Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

येरे येरे पावसा..
चार दिवस अवकाश
नागपूर,१० जून/ प्रतिनिधी
येणार येणार म्हणून ज्याच्याक डे डोळे लागले तो मॉन्सून आणखी चार दिवसतरी विदर्भात येण्याची शक्यता नसल्याने ‘येरे येरे पावसा’ अशी विनंती करण्याची वेळ शेतकरी आणि उकाडय़ाने त्रस्त झालेल्या नागपूरकरांवर आली आहे. हवामान खात्यापासून तर ग्रामस्थांचा विश्वासास पात्र ठरलेल्या ‘भेंडवळ’च्या पाहणीचा अंदाज मान्सून वेळेत येणार असा असताना मान्सूनने मात्र ऐन वेळेवर विदर्भाकडे पाठ फिरवली आहे.

योगिता ठाकरे मृत्यू प्रकरणाची सुनावणी लांबणीवर
कारमालकाचे निवेदन न नोंदवल्याबद्दल कोर्टाची विचारणा
नागपूर, १० जून/ प्रतिनिधी

गडकरी वाडय़ाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळलेल्या योगिता ठाकरे हिच्या संशयास्पद मृत्यूच्या सी.बी.आय.मार्फत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेत पोलिसांनी सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी वेळ मागून घेतल्यामुळे याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १८ जूनपर्यंत पुढे ढकलली. ज्या कारमध्ये मृतदेह आढळला त्या कारच्या मालकाचे निवेदन पोलिसांनी अद्याप का नोंदवले नाही, अशी विचारणा आजच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने सरकारी वकिलांना केली.

जूनअखेपर्यंत खावटीच्या धान्याचे वाटप करा
उच्च न्यायालयाचे निर्देश
नागपूर, १० जून / प्रतिनिधी
राज्यातील आदिवासींना पावसाळ्यापूर्वी खावटीच्या धान्याचे वाटप करण्यात येत नसल्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली असून; जून महिनाअखेपर्यंत हे वाटप पूर्ण करावे आणि धान्यवाटपाला झालेल्या विलंबासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची माहिती देणारे शपथपत्र दाखल करावे, असा आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिला आहे.

अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचा एमबीएकडे कल
मंदीमुळे ‘प्लेसमेन्ट’चे प्रमाणही कमी
नागपूर, १० जून/ प्रतिनिधी
आर्थिक मंदीमुळे मोठय़ा प्रमाणात रोजगार गमाविलेल्या अभियांत्रिकी शाखेच्या तरुणांनी नवी नोकरी मिळवण्यासाठी एमबीएसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, आर्थिक मंदीचा ‘जॉब प्लेसमेन्ट’वरही परिणाम झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी हे प्रमाण २५ टक्के कमी झाल्याचा दावा एमबीए कॉलेज व्यवस्थापनाने केला आहे. मागील काही वर्षांचा एमबीएकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल पाहता त्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी राहत आले आहे.

कांद्याने आणले डोळ्यात पाणी
नागपूर, १० जून/प्रतिनिधी

राज्यातील कांदा उत्पादकांच्या कांद्याला इतर राज्यात मोठय़ा प्रमाणात मागणी आणि चांगले भाव मिळत असल्यामुळे त्याठिकाणी मोठय़ा प्रमाणात कांदा पाठवणे सुरू असल्याने नागपूरच्या बाजारपेठेत टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. गुजरातमध्ये ‘रेडी टू’ प्रकारचे खाद्यपदार्थ आणि मसाले तयार करून परदेशात निर्यात करणाऱ्या कंपन्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे.

कलावती यांच्या पदरी दिल्ली दरबारी निराशा
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

वर्षभरापूर्वी घरी येऊन आस्थेने विचारपूस करणारे काँग्रेसचे सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्या भेटीनंतर आशेचा किरण दिसलेल्या यवतमाळ जिल्ह्य़ातील कलावती यांच्या पदरी दिल्ली दरबारी मात्र निराशा पडली. ‘राहुल गांधी हे सत्तारूढ पक्षाचे असल्याने ते सतत व्यस्त असतात. यामुळे त्यांना यापुढे भेटणार नाही आणि तशी इच्छाही नाही’, असा निर्धार त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

विकासाची गंगा पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची खंत ..
प्रशांत देशमुख

नव्या परिसीमनामुळे गांधीभूमी सेवाग्राम आश्रम परिसर वगळला असला, विनोबांच्या पवनार आश्रमाचा आशीर्वाद लाभलेला वर्धा विधानसभा मतदारसंघ आता शहरी तोंडवळ्याचा झाला आहे. वर्धा विधानसभा मतदारसंघ एक विक्रमही राखून आहे. शेकापचे गणपतराव देशमुख यांच्यापाठोपाठ राज्यात सर्वात अनुभवी तसेच, राज्यात काँग्रेसचा सर्वात ज्येष्ठ आमदार हे बिरूद मिरवणारे आमदार प्रमोद शेंडे यांचा वर्धा मतदारसंघ त्यांच्या कर्तृत्वानेच पायाभूत सेवांचा आगर ठरला आहे.

