Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘लो व्हीजन’च्या आधारे अंधांना दृष्टी देणे शक्य -डॉ. रमेश साठे
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

 

देशातील एकूण कायदेशीर अंधांपैकी ८० टक्के दृष्टीहीन पूर्णपणे नसतात त्यामुळे त्यांना ‘लो व्हीजन’ उपकरणांच्या आधारे थोडय़ा प्रमाणात दृष्टी देणे शक्य आहे. त्याद्वारे ते किमान लिखान, वाचन व टीव्हीवरील कार्यक्रम पाहू शकतात, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ‘लो व्हीजन’ तज्ज्ञ डॉ. रमेश साठे यांनी केले.
जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त ‘सक्षम’च्या विद्यमाने ‘लो व्हिजन’ उपकरणांचे निर्माते व संशोधक डॉ. रमेश साठे यांनी नुकतीच प्रतापनगर चौक येथील माधव नेत्रपेढीला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. रमेश साठे यांनी ‘लो व्हीजन’च्या माध्यमातून उपकरणाचे सादरीकरण केले. पूर्णपणे अंधत्व व दृष्टी यामधील टप्पा म्हणजे ‘लो व्हीजन’ आहे. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकांमध्ये पहिल्यांदा हा दोष आढळून आला. त्यानंतर जवळपास १९९२-९३ पर्यंत याबाबतीत कोणालाच माहिती नव्हती व त्यावर उपचार प्रचलित नव्हते. त्यानंतर मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘व्हीजन २०२०’अंतर्गत याचा अग्रक्रमाने सहभाग करण्यात आला व संघटनेच्या हाँगकाँगच्या कार्यशाळेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांची पुण्यामध्ये युनिक एज्युकेशनल इक्विपमेंट ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेने ‘लो व्हीजन’ रुग्णांना साहाय्य करण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाच्या आधारे काही उपकरणांची निर्मिती केली आहे. अमेरिकेत यावरील उपकरणे उपलब्ध आहेत मात्र त्यांची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे ही साधने स्वस्त किमतीत उपलब्ध करून दिली आहे. ‘लो व्हीजन’च्या रुग्णांना सहसा बारीक अक्षर वाचता येणे, दूरचे स्पष्ट न दिसणे, धुरकट दिसणे, वाचताना काळा डाग येणे आदी दोष असू शकतात. या दोषांची कारणे अनेक आहेत. सहसा चष्म्याने शस्त्रक्रियेने अथवा औषधाने देखील दृष्टीदोष दूर न होणे म्हणजे ‘लो व्हीजन’. अशांना या उपकरणाच्या साहाय्याने दृष्टी देण्याचे काम करीत असतो, असेही साठे म्हणाले. ज्यांना या ‘लो व्हीजन’चा लाभ घ्यायवयाचा असेल त्यांनी माधव नेत्र पेढीमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन सक्षमचे प्रमोद क्षीरसागर व डॉ, शिरीष दारव्हेकर यांनी केले आहे. ठ