Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कुलगुरूंशी झालेल्या वादाला प्र-कुलगुरूच जबाबदार
नागपूर, १० जून/ प्रतिनिधी

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेतील कुलगुरू व प्र-कु लगुरूंमधील वादाला प्र-कुलगुरूंची ‘वे ऑफ टॉकिंग’ नडल्याने विद्यापीठातील भांडणे चव्हाटय़ावर आली.
कुलगुरू-प्र-कुलगुरूंमधील तू तू मै मै शैक्षणिक क्षेत्रात नवीन राहिली नसून यापूर्वीही त्यांच्यात अनेकदा खटके उडाले आहेत. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्र-कुलगुरूंची प्रश्न विचारण्याची तऱ्हा अंगलट आली. त्यामुळे त्यांनी कुलगुरूंचा राग ओढवून घेतला. बैठक सुरू असताना जैवतंत्रज्ञान, बॅचलर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि बॅचलर ऑफ काम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेवर प्र-कुलगुरू गौरीशंकर पाराशर यांनी ‘पॉईंट ऑफ ऑर्डर’, ‘पॉईंट ऑफ इन्फर्मेशन’ घेऊन प्रश्न विचारायला सुरुवात केली. व्यवस्थापन परिषदेचा मीही सदस्य असून मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, अशी भूमिका प्र-कुलगुरूंनी घेतल्यामुळे कुलगुरू ंना ते सहन झाले नाही आणि वादाला तोंड फुटले.
कुलगुरू म्हणाले, ‘व्यवस्थापन परिषदेचे इतर सदस्य कुलगुरू म्हणून माझी प्रतिष्ठा राखत नसतील तर सभागृह सोडून मी कुलपतींकडे तक्रार करीन’. प्र-कुलगुरूंचा आक्रस्ताळेपणा आणि कुलगुरूंचा संताप यामुळे वाद चांगलाच वाढला. त्यात व्यवस्थापन परिषदेवर असलेल्या व कुलपतीं नियुक्त सदस्य करुणा काळे यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी भांडण थांबवून स्पष्ट शब्दात सांगितले की, कोणत्याही सदस्याने त्यांचे व्यक्तिगत रागलोभ व्यवस्थापन परिषदेत आणून इतरांचा अमूल्य वेळ दवडवू नये.