सुदृढ बालकांसाठी..
नागपूर, १० जून/ प्रतिनिधी

बाळाचा जन्म एकप्रकारचा उत्सवच. आपल्यासाठी हा उत्सव असला तरी काही प्रसंगी आई व अर्भकास अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते. क्वचित प्रसंगी प्राणही गमवावा लागतो. विकसित राष्ट्रांच्या मानाने आजही भारतात होणाऱ्या गरोदर माता व अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण गंभीर स्वरूपाचे आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी विविध योजना राबवत असते. सोबतच अनेक संस्था, स्वयंसेवी संघटनाही या क्षेत्रात सक्रिय असल्याच्या दिसून येतात.

राज्यातील शंभर गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न -पोपटराव पवार
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातंर्गत ‘सुवर्ण महोत्सवी समृद्ध गाव योजने’ मध्ये येत्या तीन वर्षांत राज्यातील शंभर गावांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने शासन पातळीवर प्रयत्न करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्य़ातील तीन गावांची निवड करणार असल्याची माहिती हिवराबाजार गावातील सरपंच पोपटराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. संत गाडगेबाबा योजनेतर्गंत रामटेक तालुक्यातील ब्रांद्रा या गावाची पाहणी करून नागपुरात परतल्यावर पोपटराव पवार पत्रकारांशी बोलत होते.

आकर्षक छत्र्या बाजारात
नागपूर, १० जून/ प्रतिनिधी

मृगनक्षत्राला प्रारंभ झाला असून बाजारपेठेत पावसापासून संरक्षण करणाऱ्या वस्तूंची दुकाने थाटली आहेत. यंदा उन्हाचा तडाखा बघता पाऊसही चांगला पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. छत्री उद्योजकांनी यावर्षी आकर्षक कमी भावाच्या छत्र्या विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. केवळ पावसावरच या उद्योगाचे भवितव्य अवलंबून असल्याने गेल्या चार ते पाच वर्षांपासून छत्री उद्योग मंदीत सापडला होता. गेल्यावर्षी चांगला पाऊस पडल्याने छत्री उद्योगाने तग धरला होता.

राज्य सरकार मागासवर्गीयांचा अनुशेष भरणार
प्रधान सचिवांच्या उपस्थितीत निर्णय
नागपूर, १० जून / प्रतिनिधी
राज्य सरकारच्या अखत्यारीतील विविध प्रशासकीय विभागात मागासवर्गीयांचा १ लाख ९५ हजाराचा अनुशेष अद्यापही शिल्लक असून तो भरण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. कास्ट्राईब कर्मचारी महासंघासोबत, राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या बैठकीत प्रधान सचिवांनी उपस्थित सर्व विभागाच्या सचिवांना याबाबत आदेश दिले असल्याची माहिती कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहन चवरे यांनी दिली.

अनेक शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणीपासून वंचित,
गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
नागपूर, १० जून / प्रतिनिधी
नागपूर, हिंगणा व काटोल येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीपासून वंचित राहावे लागले असून या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष लिलाधर ठाकरे यांनी केली. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भरकाडे यांना निवेदन देण्यात आले आहे.

ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना सेवाशर्ती व पेन्शन योजना लागू
राज्य ग्रंथालय परिषदेत निर्णय
नागपूर, १० जून / प्रतिनिधी
ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना सेवाशर्ती देण्याचा तसेच पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रालयातील सहय़ाद्री अतिथीगृहात २६ मे रोजी पार पडलेल्या राज्य ग्रंथालय परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री सुरेश शेट्टी, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष व राज्य ग्रंथालय परिषदेचे सदस्य विजय शिंदे, आमदार रामनाथ मोते, माजी आमदार गंगाधर पटणे व इतर परिषद सदस्य आणि उपसचिव, ग्रंथालय संचालक उपस्थित होते.

नागपूरच्या दोन बालसंशोधकांचे ‘नासा’च्या शास्त्रज्ञांकडून कौतुक
परग्रहांवरील संभाव्य जीवसृष्टीवर संशोधन
नागपूर, १० जून / प्रतिनिधी
‘सौर मंडळातील इतर ग्रहांवर पृथ्वीसारखीच वसाहत होऊ शकते का’\? विचार केल्यास काहीशा अशक्य वाटणाऱ्या पण, वैज्ञानिकांच्या लेखी शक्य असलेल्या प्रश्नांवर जगापुढे सकारात्मक चित्र निर्माण करण्याची किमया नागपुरातील दोन बालसंशोधकांनी साधली. आहे ना आश्चर्य.! पण, अख्खी हयात या प्रकारच्या संशोधन कार्यात घालवलेल्या संशोधकाला हेवा वाटेल असेच काही शंतनू माणके आणि जय पात्रीकर या सोमलवार निकालसच्या दोघा विद्यार्थ्यांनी करून दाखवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

आदिवासी आश्रमशाळांमधील गैरप्रकार
विकास सचिवांना उच्च न्यायालयाची नोटीस
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांबाबत अहवाल सादर करण्यास सांगूनही तो न केल्याबद्दल तुमच्याविरुद्ध न्यायालयीन अवमानाची कारवाई का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदिवासी विकास विभागाच्या सचिवांविरुद्ध काढली आहे. या संदर्भातील याचिकेवर येत्या ४ आठवडय़ात उत्तर सादर करावे असेही खंडपीठाने सचिवांना सांगितले आहे.

