Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नव्या वेतन करारासाठी एसटी कामगारांचे आंदोलन सुरू
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

 

एसटी कामगारांच्या वेतन कराराची मुदत ३१ मार्चला संपली असून नवीन वेतन करार सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार करण्यात यावा, या मागणीसाठी १० जूनपासून मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर एसटी कामगारांचा वेतन करार त्यानुसारच व्हायला हवा. त्याबाबत यापूर्वी एसटी प्रशासनाने आश्वासनही दिले होते मात्र, आता त्यानुसार करार करण्यास नकार दिला. त्यामुळे ४ जूनला राज्यभरातील कामगारांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.
यापूर्वीचे वेतन करार चौथ्या व पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार झाले असल्याने तसेच, मागील दोन्ही करारात वेतनश्रेणी सुधारली नसल्याने सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन करार होणे आवश्यक आहे, अशी मागणी संघटनेने केली आहे. एसटी नफ्यात आणण्यामध्ये एसटी कामगारांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे वेतन कराराबाबत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सकारात्मक निर्णय व्हावा. कराराची निर्माण झालेली कोंडी दूर करण्यासाठी १० जूनपासून आझाद मैदानावर सुरू झालेल्या आंदोलनात मोठय़ा संख्येने कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.