Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

येरे येरे पावसा..
चार दिवस अवकाश
नागपूर,१० जून/ प्रतिनिधी

 

येणार येणार म्हणून ज्याच्याक डे डोळे लागले तो मॉन्सून आणखी चार दिवसतरी विदर्भात येण्याची शक्यता नसल्याने ‘येरे येरे पावसा’ अशी विनंती करण्याची वेळ शेतकरी आणि उकाडय़ाने त्रस्त झालेल्या नागपूरकरांवर आली आहे. हवामान खात्यापासून तर ग्रामस्थांचा विश्वासास पात्र ठरलेल्या ‘भेंडवळ’च्या पाहणीचा अंदाज मान्सून वेळेत येणार असा असताना मान्सूनने मात्र ऐन वेळेवर विदर्भाकडे पाठ फिरवली आहे. कधी हलका तर कधी जोरात येऊन मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांच्याच नव्हे तर, उकाडय़ाला उबलेल्या नागरिकांच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मागील पावसाळ्यातील अनुभव पाठीशी असल्याने हलक्या का असेना या सरींमुळे शेतकऱ्यांपासून तर पूरनियंत्रण करणाऱ्यांपर्यंत सर्वानी तयारीला सुरुवातही केली होती. वाट होती ती पावसाची. सात जूनपासून सुरू होणाऱ्या मृग नक्षत्राची. या दिवशी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. कोकणात त्याच्या आगमनाची नोंदही झाली पण, तेथून तो अद्याप पुढे सरकला नाही आणि पुढील चार दिवस तरी तो तेथून हलण्याची शक्यता नाही, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मान्सून विदर्भात सरकण्यासाठी अनुकूल वातावरणच निर्माण न झाल्याने त्याचे आगमन लांबल्याचे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रोज आकाशात ढगांची गर्दी होते, गार वारेही सुटतात, हलक्या सरींनी क्षणभर आशाही पल्लवीत होतात पण, नंतर निराशाच पदरी पडते. एकीकडे पावसाची पाठ तर दुसरीकडे वाढते उन्हं यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचीही चिंता वाढली आहे. आज विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५ अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. त्या खालोखाल गोंदियात ४४.३, नागपूर ४३.७, अकोल्यात ४२.४ आणि अमरावतीत ४०.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.