अहेरीत सत्र न्यायालय सुरू करणे व्यवहार्य नाही
गडचिरोली जिल्हा न्यायाधीशांचा अहवाल
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

अहेरी येथे सत्र न्यायालय स्थापन करण्याचा प्रस्ताव कुठल्याही दृष्टीने व्यवहार्य नसल्याचा अहवाल गडचिरोलीच्या जिल्हा न्यायाधीशांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सादर केला आहे. सध्या गडचिरोली येथे सत्र न्यायालय आहे. मात्र मूलचेरा, भामरागड, सिरोंचा इ. दूरवरच्या भागातील आदिवासींना सुनावणीसाठी गडचिरोलीला येणे त्रासाचे ठरते. यात त्यांचा बराच वेळ आणि पैसा खर्च होतो.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कडूलिंबाच्या रोपटय़ाचे वाटप
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान ट्रस्टच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दत्तात्रयनगरातील संत ज्ञानेश्वर उद्यानात साधकांना कडूलिंबाच्या रोपटय़ाचे वाटप करण्यात आले. अ‍ॅड. नामदेव फटींग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला समितीचे मुख्य समन्वयक प्रदीप काटेकर, महासचिव शशिकांत जोशी, आयुर्वेद प्रभारी डॉ. जिवेश पंचभाई, योग शिक्षक गुलाब उमाठे, प्रभाकर सावळकर, सुधाकर शर्मा, भारती मोहिजे, शिक्षक सहकारी बँकेचे संचालक अनिल श्रीगिरीवार, धनंजय चन्न्ो, राजेंद्र जुवारकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सावळकर यांनी केले. छाजूराम शर्मा यांनी आभार मानले.

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे अनयकुमार जोशीचा सत्कार
नागपूर, १० जून/प्रतिनिधी

बँक ऑफ महाराष्ट्रच्या नागपूर कार्यालयातर्फे आयआयटी आणि एआयईईई परीक्षेत नागपूर शहरातून प्रथम येण्याचा मान पटकाविणाऱ्या अनयकुमार जोशी याचा बँकेचे उपमहाव्यवस्थापक पी.बी. आंभोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनयकुमार जोशी आयआयटी परीक्षेत देशातून ४८ वा आणि एआयईईई परीक्षेत राज्यातून ४१ वा येण्याचा मान पटकाविला. त्याच्या या यशाबद्दल बँकेतर्फे एका विशेष कार्यक्रमात त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रच्या सीताबर्डी शाखेत त्याचे बचत खाते उघडून आला एटीएम, इंटरनेट बँकिंग, एसएमएस बँकिंग, महासुरक्षा योजना इत्यादी सुविधा प्रदान करण्यात आल्या. अनयकुमारने आयआयटी पवई येथे इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. यावेळी बँकेचे उपमहाव्यवस्थापक पी.बी. आंभोरे यांनी अनयकुमारला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रच्या क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक अभय पानबुडे, सीताबर्डी शाखेचे मुख्य व्यवस्थापक दीपक झाडे व डॉ. सुलभा जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांचे १२ जूनपासून शिबीर
नागपूर, १० जून/प्रतिनिधी

शंकरनगर चौकातील मूकबधिर विद्यालयात १२ ते १४ जूनपर्यंत तीन दिवसीय ज्येष्ठ नागरिकांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन डॉ. म.चि. आठवले करणार असून, समारोप अनिल कासखेडीकर यांच्या उपस्थितीत करण्यात येईल. शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, विमा, वित्तीय सहाय्य, ज्येष्ठ नागरिक विषयक कायदे, आपातकालीन सेवा, विविध प्रकारचे आजार व त्यावरील उपचार, संरक्षण अशाप्रकारच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात येईल. हे शिबीर दररोज सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत राहील. शिबिरार्थीकरता भोजन व चहाची व्यवस्था राहील. शिबिराकरता ५१ रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. शिबिराकरता डॉ. उकळकर, डॉ. संजय बजाज, डॉ. लढ्ढा, डॉ. पानगावकर, डॉ. केशव क्षीरसागर, डॉ. अतुल सालोडकर, डॉ. थोटे, डॉ. शाहीन, डॉ. वाघ, डॉ. नील वैद्य, अनुपकुमार सिंह, मिरा खड्कार, रश्मि कल्याणी, अर्चना पालांदूरकर आदींचा सहभाग आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व अधिक माहितीकरता मनोहर खर्चे ९३७०५०८०६८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिरात मार्गदर्शन करताना शशिकांत जोशी, हंसराज मिश्रा, छाजूराम शर्मा व इतर.

