Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘रिपब्लिकन पक्षाची शक्ती वाढवण्यासाठी नेत्यांनी एकत्र येण्याची गरज’
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

 

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन चळवळीचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील शक्तिशाली रिपब्लिकन पक्ष निर्माण करायचा असेल तर विविध गटात विखुरलेल्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांंनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे आवाहन समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांंनी केले आहे.
समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचा नुकताच उंटखाना परिसरात मेळावा आयोजित करण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून दलित आदिवासी तसेच तळागाळातील वंचित समाजाला सन्मानाचे अधिकार मिळाले. परंतु मागच्या पन्नास वर्षांत सत्ताधाऱ्यांच्या द्वेशमुलक वृत्तीमुळे मिळालेल्या अधिकाराचा समाजाला फायदा झाला नाही. एकीकडे दलितांचे आरक्षण संपवण्यासाठी प्रयत्न चालले आहे तर दुसरीकडे आरक्षणाची जबाबदारी ज्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांवर आहे ते मात्र सत्तेसाठी लढत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गुलामगिरी करीत आहेत.
दलितांच्या अधिकाऱ्यांच्या रक्षणासाठी रिपब्लिकन नेत्यांनी आता स्वार्थ बाजूला ठेवून एकत्रित येण्याची गरज आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसपासून मुक्त होऊन नेत्यांनी रिपब्लिकन चळवळीचे स्वतंत्र अस्तित्व टिकवले पाहिजे, असे मत समता सैमिक दलाचे अध्यक्ष किरण देवरे यांनी व्यक्त केले. परंपरागत चालत आलेल्या नेतृत्वाला तिलांजली देऊन आता नवीन नेतृत्वाला चालना दिली पाहिजे. लवकरच विधानसभा निवडणुका असल्यामुळे सर्व नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन ढेंगरे यांनी केले. यावेळी चंदू शंभरकर, संदेश बुलकुंडे, रवी जारोडे, नीलेश भगत, अविनाश गाडगे, संदीप शंभरकर, अशोक जारोंडे, आशीष ढोले, अनिल ढोबळे आदी उपस्थित होते.