Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

दगडी कोळशामुळे बीपीटी हद्दीत ‘काळी धुळवड’
रे रोड-शिवडी-वडाळा परिसरात धुळीचे साम्राज्य; नागरिक हैराण

कैलास कोरडे
विदेशातून आयात करण्यात येणाऱ्या दगडी कोळशाच्या वाहतुकीमुळे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (बीपीटी) हद्दीतील रे रोड-शिवडी-वडाळा परिसरात सध्या सर्वत्र धुरळ्याचे साम्राज्य आहे. या धुरळ्याने परिसरातील चराचर व्यापले असून, हजारो नागरिकांना दररोज ‘काळी धुळवड’ खेळावी लागत आहे. कोळशाचे कण नाका-तोंडातून व अन्न-पाण्यातून शरीरात जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही कोळशाचा हा धुरळा घातक ठरत आहे.

मुंबईच्या समस्या सोडविण्यासाठी आदित्य ठाकरे याचा पुढाकार
प्रतिनिधी
कचऱ्यापासून ते वाहतुकीच्या कोंडीपर्यंत मुंबईला अनेक समस्यांनी घेरले आहे. अलीकडेच एके दिवशी उद्धव ठाकरे यांचा पुत्र आदित्य ठाकरे अशाच एका वाहतुकीच्या कोंडीत अडकला होता. तेव्हा त्याला वाटले की, या समस्येबद्दल काही तरी केले पाहिजे. लगेचच त्याने भाजपच्या युवानेत्या शायना एन. सी. यांना दूरध्वनी केला. त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि मुंबईतील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी मुंबईतील तरुणाईच पुढे आली पाहिजे, या निष्कर्षांपर्यंत ते पोहोचले. याच प्रेरणेतून साकारली गेली ‘आपले स्वप्न’ (ड्रीम वुई शेअर) ही संस्था.


‘ऑलिव्ह रिडले’ कासवांची फिल्म ग्रीन ऑस्करवारीवर
अभिमन्यू लोंढे

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अथांग सागरकिनाऱ्यावर आढळणाऱ्या ‘ऑलिव्ह रिडले’ (कासव)ची फिल्म ग्रीन ऑस्करसाठी वनखात्याने पाठविली आहे. उपवन संरक्षक नरेश झुरमुरे यांनी सागरकिनाऱ्यावर १४ वेळा जाऊन ही फिल्म तयार केली असून, ‘ग्रीन ऑस्कर’साठी फिल्म पाठविण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

प्रशासनाच्या संगणकीय मनमानीला स्थायी समितीचा चाप!
खास प्रतिनिधी
महानगरपालिकेतील ‘सॅप’च्या घोटाळ्यापासून विविध संगणकीय प्रकल्पांच्या कामाची माहिती वेळोवेळी मागूनही नगरसेवकांना ती न देणाऱ्या पालिका प्रशासनातील उच्चपदस्थांना स्थायी समितीने जोरदार झटका दिला आहे. स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते, भाजप गटनेते तसेच विरोधी पक्षनेत्यांना ‘गृहित’ धरून निविदा न मागविताच संगणकीय कमासाठी तसेच टेट्रा संदेशवहन प्रणालीसाठी सल्लागार नेमण्याबाबत प्रशासनाने मांडलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीने कचऱ्याची टोपली दाखवली.

अ‍ॅड‘मिशन’
विद्यार्थ्यांना दोन महाविद्यालयांचा पर्याय उपलब्ध

प्रतिनिधी

११ वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे १५० महाविद्यालयांचा विकल्प भरल्यानंतर त्यापैकी दोन महाविद्यालयांची नावे विद्यार्थ्यांला कळविण्यात येणार आहे. या दोन महाविद्यालयांपैकी कोणत्याही एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांला प्रवेश घ्यावयाचा आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांने प्रवेश घेतल्यानंतरही पुढील इतर प्रवेशफेऱ्यांमध्ये त्याला प्राधान्यक्रमातील वरचे महाविद्यालय मिळू शकते. अशा वेळी पूर्वी घेतलेला प्रवेश रद्द करण्याची मुभा संबंधित विद्यार्थ्यांला राहणार आहे.

