Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विमानतळावर प्रवाशांचा कांगावा
नागपूर, १० जून/प्रतिनिधी

 

विमानात बसण्यासाठी लागणारे बोर्डिग पास असतानाही काही प्रवाशांना विमानात बसू न दिल्याने आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांनी गोंधळ घातला. यामुळे काहीवेळ विमानतळावर तणाव निर्माण झाला होता. मात्र, संबंधित विमान कंपनीचे अधिकारी आणि विमानतळ प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे स्थिती आटोक्यात आली.
आज सकाळी आयसी १३० हे इंडियन एअरलाईन्सचे नागपूर-मुंबई विमान मुंबईला जाण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र, १० ते १५ प्रवाशांकडे विमानात बसण्यासाठी लागणारे बोर्डिग पास असूनही त्यांना विमानात चढू देण्यात आले नाही. याबाबत प्रवाशांनी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या इंडियन एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, विमानातील सर्व आसने आधीपासूनच आरक्षित असल्याने आता बोर्डिग करता येणार नाही, असे सांगण्यात आले. यावर बोर्डिग पास असूनही विमानात बसू न दिल्याने प्रवाशांनी गोंधळ घालणे सुरू केले. यावेळी विमानात चढू न देण्यात आलेल्या सर्व प्रवाशांना त्यांच्या आरक्षणाच्या ५० टक्के रक्कम परत करण्यात आली व त्यांना मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने पाठविण्यात आले.
मुंबईला जाणाऱ्या सर्व १४४ आसने आधीपासूनच आरक्षित असल्यावरही अतिरिक्त आरक्षण का करण्यात आले, याबाबत इंडियन एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, गेल्या काही महिन्यांपासून विमान कंपन्यांना मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे कंपन्यांनी यावर तोडगा म्हणून ‘ओव्हर बुकिंग’ म्हणजे आसन क्षमतेपेक्षा अधिक बुकिंग करणे सुरू केले आहे. याप्रकारचे आरक्षण करताना प्रवाशांना आधी सांगण्यात येते, कारण विमानातील सर्व आसने आरक्षित झाल्यास, या कोटय़ातून करण्यात आलेले आरक्षण आपोआपच रद्द ठरवण्यात येते. तसेच ज्या प्रवाशांचे आरक्षण रद्द झाले आहे, अशा प्रवाशांना अर्धी रक्कमही परत करण्यात येत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.