Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचा एमबीएकडे कल
मंदीमुळे ‘प्लेसमेन्ट’चे प्रमाणही कमी
नागपूर, १० जून/ प्रतिनिधी

 

आर्थिक मंदीमुळे मोठय़ा प्रमाणात रोजगार गमाविलेल्या अभियांत्रिकी शाखेच्या तरुणांनी नवी नोकरी मिळवण्यासाठी एमबीएसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, आर्थिक मंदीचा ‘जॉब प्लेसमेन्ट’वरही परिणाम झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी हे प्रमाण २५ टक्के कमी झाल्याचा दावा एमबीए कॉलेज व्यवस्थापनाने केला आहे.
मागील काही वर्षांचा एमबीएकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल पाहता त्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी राहत आले आहे. कारण, त्यांना शिक्षण पूर्ण केल्याबरोबरच मोठय़ा कंपन्यांमध्ये उच्चपदावर काम करण्याची संधी चालून येत होती. देशातच नव्हे तर, विदेशातील मोठय़ा कंपन्यात या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असत. मात्र, जागतिक मंदीमुळे सारेच चित्र पालटले. मंदीचा परिणाम विदेशात अधिक झाल्याने अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. यातही अभियांत्रिकी शाखेच्या विध्यार्थ्यांची संख्या अधिक होती. हे सर्व तरुण भारतात परतले असून त्यांनी नवीन नोकऱ्या शोधण्यासाठी एमबीएचा पर्याय निवडला आहे.
सध्या नवीन शैक्षणिक वर्षांसाठी एमबीएची प्रवेश प्रक्रिया पूर्ण व्हायची असली तरी यंदा ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व परीक्षा दिल्या त्यात अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचा समावेश मागील वर्षांच्या तुलनेत अधिक असल्याचे एमबीएच्या विविध महाविद्यालयांचा कल घेतला असता स्पष्ट झाले. यासंदर्भात एनवायएसएस इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्ट अ‍ॅन्ड रिसर्चच्या प्रो. राम काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही याला दुजोरा दिला. मात्र, प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच याबाबत स्पष्टपणे सांगता येईल, असे ते म्हणाले. अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी एमबीएकडे वळण्याचे कारण फक्त मंदीच नाही तर, इतरही कारणे आहेत, असेही ते म्हणाले. अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांमुळे त्यांना विविध क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थी कंपन्यांना मिळू लागल्याने त्यांचाही कल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडेच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मंदीमळे एमबीएच्या जॉब प्लेसमेन्टवरही परिणाम झाला आहे. नागपूर येथे एमबीएचे २२ कॉलेजेस आहेत व सरासरी १७०० जागा आहेत. दरवर्षी या महाविद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना टाटा कन्सल्टन्सी, एक्सीस बँक, एचडीएफसी, होडाफोन, अशोक लेलॅन्ड, आटीसी लि., आयसीआयसीआय, रिलायन्स मनी, कोटक सिक्युरिटीस, एशियन पेन्टस, सीटी बँक, एचसीएल इन्फोसीस, विको लेबॉरटरीज यासारख्या मोठय़ा कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होते. तीन ते साडेतीन लाख रुपये, असे पॅकेज त्यांना देण्यात येते. यंदा मंदीचा फटका याला बसला आहे. यासंदर्भात एनवायएसएसचे ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेन्ट ऑफिसर प्रो. अयुब यांना विचारणा केली असता त्यांनीही याला दुजोरा दिला. दरवर्षी मार्च महिन्यातच १०० टक्के जॉब प्लेसमेन्ट व्हायचे. यावर्षी एप्रिलमध्ये प्रक्रियेला सुरुवात झाली आणि आतापर्यंत फक्त ७५ टक्केच मुलांना संधी मिळाली, असे ते म्हणाले. मागील वर्षीच्या तुलनेत कंपन्यांनी पॅकेजसही कमी केले आहे. यावर्षी अडीच लाखावर ते आले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी कंपन्यांच्या ‘ऑफर्स’ नाकारल्या असून स्वतच्या व्यवसायात वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रो. अयुब म्हणाले.