Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

प्रादेशिक

गोळीबार करताना कसाब आनंदाने नाचतही होता!
मुंबई, १० जून / प्रतिनिधी
मुंबईवरील हल्ल्याच्या रात्री सीएसटी स्थानकावर मृत्यूचा नंगानाच करणारा पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब हा अंदाधुंद गोळीबार करताना अक्षरश: नाचत होता. इतकेच नाही तर त्याच्या अंदाधुंद गोळीबाराने मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांना पाहून तो एकप्रकारे असुरी आनंद लुटत असल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फारूकी नसीरुद्दीन खलीलुद्दीन यांनी विशेष न्यायालयाला सांगितले व कसाबला ओळखले.

साक्षीदार पित्याचा न्यायालयात आक्रोश
‘कसाबने गोली मारके मेरी बच्ची की जिंदगी बरबाद की, इसे फाँसी चढा दो’

मुंबई, १० जून / प्रतिनिधी

‘इस कमीने ने मेरे बच्ची को गोली मारी, मेरी बच्ची की जिंदगी बरबाद की, कितने लोगों को मारा’ असा आक्रोश करीत सीएसटी स्थानकावरील हत्याकांडाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि या हल्ल्यात जखमी झालेल्या दहा वर्षांच्या मुलीचा पिता असलेल्या नटवरलाल रोटावन यांनी पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाबला भर न्यायालयात ओळखले. इतकेच नव्हे तर या नराधमाला फासावर लटकवा, अशी मागणी रोटावन यांनी हल्ल्यातील पीडितांच्यावतीने विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्याकडे केली. रोटावन यांच्या आक्रोशाने न्यायालयातील वातावरण एकदम गंभीर झाले. आतापर्यंत न्यायालयात छद्मीपणे हसणारा कसाब रोटावन यांच्या या आक्रोशाने आज दिवसभर खाली मान घालून बसल्याचे चित्र पाहावयास मिळाले. कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल यांनी ‘२६/११’च्या रात्री सीएसटी स्थानकावर अंदाधुंद गोळीबार करून अनेक

पं. अजय पोहनकर ‘नारायण पुरस्कारा’ने सन्मानित
मुंबई, १० जून / प्रतिनिधी

संगीतक्षेत्रात गेली ५१ वर्षे मुशाफिरी करत आपली स्वतंत्र शैली निर्माण करणारे ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांचा हुबळीच्या नारायण अकादमीतर्फे ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांच्या हस्ते ‘नारायण सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी तेथील कलाकार व रसिक उपस्थित होते. याच निमित्ताने पोहनकर यांनी नारायण अकादमीमध्ये गायनाची कार्यशाळाही घेतली.

हवाई सुंदरीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून वैमानिक मुक्त
मुंबई, १० जून/प्रतिनिधी

‘इंडिगो एअरलाइन्स’मधील एक हवाईसुंदरी सुचिता सुमित गुरमानी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सांताक्रुझ पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यात सत्र न्यायालयाने त्याच विमान कंपनीतील एक सहवैमानिक अर्जुन बालचंद्र मेनन यांना आरोपमुक्त केले आहे.

कोकणातील विद्यार्थ्यांची दहावीची पुढील परीक्षा रत्नागिरी मंडळातर्फे
मुंबई, १० जून / प्रतिनिधी

कोकणातील १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र रत्नागिरी विभागीय मंडळ स्थापन करण्यात येत असून त्या मंडळामार्फत २००९-१० या वर्षांसाठी परीक्षा घेण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.
कोकणासाठी स्वतंत्र विभागीय मंडळाचा प्रस्ताव प्रलंबित होता त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी मुंबईपर्यंत यावे लागते, या बाबतचा तारांकित प्रश्न राजन तेली यांनी विचारला होता. रत्नागिरी विभागीय मंडळासाठी एमआयडीसीची जमीन मिळाली आहे. तथापि, कर्मचारी आणि अन्य पदनिर्मितीसाठी दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.

कोकण रेल्वे : भाजपच्या कार्यकर्त्यांची महाप्रबंधकांशी चर्चा
मुंबई, १० जून/प्रतिनिधी
कोकण रेल्वेच्या सेवेत सुधारणा व्हावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी आज कोकण रेल्वेचे महाप्रबंधक अनुराग मिश्रा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून एक निवेदन दिले. जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ भेटले. वैभववाडी, कणकवली स्थानकांवर पावसाळी शेड बांधावी, सर्व महत्त्वाच्या गाडय़ा वैभववाडी व कणकवलीस थांबवाव्यात, वांद्रे वा बोरिवली येथून तसेच दादर ते सावंतवाडी अशी गाडी सुरू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

सीबीआयचे विविध ठिकाणी छापे
मुंबई, १० जून / प्रतिनिधी

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ‘केंद्रीय अन्वेषण विभागा’च्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) आज मुंबई, गोवा आणि नागपूर येथे महत्त्वांच्या व्यक्तींच्या घरांवर छापे टाकले. छापा टाकण्यात आलेल्यांमध्ये मुंबईच्या पेटंट आणि डिझाईन्सचे उप नियंत्रक नागपूरच्या स्टेट बँक ऑफ पतियाळाचे मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक यांच्यासोबत गोव्यातील बीएसएनएलचे निवृत्त महाव्यवस्थापक व उपव्यवस्थापकांचा समावेश आहे.

बोगस पदव्यांचा तपास करा : हायकोर्टाचा आदेश
मुंबई, १० जून/प्रतिनिधी

बनावट पदव्या आणि त्याआधारे सरकारी नोकऱ्या मिळविण्याच्या आत्तापर्यंत उघड झालेल्या व इतरही प्रकरणांचा तपास करून संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी राज्य सरकारने उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथक नेमावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुंबईतील सिद्धार्थ विधि महाविद्यालयातील एक व्याख्यात्या चित्रा साळुंखे यांनी आंध्र प्रदेशातील काकतिया विद्यापीठाच्या बनावट बी. ए. पदवीच्या आधारे प्रथम त्याच महाविद्यालयात एलएल.बी.ला प्रवेश मिळविल्याचे व नंतर त्या पदवीच्या जोरावर तेथेच नोकरी मिळविल्याचे प्रकरण एका रिट याचिकेच्या निमित्ताने समोर आल्यानंतर मुख्य न्यायाधीश न्या. स्वतंत्र कुमार व न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

‘लेट्स डान्स’सारख्या चित्रपटांसाठी अतिभव्य अशी पोस्टर्स उभारणाऱ्या कामगारांना ‘लेट्स वर्क’ असे म्हणतच रोजी-रोटीचा हिशोब जमवावा लागतो. छाया : महिन्द्र परिख