Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कांद्याने आणले डोळ्यात पाणी
नागपूर, १० जून/प्रतिनिधी

 

राज्यातील कांदा उत्पादकांच्या कांद्याला इतर राज्यात मोठय़ा प्रमाणात मागणी आणि चांगले भाव मिळत असल्यामुळे त्याठिकाणी मोठय़ा प्रमाणात कांदा पाठवणे सुरू असल्याने नागपूरच्या बाजारपेठेत टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. गुजरातमध्ये ‘रेडी टू’ प्रकारचे खाद्यपदार्थ आणि मसाले तयार करून परदेशात निर्यात करणाऱ्या कंपन्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे या कंपन्यांकडून कांद्याची मोठय़ा प्रमाणात मागणी असते. त्यातच यंदा गुजरातमध्ये कांद्याचे पीक कमी झाल्याने महाराष्ट्रातील उत्पादकांच्या कांद्याला मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. तसेच गुजरातमध्ये चांगले भाव मिळत असल्यामुळे एप्रिल ते जून या काळात कळमना मार्केटमध्ये येणारा कांदा गुजरातकडे वळविण्यात आला आहे. यामुळे सध्या बाजारात कांद्याची टंचाई निर्माण होऊन भाववाढ झाली आहे. महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, अचलपूर, अकोट, परतवाडा या भागात कांद्याचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात होते. मात्र, या भागातील उत्पादकांना त्यांच्या मालाला गुजरातमध्ये चांगले भाव मिळत असल्याने कांदा गुजरातकडे पाठविला जात असल्याचे कळमना बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.गुजरातमधील काही कंपन्याही महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांकडून कांद्याची थेट खरेदी करीत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सध्या ठोक बाजारात लाल कांदा ५ ते ७.५० रुपये प्रति किलो, तर पांढरा कांदा ८ ते १० रुपये किलो आहे. चिल्लर विक्रेते तर कांद्याची विक्री १४ ते १६ रुपये किलोने करीत आहेत. गेल्या आठ दिवसात परिस्थिती आणखी वाईट झाली असल्याचे बाजारातील विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
कांदा हा स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक असून याचा दैनंदिन वापर मोठय़ा प्रमाणात होतो. त्यामुळे कांद्याची भाववाढ झाल्यावर सर्वसामान्यांचे बजेट चांगलेच कोसळते. काही महिन्यांपूर्वी ठोक बाजारात लाल कांदा २ ते ४ आणि पांढरा कांदा ३ ते ५ रुपये किलोने उपलब्ध होता. मात्र, आता नागपूरच्या बाजारात मिळणाऱ्या भावापेक्षा चांगले भाव गुजरातमध्ये मिळत असल्याने उत्पादक त्या भागाकडे आकर्षित होत आहेत. सध्या भाव कमी होण्याची शक्यता नसली तरी सलग पाऊस पडल्यास भाव कमी होण्याची शक्यता असल्याचे कळमना बाजारातील विक्रेत्यांनी सांगितले. पुढील काही दिवस मागणीच्या तुलनेत कांदा बाजारात आला नाही, तर कांद्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता बाजारातून व्यक्त करण्यात येत आहे.