण्याचेच काम या माणसाने केले आहे. या अधिवेशनातील विरोधी पक्षाची कामगिरी अत्यंत सुमार असून विकास कामांवर अथवा विषयाला न्याय देण्यासाठी बोलण्याऐवजी सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी भावनिक मुद्दे काढून सभागृहाचा वेळ वाया घालविण्याचेच काम रामदास कदम यांनी केले. आमदार आपापल्या भागातील महत्वाचे प्रश्न उपस्थित करत असतात. मात्र प्रश्नोत्तराचा तास वाया घालवण्याचे काम करण्यात येत असल्यामुळे आमदारांच्या प्रश्नांना न्याय मिळू शकत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सरकारकडून एसआरएच्या योजना गुपचुप मंजूर करून घेताना आणि जादा आमदार निधी मिळवताना रामदास कदम यांना सरकार ४२० आहे असे का वाटले नाही, असा सवालही त्यांनी केला.