वीज कामगार महासंघाचे धरणे
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

वेतनवाढ, निवृत्तवेतन आणि इतरही मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघ (निर्मिती)तर्फे कोराडी येथे धरणे देण्यात आले. कामगारांनी प्रशासनाकडे वेळोवेळी वेतनवाढ संदर्भात निवेदन दिली. निदर्शने करण्यात आली पण मागण्या मान्य न झाल्याने शंकर पहाडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे देण्यात आले. यावेळी रामदास माहुलकर, श्याम देशमुख यांची भाषणे झाली. कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी दत्ता धामणकर, उद्धव गहाणे, विठ्ठल भालेराव, मनोहर रंगारी आदी अनेक संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

११ रेल्वे गाडय़ांना दोन अतिरिक्त कोच
नागपूर, १० जून/ प्रतिनिधी

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाच्या काही गाडय़ांना दोन अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या गोंदिया- बल्लारशाहमध्ये या दरम्यान धावणाऱ्या गाडय़ांतील गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाद्वारे एकूण ११ गाडय़ांना दोन अतिरिक्त कोच वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांचा प्रवास सोयीचा होईल, अशी अपेक्षा आहे. आज ११ जूनपासून १ सी.बी. बल्लारशाह- चांदाफोर्ट, २ सी.बी. चांदाफोर्ट- बल्लारशाह, ३ सी.बी. बल्लारशाह- चांदाफोर्ट, ३ जी.सी. चांदाफोर्ट- गोंदिया, ८ डब्लू. सी. वडसा-चांदाफोर्ट आणि ५ जी.सी. चांदाफोर्ट-गोंदिया पॅसेंजर गाडय़ांमध्ये दोन अतिरिक्त कोच जोडले जात आहेत. या गाडय़ांमध्ये एकूण १४ कोच राहतील.

संत कबीर यांची जयंती साजरी
नागपूर, १० जून/ प्रतिनिधी

जागनाथ बुधवारीमधील गढेवाल कबीर मठात संत कबीर यांची जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी रामचंद्र निमजे यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी कबीर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला. प्रास्ताविक मधुकर गोन्नाडे यांनी केले. कार्यक्रमासाठी बापूदास पराते, विजय गोखले, हरिभाऊ पराते, पुंडलिक हेडाऊ, शंकरदास निमजे, सतीश हेडाऊ, ओमप्रकाश हेडाऊ, नीलकंठ बिनेकर यांचे सहकार्य लाभले.

पतंजलीतर्फे योग आणि प्राणायाम शिबीर
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

पतंजली योग समितीतर्फे जरीपटक्यातील साईबाबा मंदिरात सात दिवसीय नि:शुल्क योग आणि प्राणायाम शिबीर आयोजित करण्यात आले. शिबिरात महासचिव शशिकांत जोशी, हंसराज मिश्रा, छाजूराम शर्मा यांनी शिबिरार्थीना स्वामी रामदेव महाराज प्रणीत आठ प्राणायाम, व्यायाम, जॉगिंग, सूर्य नमस्कार, अ‍ॅक्यूप्रेशरसंबंधी मार्गदर्शन केले. शिबिराचा समारोप समितीचे संरक्षक यशपाल आर्य यांच्या अध्यक्षतेखाली झाला. समारोप कार्यक्रमाला समितीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नामदेव फटींग, प्रकाश गांधी, शंकर मूलचंदानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संचालन प्रिती केवलरामानी यांनी केले. आसनदास बालवानी यांनी आभार मानले.

रामन विज्ञान केंद्रात आजपासून ‘हमारे अंगरक्षक’ विषयावर प्रदर्शन
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

रामन विज्ञान केंद्रातर्फे उद्या, ११ जूनला ‘हमारे अंगरक्षक’ या विषयावर प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उदघाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिप्ती डोणगावकर यांच्या हस्ते होणार आहे. लघुपटाच्या माध्यमातून मानवाच्या शरीर रचनेबाबत या प्रदर्शनात माहिती देण्यात येणार आहे. २५ जुलैपर्यंत प्रदर्शन राहणार असून सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी खुले राहील.

साने गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त आज व्याख्यान
नागपूर, १० जून/प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्राच्या वतीने दिवं. साने गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शंकरनगरमधील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात गुरुवारी, ११ जूनला संध्याकाळी ५.३० वाजता शिक्षण विभागाचे उपसंचालक गोविंद नांदेडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी विदर्भातील ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू अध्यक्षस्थानी राहतील. व्याख्यानाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला; संघटनांकडून निषेध
नागपूर, १० जून / प्रतिनिधी
राष्ट्रीय मानवसेवा नागरिक समिती, राष्ट्रपिता महात्मा गांधी विधायक कार्य सेवा मंडळ, श्री शिवशक्ती सेवा मंडळ, क्रांतिज्योती सावित्रीबाई महिला मंडळ, क्रांतिसूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रसेवा समिती, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने, ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर होत असलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. याप्रसंगी विदर्भ प्रदेश विकास समितीचे प्रतापसिंह चौहान, राजेंद्र तिवारी, ताराचंद सावरकर, घनश्याम आग्रे, केशव मधुमटके, अमृता कुकसे, मंदा उरकुडे, हिरा बडोदेकर आदी उपस्थित होते. विदेशात राहणारे भारतीय नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसभेत सुद्धा उचलण्यात आला. काळा-गोरा हा भेद समाप्त करण्यासाठी महात्मा गांधीच्या विचारानुसार कार्य करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

