Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बियाणे, खताची विक्री मंदावली
नागपूर, चंद्रपूर, १० जून/प्रतिनिधी

 

अद्याप पावसाळा सुरू न झाल्याने आणि मागील वर्षीप्रमाणेच यंदाही पाऊस घोळ करतो की काय या धास्तीने कालपर्यंत बियाणांच्या बाजारात गर्दी करणाऱ्या शेतकऱ्यांनी हंगामाच्या तोंडावर मात्र बाजाराकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे व्यापारीही अडचणीत सापडले आहेत.
हवामान खात्याने यंदा मान्सून वेळेपूर्वी येणार असा अंदाज व्यक्त केला होता. पश्चिम बंगालमध्ये आलेल्या वादळामुळे तो लांबला पण तरीही तो ७ जूनपर्यंत महाराष्ट्रात येईल, अशी अपेक्षा हवामान खात्याला होती, त्यामुळेच मृग नक्षत्राच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते. मात्र मृग नक्षत्राचे दोन दिवस कोरडे गेले पण तापमानानेही चाळीशी गाठली. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. मागील हंगामात मृगाचा पाऊस वेळेत सुरू झाल्याने घाईगर्दीने पेरणी केली होती पण, नंतर पावसाने दगा दिल्याने ती उलटली, त्यामुळे त्याचा सर्व खर्च व्यर्थ ठरला, यंदाही त्याला ही भीती आहे, त्यामुळेच तो अद्याप बाजारात जाण्याची हिंमत करीत नाही, विदर्भात हे चित्र सार्वत्रिक आहे. हंगामापूर्वी शेतकऱ्यांनी टंचाईच्या भीतीपोटी काही प्रमाणात बियाणे आणि खते खरेदीसाठी गर्दी केली होती. पण प्रत्यक्ष पेरणीच्या वेळी खरेदी वेगळी असते, त्यावेळी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळते, यंदा हे चित्र नाही. नागपूरच्या बाजारपेठेत फेरफटका मारला असता व्यापाऱ्यांनीही पाऊस न आल्याने शेतकरी खरेदीसाठी बाहेर पडला नाही, असे सांगितले.
आमचे चंद्रपूर येथील प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी राज्यात ७ जूनला मान्सूनचे आगमन होते. यंदाही ५ ते ७ जून दरम्यान पावसाचे आगमन होईल, असा अंदाज जिल्हा कृषी अधीक्षक व कृषी विकास अधिकारी यांनी बैठकीत वर्तविला होता. सिंदेवाही येथील धान संशोधन केंद्राचे अधिकारी व हवामान खात्यानेही याच काळात पाऊस कोसळेल हे सांगितल्याने कृषी विभाग कामाला लागला होता. जिल्हय़ातील कृषी केंद्र संचालकांनी वेळेवर अडचण नको म्हणून खते व बियाणांचा मुबलक साठा दुकानात साठवून ठेवला. मात्र, यंदाही पावसाने दगाबाजी करीत ७ जूनचा मुहूर्त टाळला आहे. शेतकरी नांगरणी वखरणी करून आकाशाकडे एकटक डोळे लावून पाहत आहे. पावसाचे ढग आकाशात एकत्र येतात आणि वादळासोबत दूरवर निघून जातात. मागील तीन दिवसांपासून पावसाचा हा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांसोबत आता कृषी केंद्र संचालकही अडचणीत सापडला आहे. हवामान खात्याने यंदा चागल्या पावसाचे भाकीत वर्तविल्याने कृषी केंद्र संचालकांनी बियाणे व खतांचा मुबलक साठा करून ठेवला आहे. बाजारात सोयाबीन, धान, कपासी व डीएपी खताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी खते व बियाणांची खरेदी करून ठेवली असून आता प्रतीक्षा आहे पावसाची. पाऊस पडत नसल्याने आणि तापमानात प्रचंड वाढ झाल्याने मागील तीन दिवसांपासून खते व बियाणांची खरेदी विक्रीचा व्यवहार थंडावला आहे. साधारणत: ७ जून नंतर बियाणे व खतांची मागणी वाढते. पावसाअभावी शेतकऱ्यांना सोयाबीन घ्यायचे की कपासी यावरून संभ्रमावस्था असल्याने सोयाबीन, कपासी व धान या तिन्हीची खरेदी मंदावली आहे. या दिवसात कृषी केंद्राच्या समोर शेतकऱ्यांच्या रांगा दिसतात, खतांसाठी कास्तकारांची बाजारात गर्दी दिसते, मात्र तीन दिवसांपासून बाजार पूर्णत: ओस पडलेला आहे. बाजारात धानाचा पुरेसा साठा उपलब्ध असताना शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरविल्याने कृषी केंद्र संचालक हातावर हात देऊन बसलेले चित्र येथे बघायला मिळत आहे. खते व बियाणांची खरेदी विक्री मंदावल्याने कृषी केंद्रधारकांचा समोरील व्यवहार थांबला आहे. कृषी केंद्र संचालकांचे कोटय़वधी रुपये या व्यवहारात फसलेले आहेत. येत्या एक दोन दिवसात पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिघडेल, असे येथील काही कृषी केंद्र चालकांचे मत आहे. साधारणत: पहिला पाऊस झाल्यानंतर सोयाबीन पेरणीला सुरुवात होते. परंतु येथे पहिलाच पावसाला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन पीक घ्यायचे की नाही असा प्रश्न पडला आहे. रासायनिक व सेंद्रीय खतांची विक्री देखील मंदावली आहे. पेरणीनंतर पिकांना रासायनिक खत द्यावे लागते. यंदा शेतकऱ्यांकडून रासायनिक व सेंद्रीय या दोन्ही खतांना सारखीच मागणी असल्याने कृषी केंद्र चालकांनी भरपूर खताचा साठा करून ठेवला आहे. पाऊस वेळेत आला नाही तर खतांचा साठा दुकानात तसाच राहील ही चिंतादेखील कृषी केंद्र संचालकांना लागली आहे.
नामांकित कंपन्यांनी तर एजंटच्या माध्यमातून ग्रामीण भागात जावून बियाणे व खते विक्री करणे सुरू केले आहे. खताचा साठा शिल्लक राहू नये व तोटा सहन करावा लागू नये म्हणून कमीशन एजंट नेमून अशा पद्धतीने विक्री करावी लागत असल्याचे या कंपनीचे प्रतिनिधी सांगत आहे. एकूणच पावसाअभावी कृषी केंद्र संचालक व शेतकरी अडचणीत सापडला आहे.