Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सुदृढ बालकांसाठी..
नागपूर, १० जून/ प्रतिनिधी

 

बाळाचा जन्म एकप्रकारचा उत्सवच. आपल्यासाठी हा उत्सव असला तरी काही प्रसंगी आई व अर्भकास अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते. क्वचित प्रसंगी प्राणही गमवावा लागतो. विकसित राष्ट्रांच्या मानाने आजही भारतात होणाऱ्या गरोदर माता व अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण गंभीर स्वरूपाचे आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी विविध योजना राबवत असते. सोबतच अनेक संस्था, स्वयंसेवी संघटनाही या क्षेत्रात सक्रिय असल्याच्या दिसून येतात. नागपुरात शुअर स्टार्ट प्रकल्पांतर्गत ‘गरोदर माता व नवजात बालकांची घ्यावयाची काळजी’ हा प्रकल्प हिरीरीने राबवला जात आहे.
गर्भवती महिलेने दवाखान्यात जाऊन तपासणी करणे, लोहसत्वाच्या गोळ्या घेणे, जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणे, पालेभाज्या आणि फळांचा रोजच्या जेवणात समावेश करणे, आदी विविधांगी माहिती त्यांना आरोग्यसख्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
गरिबी, कुपोषण, मागासलेपण, बेरोजगारी, अल्पवयात होणारे लग्न, घरीच प्रसूती होणे, कुटुंबियांकडून होणारे दुर्लक्ष, स्त्रीचे दुय्यम स्थान, आरोग्य सुविधांचा अभाव, स्त्रियांमध्ये लोहसत्त्वाची कमतरता आणि योग्य वेळी वैद्यक उपचार न होणे, अशा कितीतरी कारणांमुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण वाढते. याला जर वेळीच आळा घातला नाही तर येणारी पिढी कितपत सुदृढ राहू शकेल, याविषयी शंका आहे. महाराष्ट्रात झपाटय़ाने होणाऱ्या शहरीकरणाबरोबरच बकाल वस्त्यांचा प्रश्नही गंभीर झालेला आहे. नागपूरची ३२ लाखावर गेलेली लोकसंख्या आणि महापालिकेतील अपुरी यंत्रणा या कामात सर्वदूर पोहोचण्यात मर्यादा पडतात. म्हणूनच शुअर स्टार्ट प्रकल्पांतर्गत वस्त्यांमध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि आरोग्यसख्या मोलाची कामगिरी बजावत असल्याचे पदोपदी जाणवते.
वस्त्यांतील कुटुंब, महिला, नवजात बालकांवर लक्ष केंद्रित करून त्यांना प्राथमिक माहिती व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न शुअर स्टार्ट प्रकल्पातून करण्यात येत आहे. त्याकामी ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’, ‘म्युर मेमोरियल हॉस्पिटल’ आणि ‘इंडियन सोशल सव्‍‌र्हिस युनिट ऑफ एज्युकेशन (इशू)’ यांना घेऊन ‘पाथ’ या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ४५ वस्त्यांमध्ये नागपूर शुअर स्टार्ट प्रकल्प राबवला जात आहे. प्रकल्पाला २००७ पासून सुरुवात झाली असून त्यात आम्ही आमच्या आरोग्यासाठी (मुख्य संस्था) ५०,१६१ लोकसंख्येत काम करीत आहेत तर, म्युर मेमोरियल हॉस्पिटल आणि इशू या संस्थांच्या मदतीने अनुक्रमे ४९,३९२ आणि ५०,००४ एवढय़ा लोकसंख्येत काम करीत आहेत.
नागपुरात ११ शासकीय रुग्णालये असून महापालिकेची तीन रुग्णालये (अ‍ॅलोपॅथी), १४ अ‍ॅलोपॅथी डिस्पेंसरीज आणि १३ आयुर्वेदिक दवाखाने आहेत. मात्र, त्यांची वाढ लोकसंख्येच्या प्रमाणात झालेली दिसत नाही. गरोदरपणाच्या काळात महिलेने तीन वेळेस अ‍ॅन्टे नेटल चेक अप (एएनसी) करणे आवश्यक असते. त्यातून वजन, रक्त, लघवी, रक्तदाब यांची तपासणी केली जाते. मात्र, दोन वर्षांपूर्वी या महिला एएनसी करायला जात नसल्याचे समुदाय संघटिका आणि आरोग्य सख्यांच्या लक्षात आले. हळूहळू त्यांचे प्रबोधन करण्यात आल्याने महिला आता दवाखान्यात जायला लागल्या आहेत. त्याचे फायदे आता दिसू लागले आहेत.
शुअर स्टार्ट हा प्रकल्प नागपुरात सुरू केल्यापासून त्याचे काही सकारात्मक बदल आरोग्यसख्या आणि वस्तीतील नागरिकांमध्ये पहावयास मिळतात. आरोग्यसख्यांमध्ये झालेले सकारात्मक बदल त्याचाच एक भाग आहे. त्यांचेही राहणीमान, विचारसरणी, बोलण्याची ढब आणि वाढलेला आत्मविश्वास यामुळे प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर बाळाची व आईची घ्यावयाची काळजी, याची इत्थंभूत माहिती त्या सहजगत्या देऊ शकतात. त्यासाठी साप्ताहिक बैठका, चर्चा, आरोग्यवसंत सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. आरोग्य शिबिरे, बचत गटाची बैठक, आरोग्य फंडाची बैठक अशावेळी सुद्धा आरोग्य सख्या महिलांना आरोग्याची माहिती देत असतात. आरोग्यसख्यांबरोबरच नागरिकांच्या मानसिकतेतही फरक पडत आहे.
महिला आरोग्य सुविधांचा लाभ घेऊन कुटुंबातील इतर महिलांनाही त्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. त्यामुळेच वस्त्यांमधील बालमृत्यू व मातामृत्यू कमी होण्यास मदत मिळाली आहे. शिवाय, वस्तीपातळीवर आरोग्य फंड उभारणे आणि आरोग्य समिती स्थापन करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. आरोग्य समिती वस्तीतच दबाव गट निर्माण करून वस्तीपातळीवर समस्या सोडवण्यावर भर देत आहे. उदाहरणार्थ, गंगानगर येथील वस्तीतील महिलांनी आरोग्य समितीच्या दबावगटामुळे घरोघरी नळाची व्यवस्था करायला स्थानिक प्रशासनाला भाग पाडले, हे विशेष. आगामी काळात आणखी सकारात्मक बदल या वस्त्यांमधून दिसून येतील, अशी आशा वाटते. एकूणच शुअर स्टार्ट प्रकल्प येथील वस्त्यांना एक वरदानच ठरत असल्याचे दिसून येते.