Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नागपूरच्या दोन बालसंशोधकांचे ‘नासा’च्या शास्त्रज्ञांकडून कौतुक
परग्रहांवरील संभाव्य जीवसृष्टीवर संशोधन
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

 

‘सौर मंडळातील इतर ग्रहांवर पृथ्वीसारखीच वसाहत होऊ शकते का’\? विचार केल्यास काहीशा अशक्य वाटणाऱ्या पण, वैज्ञानिकांच्या लेखी शक्य असलेल्या प्रश्नांवर जगापुढे सकारात्मक चित्र निर्माण करण्याची किमया नागपुरातील दोन बालसंशोधकांनी साधली. आहे ना आश्चर्य.! पण, अख्खी हयात या प्रकारच्या संशोधन कार्यात घालवलेल्या संशोधकाला हेवा वाटेल असेच काही शंतनू माणके आणि जय पात्रीकर या सोमलवार निकालसच्या दोघा विद्यार्थ्यांनी करून दाखवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या कामगिरीसाठी जगभरातील नामवंत शास्त्रज्ञांनी अवाक होऊन कौतुकाने त्यांची पाठ थोपटली.
इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांचा विचार केला तर त्याचे खेळण्या बागडण्याचे वय. पण या वयात आकाशात पृथ्वीसारखी जीवसृष्टी निर्माण होऊ शकते का हा ध्यास उराशी बाळगत त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व शक्य अशक्य बाबींचा अभ्यास करून ती कशी उभारता येईल याचे सकारात्मक चित्र या शंतनू आणि जयने जगापुढे उभे केले आहे. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून मांडलेले निष्कर्ष इतके वस्तुनिष्ठ आहेत की, ‘नासा’ लाही त्याची दखल घ्यावी लागली. त्यामुळे ‘नासा’ने त्यांच्या ‘ई-नेक्स्ट’ प्रोजेक्टला पहिला पुरस्कार दिला. तसेच त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचा अमेरिकेतील ओरलॅन्डो शहरात आयोजित ‘स्पेस सेटलमेंट’ विषयावर ‘इंटरनॅशलन स्पेस डेव्हलपमेंट कॉन्फरन्स’मध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी या दोघांनी त्यांच्या प्रोजेक्टचे या परिषदेत सादरीकरण केले, तर सर्व शास्त्रज्ञ अवाक् राहिले. ‘स्पेस सेटलमेंट’ म्हणजे पृथ्वीसारखी वसाहत अवकाशात तयार होऊ शकते का या विषयावर जगभरातील खगोलशास्त्र सर्व शक्यतांचा अभ्यास करीत आहेत. यासाठी नासातर्फे स्पेस सेटलमेंट विषयावर गेल्या दहा वर्षांपासून परिषद आयोजित करण्यात येते. यात जगभरातील शास्त्रज्ञ सहभागी होतात. तसेच या परिषदेत या विषयावर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शोधप्रबंध, सादरीकरण मागविण्यात येतात. त्यामुळे शंतनू आणि जयने या परिषदेत अव्वल क्रमांक पटकावून अवघ्या जगाला त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडले आहे.
या दोघांनी सादर केलेला प्रोजेक्ट या परिषदेत सादर करण्यात आलेल्या इतर संशोधनापेक्षा अनेक आघाडय़ांवर सरस ठरला आहे. ई-नेक्स्ट प्रोजेक्टचे वैशिष्टय़ विचारले असता शंतनू म्हणाला, अवकाशात विविध प्रक्रियामुळे मोठय़ा प्रमाणात किरणोत्सर्ग तयार होतो. जो पृथ्वीसारख्या वातावरणासाठी अत्यंत घातक असतो. त्यामुळे किरणोत्सर्गाची तीव्रता कमी करण्यासाठी ‘ओझो-ऑक्सीजन’ साखळी तयार कशी करता येईल याची माहिती शंतनू आणि जयने त्यांच्या सादरीकरणाद्वारे जगभरातील शास्त्रज्ञांपुढे मांडली. तसेच अवकाशात जीवसृष्टी निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या यासारख्या इतरही अनेक शक्यता त्यांनी वैज्ञानिकदृष्टय़ा कशा शक्य आहेत, हे सिद्ध करून दाखविले आहेत.
सतत तीन दिवस चाललेल्या या परिषदेत त्यांनी ओरल, पोस्टर आणि स्लाईडस द्वारे सादरीकरण केले. उल्लेखनीय म्हणजे प्रेझेंटेशन करतानाही या दोघांनी कुठल्याही नोटस्चा आधार घेतला नाही. नेमकी हीच त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरल्याचे शंतनूने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. एवढय़ा मोठय़ा व्यासपीठावर आणि जगभरातील नामवंत शास्त्रज्ञांपुढे प्रोजेक्ट सादर करण्याचा अनुभव अविस्मरणीय असल्याचे शंतनूने सांगितले. या प्रोजेक्ट आणि भविष्यातील कार्यासाठी सर्वच शास्त्रज्ञ आणि उपस्थितांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. भविष्यात याच क्षेत्रात दोघांनाही करिअर करण्याची इच्छा आहे.