Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अनेक शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणीपासून वंचित,
गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

 

नागपूर, हिंगणा व काटोल येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीपासून वंचित राहावे लागले असून या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष लिलाधर ठाकरे यांनी केली. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भरकाडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
एकाच संवर्गात बारा वर्ष पूर्ण करणाऱ्या शिक्षक, मुख्यध्यापक, पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख अशा ७२० जणांना वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भरकाडे यांनी दिला. वेतनश्रेणी मंजूर करण्यासाठी तीनही पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून प्रस्ताव मागितले होते परंतु अनेक शिक्षकांचे प्रस्ताव पाठविण्यात आले नाही. त्यामुळे वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली नाही. नागपूरचे गटशिक्षणाधिकारी किशोर चौधरी, हिंगण्याचे रत्नदीप सोनपिंपळे व काटोलचे नंदलाल गायधनी या तीनही गटशिक्षणाधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रस्ताव सादर करण्याबाबत विनंती केली होती पण, त्यांनी विहित मुदतीत ते प्रस्ताव पाठविले नाही. त्यामुळे अनेक शिक्षक वेतनश्रेणीबाबत वंचित राहिले आहे. या तीनही गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लिलाधर ठाकरे यांनी केली. यावेळी सुरेश पाबळे, विलास काळमेघ, दिनकर उरकांदे, युवराज उमरेडकर, सुरेंद्र कोल्हे, घनश्याम पाटील उपस्थित होते.