Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राज्यातील शंभर गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न -पोपटराव पवार
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

 

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातंर्गत ‘सुवर्ण महोत्सवी समृद्ध गाव योजने’ मध्ये येत्या तीन वर्षांत राज्यातील शंभर गावांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने शासन पातळीवर प्रयत्न करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्य़ातील तीन गावांची निवड करणार असल्याची माहिती हिवराबाजार गावातील सरपंच पोपटराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. संत गाडगेबाबा योजनेतर्गंत रामटेक तालुक्यातील ब्रांद्रा या गावाची पाहणी करून नागपुरात परतल्यावर पोपटराव पवार पत्रकारांशी बोलत होते. कुठल्याही गावाचा विकास लोकसहभागातून आणि लोकचळवळीतून होत असतो त्यादृष्टीने गावातील लोकांची मानसिकता बदलवून त्यांना गावाचा विकास का व्हावा, हे समजून सांगितले पाहिजे. सुवर्ण महोत्सवी समृद्ध गाव योजनेच्या माध्यमातून राज्यातील शंभर गावांचा विकास करण्याच्या दृष्टीने ते दत्तक घेण्याचा शासनाचा विचार असून त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्य़ातील तीन गावांची निवड करण्यात येणार आहे. त्यात प्राध्यान्याने विदर्भातील आत्महत्याग्रस्त गावे, जलसंधारणाची कामे केलेली गावे, सांडपाणी व्यवस्थापन, हागणदारी मुक्त गावांची निवड करण्यात येणार आहे. कुठलीही चळवळ ही खरे तर लोकसहभागातून निर्माण झाली पाहिजे. सरकारी यंत्रणेवर प्रत्येक वेळी अवलंबून राहणे चुकीचे आहे. अनेकदा लोकसहभाग असला तरी सरकारी यंत्रणा मदत करीत नाही, असे अनुभव आले आहे पण, त्यावर ग्रामस्थांनी संघटीत होऊन सरकारी मदत न घेता गावाचा विकास केला पाहिजे. विदर्भात पाणी टंचाई हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे पाण्याची साठवणूक कशी करावी, याबाबत विचार केला पाहिजे. रोजगार हमी योजनेतंर्गत अनेक सरकारी योजना असून त्याचा लाभ घेतला पाहिजे.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांची पाहणी करीत असताना त्या गावातील लोकांचा शासकीय योजना पळवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे अनेकदा विदर्भावर अन्याय होत असेल पण, आता विदर्भातील लोकांनी मानसिकता बदलायला हवी. गावातील प्रमुखांनी लोकांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. विदर्भातील लोकांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणी साठवण व पीकनियोजन करणे भविष्यासाठी आवश्यक आहे. ग्रामसभा आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्य़ातील आदिवासी गावाला भेट देताना ग्रामस्थांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात पहायला मिळाला.
समृद्ध गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांची कर्मभूमी हिवरेबाजार आहे. १९९० पूर्वी हिवराबाजार गाव बीपीएलयादीत होते. त्यानंतर २६ जानेवारी १९९० ला पहिली ग्रामसभा झाली. विकासाच्या नव्या पाऊलवाटा समोर आल्या आणि आता २००९ मध्ये फक्त ४ कुटुंब बीपीएलच्या यादीत आहेत. गावातील लोकांनी कर्ज माफी नको, जातीच्या आधारावर योजनेचा फायदा नको, असा संकल्प केला असून त्यातून जलसंधारणाची कामे करण्यात आली. हिवरा बाजारमध्ये बहुतेकांचा शेती हा व्यवसाय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पीक घेऊन करून गावाचा विकास करण्याचे काम लोकसहभागातून करण्यात आले आहे. मुळात गावात पाण्याचे नियोजन करण्याची आवश्यक आहे. त्यांना त्यांच्या गरजा समजून सांगण्याची गरज आहे. ज्या दिवशी त्यांना ते समजेल त्यादिवशी गावाचा विकास होईल. गावातील युवकांचा सहभाग वाढला पाहिजे, असेही पोपटराव पवार म्हणाले. गावात १० लाख झाडे लावली असून आज सर्वच झाडे जिवंत आहेत.
हिवरा बाजार हे गाव विकासाच्या दृष्टीने कापरेरेट व्हीजन म्हणून समोर येत आहे. दारिद्रय़रेषेच्या बाहेर आहे. हिवराबाजारच्या आजूबाजूला असलेली भोयरे पवार, भोयरे खुर्द, दैठणे गुंजाळा, वडगाव आमली, जखनगाव, टाकळी खाद, हिंगणगाव, पिंपळगाव ही गावे लोकसभागातून विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. नगर जिल्ह्य़ातील निवडणुकीच्या वेळी विविध राजकीय पक्षाचे नेते या गावाचा आदर्श गाव म्हणून उल्लेख करीत. वेगवेगळ्या देशातील शिष्टमंडळ गावाची पाहणी करण्यासाठी येत असतात.
गावात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे प्रत्येकजण एकमेकांच्या सुखदुखात सहभागी होत असतात. गावाचा विकास साधायचा असेल तर गावाला नेतृत्वाची गरज असते. ते निर्माण करण्याची आज गरज आहे, असेही पोपटराव पवार म्हणाले.