Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

चार वर्षांनंतरही निलंबित वासवानीवर आरोपपत्र दाखल नाही
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

 

नागपूर सुधार प्रन्यासचे निलंबित अधीक्षक अभियंता नानक वासवानी यांना ४ वर्षांपूर्वी ५ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पकडले होते. त्यावेळी या प्रकरणाचा खूप गाजावाजा झाला. चार वर्षेउलटूनही वासवानी विरुद्ध पोलीस आरोपपत्र दाखल करू शकले नाहीत की त्यासाठी परवानगी सुद्धा घेतली नाही, हे विशेष.
वासवानी यांनी केलेल्या गैरव्यवहारामुळे नागपूर सुधार प्रन्यासची प्रतिमा मलीन झाली आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला कामावर घेतले तर, नागपूर सुधार प्रन्यासमध्ये गैरव्यवहारांना पुन्हा वाव मिळेल.
वासवानीचे आरोपपत्र अद्यापही दाखल का झाले नाही, याबाबत तर्कवितर्क उपस्थित होत आहे. कायदा सर्वासाठी सारखा असताना वासवानी विरुद्ध कारवाई का होत नाही, याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
वासवानी यांना पुन्हा प्रन्यासच्या सेवेत घेण्याची त्यांच्या काही हिंतचिंतकांची इच्छा नागरिकांनी हानून पाडावी, असे आवाहन मध्य नागपूर विकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना फॅक्स पाठवून व तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. संजय मुखर्जी, खासदार विलास मुत्तेमवार, प्रन्साचे विश्वस्त आमदार दीनानाथ पडोळे, प्रवीण भिसीकर, सुधाकर कोहळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना हे निवेदन सादर करण्यात आले. विश्वस्तांच्या सभेमध्ये सर्वानी एकमताने निर्णय घेऊन घोटाळेबाज अधीक्षक अभियंता नानक वासवानी यांना कामावर घेऊ नये, अशी विनंती आघाडीने केली आहे. त्यांना पुन्हा सेवेत घेतल्यास मध्य नागपूर विकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येईल व वेळ पडल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असे आघाडीचे अध्यक्ष भूषण दडवे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.