१७ जूनपासून डेअरी प्रशिक्षण कार्यक्रम
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २४ जूनदरम्यान डेअरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणादरम्यान गाईची निगा, आहार, वातावरण, गोठा बांधणी, औषधोपचार, रोगनिदान, लसीकरण व प्रजनन व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच, व्यक्तिमत्व विकास, सरकारी व निमसरकारी अनुदानित योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, बँकेची कार्यपद्धती आदी विषयांवर तज्ज्ञ व अधिकारी मार्गदर्शन करतील. प्रशिक्षण कार्यक्रमात १८ ते ४५ वयोगटातील आठवी पास असलेल्या २० युवक युवतींना व महिलांना प्रवेश देण्यात येईल. अधिक माहिती व प्रवेश अर्जाकरता जिल्हा प्रकल्प अधिकारी एच.आर. वाघमारे, कार्यक्रम समन्वयक सुषमा नेवल, ९०११४९५३७७, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, सिव्हिल लाईन, नागपूर, २५३७०९७, २५२४७१७ येथे संपर्क साधावा.

विजय कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८७ टक्के
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

उमरेड तालुक्यातील चांपा येथील विजय कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ८७.२७ टक्के लागला असून या महाविद्यालयातून आदिवासी समाजातील जितेंद्र चिरकुट अरतपायरे ७७.५० टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम आला आहे. प्रतीक्षा वसंतराव कांबळे हिला ७५.६६ टक्के गुण प्राप्त झाले असून ती महाविद्यालयातून द्वितीय क्रमांकावर आहे. शेतकरी कुटुंबातील जयश्री कवडू भोसकरने ७१.५ टक्के गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकावला. एकूण ५५ विद्यार्थ्यांपैकी २६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर, २२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य बुटे, कनिष्ठ अधिव्याख्याता नांदूरकर, शेरजे आणि रेखा निमजे यांना दिले आहे. याच वर्षांपासून चांपा येथे सुरू करण्यात आलेल्या नर्सरी, केजी-१ आणि केजी-२ मध्ये मलांना प्रवेश द्यावा, असे आवाहन संस्थाचालक विजय भोयर यांनी केले आहे.

अभियांत्रिकी सेवा महासंघाची मागण्यांसाठी निदर्शने
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महासंघाच्या आवाहनानुसार सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीकरता १० जूनला सिव्हिल लाईन येथील सिंचन सेवा भवन व सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य अभियंता कार्यालय परिसरात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून २२ जूनला मुंबईतील आझाद मैदानावर धरणे देण्यात येणार आहे. अभियंता वर्गाच्या मागण्या केंद्राच्या शिफारशीनुसार राज्य सरकारने मान्य कराव्या याकरता महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महासंघाने तीन टप्प्यामध्ये निदर्शने, निषेध व गरज पडल्यास बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. १० जूनला आयोजित निदर्शने कार्यक्रमात कार्यकारी अभियंता उत्तरवार, कार्यकारी अभियंता शिंदे, शाखा अभियंता आर.जी. चौधरी, जिल्हा सचिव वसुलकर, सहसचिव बोंद्रे यांनी मार्गदर्शन केले. निदर्शने कार्यक्रमात ढवळे, अचकारपोहरे, कुळकर्णी, दामोधरे, टालाटुले, वाकडे, खोरगडे आदी उपस्थित होते. निरंजन राऊत, प्रतीक्षा कांबळे, जितेंद्र अरतपायरे, प्रा. शेरजे, प्राचार्य बुटे, नांदूरकर.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त क्युटो करारावर चर्चासत्र
नागपूर१० जून / प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय मैत्री संघटनेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘क्यूटो कराराला जागतिक धोका’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. डॉ. शशीकांत वाईकर प्रमुख वक्ते तर, अ‍ॅड. सुभाष काळबांडे अध्यक्षस्थानी होते. संयुक्त राष्ट्रसंघाने पर्यावरणाच्या रक्षणार्थ जपानच्या क्युटो शहरात ११ डिसेंबर १९९७ ला एका संमेलनात वायु प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी करार केला. मात्र, याबाबत विकसित देशांची उदासिनता दिसून येते. यामुळे अशा देशांनी क्युटो कराराची अंमलबजावणी करावी, असे डॉ. वाईकर म्हणाले. क्युटो कराराचा पर्यावरणाच्या रक्षणासाठी लाभ होईल आणि त्यापासून विकासदेखील शक्य होईल, असे आर.एस. खन्ना म्हणाले. विकसित देशांपासून तंत्रज्ञान आणि गुंतवणूक मिळवण्यात विकसनशील देशांचे प्रयत्न असतात, त्यामुळे त्यांनाही या कराराचा लाभ होईल, याकडे संघटनेचे सचिव प्रा. राहुल नगराळे यांनी लक्ष वेधले.

