Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कृषी विद्यापीठाची डुलकी
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

 

न्युनतम तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि अधिकतम तापमान १० अंश सेल्सिअस, असा जावईशोध कृषी विद्यापीठाने लावला असून या शोधाला वेबसाईटवर प्राधान्याने जागाही देण्यात आलेली आहे.
डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ वैदर्भीय हवामानातील संशोधनापासून ते सुधारित वाणांपर्यंत संशोधन केल्याचा नियमित दावा करीत असते. यावेळी तर कृषी विद्यापीठाने तापमानात एक नवीन शोध लावून एकप्रकारे वैदर्भीय जनतेला मोठा दिलासाच दिला आहे. वेबसाईट उघडल्याबरोबर उजव्या बाजूला न्युनतम तापमान ३६ अंश सेल्सिअस असून अधिकतम तापमान १० अंश सेल्सिअस दिलेले आहे. तापमानाच्या बाबतीत विदर्भाची खास ओळख आहे. वैदर्भीय एवढय़ा तापमानात जगतात कसे, हा इतर प्रांतीयांसाठी कौतुकाचा विषय असतो. मात्र, कृषी विद्यापीठ या तापमानाबाबतीत फारसे गंभीर नसल्याचे त्यांच्या वेबसाईटवरील माहितीवरून दिसून येते. कित्येक दिवसांपासून हेच तापमान वेबसाईटवर दिसून येते. (\६६६.स्र्‘ि५.ूं.्रल्ल/६ीुं्रेिल्ल) या वेबसाईटवर चुकीची माहिती दिली असून यापूर्वी दोन वेबसाईट सुरू असताना ही तिसरी वेबसाईट सुरू करण्यामागची विद्यापीठाची भूमिका अनाकलनीय आहे. कारण, तिन्ही वेबसाईटवर कमी-अधिक प्रमाणात तीच ती माहिती दिलेली असून कित्येक ‘अटॅचमेंट’ उघडतही नाही.
कमी वेळेत, अचूक आणि अद्ययावत माहिती पोहोचवणे हा वेबसाईटचा मुख्य उद्देश असतो. बेवसाईटवर देण्यात येणारी माहिती प्रमाण मानली जाते. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात अनेक उच्चशिक्षित शेतकरी संगणकाच्या माध्यमातून शेती व लागवडीसंदर्भात वेबसाईटवर दिलेली माहिती पाहून निर्णय घेतात. विद्यापीठ सुशिक्षितांचे क्षेत्र मानले जाते. मात्र, सुशिक्षितांच्या अशा डुलक्या हास्यास्पद ठरतात. वैदर्भीय ४४ ते ४७ अंश सेल्सिअस तापमानात होरपळून निघत असताना कृषी विद्यापीठाच्या लेखी मात्र ते काश्मीर ठरले आहे, हे विशेष.