Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आकर्षक छत्र्या बाजारात
नागपूर, १० जून/ प्रतिनिधी

 

मृगनक्षत्राला प्रारंभ झाला असून बाजारपेठेत पावसापासून संरक्षण करणाऱ्या वस्तूंची दुकाने थाटली आहेत. यंदा उन्हाचा तडाखा बघता पाऊसही चांगला पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. छत्री उद्योजकांनी यावर्षी आकर्षक कमी भावाच्या छत्र्या विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. केवळ पावसावरच या उद्योगाचे भवितव्य अवलंबून असल्याने गेल्या चार ते पाच वर्षांपासून छत्री उद्योग मंदीत सापडला होता. गेल्यावर्षी चांगला पाऊस पडल्याने छत्री उद्योगाने तग धरला होता.
यंदा चांगल्या पावसाचे भाकीत पंचांग तसेच हवामान खात्याने केल्याने छत्री उत्पादन करणाऱ्या उत्पादकांमध्ये उत्साह आला. यंदा ५ ते १० टक्क्य़ांनी छत्र्याचे भाव वाढले असले तरी आकर्षक छत्र्या बाजारात आणल्या आहेत. काळाची गरज ओळखून दांडी असलेली २ ते अडीच फूट लांबीची काळा कपडा असलेल्या छत्रीचे अस्तित्व आता ग्रामीण भागातच आहे. जमाना आहे बटनस्टार्ट छत्र्यांचा. बाजारात पर्समध्ये मावेल एवढय़ा लहान छत्र्यांपासून एक ते दीड फुटापर्यंत रंगीबेरंगी छत्र्या १०० ते ३०० रुपये या किमतीपर्यंत उपलब्ध आहेत. यंदा लहान मुलांसाठी आकर्षक डिझाईन तसेच मिकी माऊसचे चित्र असलेल्या छत्र्या आहेत, तर युवक-युवतींसाठी कमी लांबीच्या विविध डिझाईन्सच्या छत्र्या आहेत. छत्र्या तयार करण्यात अम्रेला, झेब्रा आदी कंपन्या असून बहुतांश छत्र्या दिल्ली व मुंबईत तयार होतात. छत्र्यांसाठी लागणारा कापड मात्र तैवानहून येतो.
या कापडाचे वैशिष्टय़ म्हणजे जोरदार पावसातही पाण्याचा एक थेंबही मध्ये गळणार नाही. सीताबर्डी, महाल, इतवारी, गोकुळपेठ, सक्करदरा आदी शहराच्या विविध भागातील बाजारपेठेत रेनकोट, छत्र्याची दुकाने थाटली आहेत. अनेक जनरल स्टोअर्समध्ये छत्र्या विक्रीला आल्या असून चांगल्या पावसाबरोबर छत्र्यांच्या विक्रीत वाढ होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. केवळ पावसाळ्यातच छत्र्याचा वापर करतात असे नाही तर उन्हाळ्यातही छत्र्यांचा वापर होत असतो, असे सीताबर्डीवरील छाता बाजारचे प्रमुख चौरसिया यांनी सांगितले.
बाजारात चायना मेड छत्र्या मोठय़ा प्रमाणात विक्रीला आहे मात्र या छत्र्याची गॅरंटी देता येत नाही. चायना मेड छत्र्या या बहुतेक बटनच्या छत्र्या असतात, त्यामुळे ती एकदा नादुरस्त झाली की छत्रीचे कारागीर त्याला हात लावत नाही. छत्री दुरुस्तीकरणाऱ्या कारागिरांने सांगितले की, बटनस्टार्ट छत्र्या मोठय़ा संख्येने दुरुस्तीसाठी येतात. या छत्र्या नाजूक असल्याने जोरदार वादळी पावसात नादुरुस्त होतात.