प्रत्येकाने वृक्षारोपण करावे -प्रा. तिडके
नागपूर, १० जून / प्रतिनिधी
समाजातील प्रत्येक घटकांनी वृक्षारोपणासाठी समोर यावे, असे आवाहन याप्रसंगी प्राचार्य तिडके यांनी केले. बुटीबोरीतील इंडोरामा कारखान्यात १ ते ५ जूनदरम्यान पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. इंडोरामा कारखान्याचे मुख्याधिकारी शरद वर्मा यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व स्पष्ट करताना पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी इंडोरामा कारखान्याकडून वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले. पर्यावरण सप्ताहादरम्यान नागपूर शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण उपसंचालक एस.एम. हस्ते यांनी वृक्षारोपण केले. एमआयडीसीचे अतिरिक्त मुख्य अभियंता एस.बी. पाटील यांनी इंडोरामा परिसरात आयोजित वृक्षारोपणादरम्यान पर्यावरण जागरुकतेबद्दल आनंद व्यक्त केला. कारखाना परिसरात आयोजित परिषदेला शरद वर्मा, आर.के. माहेश्वरी, सतीश अग्रवाल, हेमंत पाठक, सी.बी. माहेश्वरी, शंकर अवस्थी, अशोक कडू, एस.के. श्रीवास्तव उपस्थित होते.

रशियातील मेडिकलच्या प्रवेशाबाबत चर्चासत्र
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

कॉसमॉस एज्युकेशन कन्सल्टंटच्या नागपूर शाखेच्यावतीने १ जूनला बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरता ‘रशियातील स्मॉलेक्स स्टेट मेडिकल अकादमी’मध्ये एमबीबीएसला प्रवेश कसा मिळवावा, या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात डॉ. आलोक एरॉन यांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी लाईफलाईन ब्लड बँकेचे संचालक डॉ. हरिष वरभे व कॉसमॉस एज्युकेशन कन्सल्टंट नागपूर विभागाच्या प्रमुख सीमा रुद्र होत्या. चर्चासत्राचे प्रास्ताविक पद्मजा कुळकर्णी यांनी केले.

सप्टेंबरमध्ये नागपुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
नागपूर, १० मे / प्रतिनिधी

फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया आणि निर्झर फिल्म सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात प्रथमच येत्या सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी नुकतीच समितीच्या सदस्यांची बैठक घेतली असून त्यात चित्रपट महोत्सव आयोजित करण्यासंदर्भात कार्यक्रमाची रुपरेषा ठरवण्यात आली. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण २५ चित्रपट दाखवण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात लघुचित्रपटांची स्पर्धा आयोजित करून त्यातील निवडक लघुचित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहे. इंडियन पॅनोरमातंर्गत मराठी तसेच इतर भारतीय भाषांमधील दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक व कलाकार यांच्या उपस्थितीत अनेक चित्रपटांवर मुक्त चर्चा करण्यात येणार आहे. याबैठकीत निर्झर फिल्म सोसायटीचे विश्वस्त गिरीश गांधी, समीर नाफडे, आशीष फडणवीस, डॉ. मनिषा रुईकर, धनंजय पात्रिकर, दिलीप चव्हाण, सुरेंद्र मिश्रा उपस्थित होते.

अ‍ॅडव्हान्स आथ्रोस्कोपी अँड जॉईंट केअर सेंटर’चे उद्घाटन
नागपूर,१० जून / प्रतिनिधी

रामदास पेठमधील मिडास हाईट, सेंट्रल बाजार येथे ‘अ‍ॅडव्हान्स आथ्रोस्कोपी अँड जॉईंट केअर सेंटर’चे उद्घाटन आर्थोपेडिक सर्जन डॉ. सुधीर बाभुळकर यांच्या हस्ते झाले. सांध्याच्या आजाराने त्रस्त खेळाडू तसेच इतरांना या केंद्राचा फायदा होईल. आजारी खेळाडूंना मुंबई, पुण्याला उपचारासाठी जावे लागणार नाही, असे याप्रसंगी डॉ. बाभुळकर म्हणाले. या केंद्रात सांध्याच्या आजारावर मार्गदर्शन करण्यात येणार असून गरज भासल्यास दुर्बिनद्वारा उपचार केले जातील. या केंद्राचे संचालक डॉ. सतिश सोनार यांनी मुंबई, कोईंबतुर, रोम, ऑस्ट्रीया, मेलबर्न येथे सांध्याचे आजार आणि अत्याधुनिक प्रणाली व दुर्बिनद्वारा त्याचा इलाज यावर चार वर्ष प्रशिक्षण घेतले आहे. उद्घाटन समारंभाला डॉ. सावजी, डॉ. सुशील राठी, डॉ. धांदे, डॉ. पोंगडे, डॉ. शेन्डे, डॉ. सप्रे, डॉ. बोबडे, डॉ. सोनार यांचे आईवडील व गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.

