Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मतदार ओळखपत्रातील सावळा गोंधळ चव्हाटय़ावर
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

 

जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदार छायाचित्र ओळखपत्र मोहीम राबवण्यात येत असताना लोकसभा निवडणुकीपूर्वी काढलेल्या मतदारांच्या छायाचित्र ओळखपत्रातील सावळा गोंधळ भाजपने उघडकीस आणला आहे. ओळखपत्रावरील नावांमध्ये अनेक चुका असून पती किंवा वडिलांच्या नावाऐवजी आडनावच नमूद करण्यात आले आहे.
मतदारांकडे ओळखपत्र नसलेल्यांना अर्जासह दोन छायाचित्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करायची होती. यास शहरातील मोठय़ा प्रमाणात मतदारांनी प्रतिसाद देऊन ओळखपत्रासाठी अर्ज केले. लोकसभा निवडणुकीपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, आता ओळखपत्र वितरित करण्यात येत असल्याने त्यातील त्रुटी उघडकीस आल्या आहेत. मतदारांच्या नावातच चूक आहे.
पतीच्या नावाऐवजी दोन वेळा आडनाव आणि नंतर संबंधितांचे नाव नमूद केले असल्याकडे लक्ष वेधून, ओळखपत्र बघितल्यानंतर ‘हसावे की रडावे’ असा सवाल भाजपचे प्रशासकीय समन्वयक रमेश दलाल आणि सामाजिक कार्यकर्ते वसंत बारड यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केला आहे. यासाठी पुराव्या दाखल त्यांनी मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील १६ मतदारांची ओळखपत्रांच्या सत्यप्रती निवेदनासोबत जोडल्या.
मतदार ओळखपत्रातील या त्रुटय़ा दुरुस्त करण्यासाठी मतदारांना निवडणूक कार्यालयात चकरा माराव्या लागतील. या ओळखपत्रांचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कोणती कारवाई करणार, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे, असेही दलाल व बारड यांनी म्हटले आहे.
या चुकांमुळे मतदारांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. याची जबाबदारी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि अशा चुका वारंवार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही दलाल आणि बारड यांनी केली आहे.