आधुनिक संशोधकांना आव्हान ठरणारे जुळ्यांचे रहस्य!
अ‍ॅमेझॉन या महाविशाल नदीच्या पात्रांवर वसलेला ब्राझील देश अनेक अर्थानी आश्चर्यकारक आहे. अ‍ॅमेझॉनच्या खोऱ्यातील घनदाट जंगले, त्यातील असंख्य प्रकारच्या वनस्पती, पक्षी यांचे संशोधन अद्यापही बाल्यावस्थेत आहे. तेथील जंगलांमधील लक्षावधी एकराच्या जमिनीवर अद्यापही मानवाचा पदस्पर्श झालेला नाही. मध्य ब्राझीलमधील कँडीडो गोडोल या प्रदेशांतील चार चौ.कि. मी. क्षेत्रफळ असलेल्या भागांकडे वंशशास्त्रज्ञ, प्रसूतिसंशोधक यांचे लक्ष २००६ सालापासून वेधले गेले आहे.

कपातीमुळे मुंबईकरांच्या पाण्यात झाली ३४० दशलक्ष लिटर्सची घट
प्रतिनिधी

चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना पावसाने हुलकावणी दिल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महापालिकेने मंगळवारपासून दहा टक्के पाणीकपात लागू केली आहे. या पाणीकपातीमुळे मुंबईकरांना मिळणाऱ्या पाणी पुरवठय़ात ३४० दशलक्ष लिटर्सची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपात रद्द होईपर्यंत फक्त तीन हजार ६० दशलक्ष लिटर्स इतकेच पाणी मिळणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जून अखेपर्यंत पाऊस आला नाही तरी पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने आजपासून दहा टक्के इतकी पाणीकपात केली आहे. मुंबई शहर आणि उपनगराला दररोज तीन हजार ४०० दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा होतो. त्यात दहा टक्के घट झाल्यामुळे मुंबईकरांना आणखी जपून पाणी वापरावे लागणार आहे.

‘आयडिअल क्लासेस’ व ‘लोकसत्ता’तर्फे करिअर मार्गदर्शन चर्चासत्रांचे आयोजन
प्रतिनिधी

‘आयडिअल क्लासेस’ आणि ‘लोकसत्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीचे विद्यार्थी व पालकांसाठी करिअर मार्गदर्शन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १४ जून रोजी सांताक्रूझ, गोरेगाव, बोरिवली व भाईंदर आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रांमध्ये दहावीनंतरच्या अभ्याक्रमांची माहिती, महाविद्यालयांची निवड, व्यावसायिक अभ्याक्रमांची निवड कशी करावी, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले पर्याय कोणते, पालकांची मानसिकता कशी असावी इत्यादी विविध मुद्दय़ांवर यावेळी चर्चा करण्यात येते. अलीकडेच बोरिवली, भाईंदर, वसई, डोंबिवली, विलेपार्ले, दहिसर, नालासोपारा, विरार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ‘दहावीनंतर काय?’ आयोजित करण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन सेमिनारला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांना करिअरची निवड करणे सोपे जावे यासाठी ‘आयडिअल क्लासेस’तर्फे अशा प्रकारच्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या चर्चासत्रात प्रा. मनीषा लोपेझ, प्रा. अशोक तिवारी, प्रा. सुचित पिंपुटकर, प्रा. राजेंद्र लोखंडे, प्रा. नेहल डगली, प्रा. रत्ना नांबीसान, प्रा. अँजेलिन अँथनी, प्रा. जयराम जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘लोकसत्ता’ या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी ६५९५६८३३, ६५१७५४५३ किंवा १८००२२३५४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

ग्रंथायनतर्फे स्पर्धेचा निकाल जाहीर
प्रतिनिधी

ग्रंथायनतर्फे मुंबई व बाहेरील नवोदित लेखकांसाठी कादंबरी- कथा- कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून ग्रंथायनने निकालासाठी नामवंत परीक्षकांची टीम निवडली होती. या स्पर्धेत आलेल्या तीन कादंबऱ्यांपैकी एकही बक्षीसपात्र न वाटल्याने त्यांची निवड होऊ शकली नाही. मात्र मधु कुळकर्णी, सावंतवाडी यांच्या कवितेला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. त्याचप्रमाणे आलेल्या कथांमध्ये बऱ्याच कथा व्यक्तिचित्रण व आठवणीवजा लेखासारख्या वाटत होत्या, त्यामुळे रवि सावंत, कोल्हापूर यांच्या कथेला तृतीय क्रमांक व पांडुरंग कांबळे, नाशिक यांच्या कथेला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.