वीज कामगार महासंघाचे मागण्यांसाठी धरणे
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

महाराष्ट्र वीज कामगार महासंघातर्फे विविध मागण्यांसाठी मुख्य अभियंता, पारेषन कंपनी यांच्या कार्यालयासमोर बुधवारी धरणे दिले. या आंदोलनात नागपूर परिमंडळातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आदी जिल्हय़ांतील पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रदेश महामंत्री रमेश पाटील यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. नागपूर विभागाचे अध्यक्ष तिवारी व सचिव तिडके यांनी विभागातील कामगारांवर होणाऱ्या अन्यायावर प्रकाश टाकला. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे उपमहामंत्री शंकर पहाडे, सहसचिव चंद्रकांत मगरे, झोनल सचिव सुनिल बोक्षे, हिराचंद सिंगतकर, दत्तात्रय बाळापुरे, नागपूरकर, देवघरे, देव, सपाट, सोळंकी, मेघना वाहोकार आदींनी मार्गदर्शन केले. मुख्य अभियंता अलफाज यांनी सायंकाळी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले. यावेळी झालेल्या चर्चेत विभागातील कामगारांच्या समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. कामगारांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले.

शिबिरात रिपाइंच्या कार्यकर्त्यांना पक्ष बळकट करण्याचे आवाहन
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

रिपब्लिकन कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर समितीतर्फे कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबीर आमदार निवासात पार पडले. शिबिरात डॉ. विमलकिर्ती व डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. विमलकिर्ती यांनी पक्ष बळकटीचे आवाहन केले. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी द्विपक्ष पद्धती नाकारून रिपाईंसारख्या पक्षाने समतेसाठी लढण्याची गरज असल्याचे सांगितले. भूपेश थूलकर, आर.एस. वानखेडे, भिमराव बनसोड, अशोक मेश्राम, दुर्वास चौधरी, डॉ. भिमराव म्हस्के, एन.बी. नगराळे यांनी सरकार व प्रशासनावर राजकीय पक्षाचा प्रभाव, कार्यकर्ता कसा असावा, पक्ष कसा वाढवावा, आदी विषयांवर मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी, पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करावे, विधानसभेच्या तयारीकरता विधानसभानिहाय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करावे, आदी ठराव बैठकीत पारित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुर्वास चौधरी यांनी केले. पहिल्या दिवसाचे संचालन अशोक मेश्राम यांनी केले. शिबीरात निवडक ५० कार्यकर्ते उपस्थित होते.

व्यावहारिक अरबी अभ्यासक्रमाच्या शिबिराचा समारोप
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारा आयोजित व्यावहारिक अरबी अभ्यासक्रमाच्या शिबिराचा समारोप नुकताच विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात पार पडला. यावेळी विदर्भ साहित्य संघाच्या सरचिटणीस शोभा उबगडे, नगरसेवक डॉ. कल्पना पांडे उपस्थित होत्या. शोभा उबगडे म्हणाल्या, अरबी ही भाषा आशिया व अफ्रिका खंडातील एकूण २५ देशांची राष्ट्रभाषा आहे. या देशांशी भारताचे घनिष्ठ संबंध आहेत. अनेक भारतीय नागरिक अफ्रिका खंडातील देशांमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. विदेशी भाषा प्रशिक्षण प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. कल्पना पांडे म्हणाल्या, अरबी शिकल्यास भारताचे या देशाशी सांस्कृतिक, व्यापारी तसेच सामाजिक संबंध अधिक घनिष्ठ होतील त्याचप्रमाणे नोक ऱ्या प्राप्त करण्याबद्दल सुद्धा फायदा होईल. यावेळी शहिना खतिबा यांनी अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन अपर्णा माणकेश्वर यांनी केले. विजय सदलगेकर यांनी आभार मानले. व्यावहारिक अरबीचा वर्ग हा नि:शुल्क असून ज्यांना ही भाषा अवगत करायची आहे त्यांनी अधिक माहितीसाठी ९३७१६४७१०० ,९४२२१११९२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मुस्लिम समाजसेवकांचा जुलैमध्ये गौरव
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

विदर्भ मुस्लिम फोरम आणि शदाब एज्युकेशन सोसायटीतर्फे विदर्भातील मुस्लिम समाजसेवकांचा गौरव करण्यात येणार आहे. शिक्षण, समाजसेवा, राजकारण, आरोग्य, विज्ञान, कला व संस्कृती, क्रीडा, उद्योग, बालकल्याण, प्रशासन आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय, गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. येत्या जुलैमध्ये एका सोहोळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यासंदर्भात अधिक माहितीसाठी संयोजक आर.एम. खान नायडू- ९३७१०५९०५५, इक्रम हुसेन- ९३७२९१०१५६, हाजी महेमुदल हसन-९४२२८२७७७१, प्रा. शकील सत्तार- ९८५०३४५६१४, शदाब खान- ९३७२९१४००० किंवा सोहेल अहमद यांच्याशी ९८९०१४९२६८ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

‘माझा जिल्हा गोंदिया’ माहितीपटाचे आज प्रसारण
नागपूर, १० जून/प्रतिनिधी

नागपूर दूरदर्शन निर्मित ‘माझा जिल्हा गोंदिया’ या माहितीपटाचे प्रसारण, मुंबई दूरदर्शन प्रादेशिक वाहिनीवर गुरुवार, ११ जूनला सकाळी ८ वाजता आणि मुंबई उपग्रह वाहिनीवर शुक्रवार, १२ जूनला रात्री ११ वाजता होणार आहे. या माहितीपटात गोंदिया जिल्हय़ाच्या विकास कार्यक्रमात सरकारी योजनांची भूमिका, लाभार्थी तथा पर्यटन क्षेत्र आदी माहिती समाविष्ट आहे. या माहितीपटाच्या निर्मात्या प्रतिभा पांडे असून संशोधन व लेखन बळवंत भोयर यांचे आहे. चंद्रकांत अनभोरे यांची कार्यक्रम निर्मिती असून, माहितीपटाचे निवेदन स्वाती हुद्यार यांचे आहे. माहितीपटाचे छायांकन अश्लेषा रॉय चौधरी यांनी केले असून नागरिकांनी प्रस्तुत माहितीपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर दूरदर्शनतर्फे करण्यात आले आहे.

‘सीईटी’ निकाल येत्या रविवारी
नागपूर, १० जून/ प्रतिनिधी

अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या सामयिक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल येत्या रविवारी (दि. १४) सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येणार आहे.राज्यभरातील सुमारे अडीच लाख विद्यार्थी ‘सीईटी’साठी बसले होते. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक वासुदेव तायडे यांनी निकालाबाबत माहिती दिली. ५८ वैद्यकीय महाविद्यालयांमधील तीन हजार ७८५ जागा, २२१ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील ७१ हजार ७०१ जागा आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या १३१ महाविद्यालयांमधील सात हजार ६७५ जागांवर या ‘सीईटी’च्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहेत.‘सीईटी’चा निकाल १४ जूनपूर्वी जाहीर करण्यात येईल, असे प्रवेश समितीच्या संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, आतापर्यंत निकालाची तारीख अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आली नव्हती. या पाश्र्वभूमीवर विद्यार्थी-पालकांमध्ये असलेला संभ्रम आता दूर झाला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया www.dte.org.in या संकेतस्थळावर तपशीलवार उपलब्ध करून देण्यात आली आहे.

युवा पिढी व्यसनाच्या आहारी -व्हिक्टर फ्रेंटस
नागपूर, १० जून/प्रतिनिधी

बालवयापासूनच गुटखा, खर्रा, जर्दा अशा विविध रुपात तंबाखू युवा पिढीला आपल्या विषारी विळख्यात घेत असून त्यामुळे देशाची युवा पिढी बरबाद होण्याचा धोका वाढला असल्याची चिंता आमदार व्हिक्टर फ्रेंटस यांनी व्यक्त केली. जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्त नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर इंटकचे सचिव राजेश निंबाळकर, केंद्राचे संस्थापक अशोक नगराळे होते.तंबाखुमध्ये चार हजार विषारी तत्त्वाचे मिश्रण असून तेच कॅन्सरला आमंत्रित करतात. तंबाखुमध्ये असणाऱ्या निकोटीन व टार या विषारी पदार्थामुळे अनेक प्रकारचे आजार होतात, अशी माहिती अशोक नगराळे यांनी दिली. ५० टक्के लोकांना हृदयरोग, कर्करोग व सबम्युकस फाईब्रोसिस नावाचा अत्यंत वाईट रोग होऊ शकतो. नपुसंकत्व येण्याची शक्यता असते. निकोटीनच्या सतत सेवनाने व्यक्ती बेशुद्ध पडतो, असे नगराळे यांनी सांगितले. व्यसनमुक्त जीवन हेच खऱ्या अर्थाने जीवन असते, असे राजेश निंबाळकर म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन यशवंत कुळकर्णी यांनी केले. संतोष राऊत यांनी आभार मानले.

खासदार दत्ता मेघे यांचे विमानतळावर स्वागत
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार दत्ता मेघे यांचे संसदेतील शपथविधीनंतर प्रथम नगरागमनप्रसंगी विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन खासदार मेघे यांनी यावेळी बोलताना केले. यासाठी लवकरच संपूर्ण विदर्भाचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. विमानतळावर वसंत पारशिवनीकर, प्रतापसिंह चव्हाण, डॉ. राजू मिश्रा, विदर्भ विकास परिषदेचे शहर अध्यक्ष मेहमूद अंसारी, राहुल तेलंग, वेदप्रकाश आर्य, हाजी कामिल अंसारी, अशोक काटले, अण्णाजी राऊत, रघुनाथ मालीकर, मोरेश्वर जाधव, प्रा. श्रीकांत घोगरे, रत्नाकर राऊत, देवराव तिजारे, रामदास सोनकुसरे, रज्जन चावरिया, अ‍ॅड. उषा पांडे, प्रदीप गाडगे, संजय धापोडकर, विजय गंथाळे, मनोरमा जयस्वाल, नरेंद्र पांडे, अशोक धापोडकर, नारायण आहुजा, श्रीधर नहाते, ललित देशमुख, प्रा. प्रदीप भोयर, अमृता कुकसे, सुषमा तलवारकर, छाया निमसरकार आदी उपस्थित होते.