Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

जीवन दर्शन
मूर्तिप्रतिष्ठा

‘प्रभो, मी खूप धन कमावलं. आता एखादं पुण्यकर्म करावं म्हणतो. आजकाल जागोजागी पंचकल्याणिकं (मूर्तीची स्थापना, मंदिर बांधणं) होताहेत, मग आपल्याच गावात अजून मंदिर बांधलं तर काय हरकत आहे?’
‘केवळ धन कमावलं म्हणून मंदिर बांधायचंय काय?’
‘महाराज, माझ्या घरात अनेक मूर्ती आहेतच. त्याच वेळी पाश्र्वनाथ भगवंताची मुख्य वेदीवर प्रतिष्ठा करावी म्हणतो. आजूबाजूच्या गावातील लोक दर्शनाला येतील. नवस बोलतील. त्यांच्या इच्छा सफल होतील. मनोरथ पूर्ण होतील.’
‘वत्स! मूर्तीची प्रतिष्ठापना नवसासाठी इच्छापूर्तीसाठी नसतेच आणि नसावी. मूर्ती तर पाषाणाची असते. पाषाण-दगड काही देत नाही, घेत नाही. ईश्वर-देव कर्ता नसतो, हे किती वेळा मी ऐकवलंय. जैन तत्त्वज्ञानाने सांगितलंय.
‘मग आपण मूर्तीचं नित्य दर्शन का घेतो. तो संस्कार मुलांनाही देतो ते कशासाठी?’
‘बरोबर प्रश्न विचारलास- ही जी थोर माणसं- र्तीथकर, आचार्य, मुनी, साधू, तद्भव मोक्षगामी केवली भगवान (र्तीथकर नसलेले, पण केवल ज्ञान झालेले महापुरुष) या सर्वाची भक्ती करणं, पूजा करणं म्हणजे त्यांच्यामधले गुण आपल्यात थोडेतरी उतरावेत हा भाव असतो. ‘वंदे तद्गुण लब्धेय’ असं म्हटलंय- या थोर लोकांनी मनातल्या शत्रूंचा नाश केला म्हणून त्यांना अरिहंत म्हटलं जातं. क्रोध, मान, माया, लोभ, इच्छा, वासना यावर विजय मिळवला म्हणून जित - जिंकणारा असंही म्हटलंय. या सर्वानी पंचेंद्रियांवर विजय मिळवला. दीक्षा घेऊन त्यांनी तप केलं. सुखी जगण्याचा, निर्वैर जगण्याचा मंत्र त्यांनी सांगितला. त्यांच्या मनात अपार करुणा होती. त्यांची ही वृत्ती, संयम आपल्यात यावा, आत्म्याचा परमात्मा व्हावा, या हेतूने मूर्तिपूजा सांगितली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट गावात दोन मंदिरं असताना नवं कशासाठी? तुमच्या धनाचा उपयोग आहारदान, औषधदान, शास्त्रदान, अभयदान यासाठी करा. अनाथाश्रम काढा, आरोग्यकेंद्र काढा, शिक्षणसंस्था काढा किंवा निराधारांना आधार द्या, तेच पुण्यकर्म होईल.
लीला शहा

कुतूहल
कृष्णविवर- ९

कृष्णविवरांचे स्वत:चे भवितव्य काय? त्यांचे आयुष्य अनंत आहे का?
कृष्णविवरांमध्ये सतत दोन परस्परविरोधी क्रिया चालू असतात. जवळपासच्या भागातील पदार्थ कृष्णविवर हे स्वत:कडे ओढून घेऊन ते गिळंकृत करीत असते. त्यामुळे त्याचे वस्तुमान वाढत जाते. याबरोबरच कृष्णविवरातून सतत हॉकिंग प्रारणे बाहेर पडत असतात. या प्रारणांच्या रूपाने कृष्णविवरातून सतत ऊर्जा बाहेर पडत असल्याने त्यांचे वस्तुमान कमी होत असते. यालाच कृष्णविवरांचे ‘बाष्पीभवन’ असेही म्हणतात. कृष्णविवरांच्या बाष्पीभवनाचा वेग हा त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असतो. सूक्ष्म कृष्णविवरांच्या बाबतीत हे बाष्पीभवन जलद घडून येते, तर प्रचंड वस्तुमान लाभलेल्या दीर्घिकीय कृष्णविवरांच्या बाष्पीभवनाचा वेग हा अत्यंत कमी असतो. या दोहोंच्या मधले वस्तुमान धारण करणाऱ्या तारकीय कृष्णविवरांच्या बाबतीत त्याचे संपूर्ण बाष्पीभवन होण्यासाठी लागणारा काळ हा विश्वाच्या आजच्या वयाहूनही जास्त आहे. दीर्घिकीय कृष्णविवरांच्या संपूर्ण बाष्पीभवनाला लागणारा काळ याहून अर्थात खूपच मोठा असणार.आपल्या आजच्या विश्वात, कृष्णविवरांच्या आजूबाजूस इतर तारे, वायू इत्यादी गोष्टी असल्याने, आजूबाजूचे पदार्थ ओढून घेण्याची पहिली क्रिया अधिक महत्त्वाची ठरून कृष्णविवरांचे वस्तुमान वाढताना दिसते, मात्र अब्जावधी वर्षांनी अशी परिस्थिती असेल, की कृष्णविवरांच्या आजूबाजूस गिळंकृत करण्यासाठी पदार्थच उरणार नाहीत. मात्र याचा अर्थ असा नाही की विश्वातील सर्व पदार्थ कृष्णविवरांच्या भक्ष्यस्थानी पडलेले असतील. फक्त उरलेले पदार्थ हे कुठल्याही कृष्णविवरापासून इतके दूर असतील, की ते गिळंकृत करणे कृष्णविवरांना शक्य होणार नाही. मात्र कृष्णविवरांच्या बाष्पीभवनाची क्रिया ही चालूच राहील आणि हळूहळू या कृष्णविवरांचे वस्तुमान कमी होऊ लागेल. परिणामी, आजपासून कित्येक शेकडो अब्ज वर्षांनी ही कृष्णविवरे पूर्णपणे नाहीशी झालेली असतील.
अनिकेत सुळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दिन विशेष
बादशाह रफी उद्दरजान

अब्दुल बराकत सुलतान शम्सुद्दीन मुहम्मद रफी उद्दरजान बादशाह, गाझी अशा लांबलचक बिरुदावलीने मिरवत आलेला औरंगजेबाचा हा नातू. बहादूरशाहचा हा मुलगा फर्कखासियरच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याच्या तख्तावर आरूढ झाला.
बादशाह रफी उद्दरजान याचा जन्म ३० नोव्हेंबर १६९९, तर मृत्यू ११ जून १७१९ म्हणजे जेमतेम २० वर्षांचे आयुष्य त्याला मिळाले. त्यात त्याची बादशाही कारकीर्द अवघी तीन महिन्यांची, परंतु हा बादशाह तसा सुदैवी ठरला, कारण इतर मोगल सम्राटांप्रमाणे कैद, छळ, हालहाल होऊन मृत्यू त्याच्या नशिबी आला नाही, कारण त्याला झालेला क्षयरोग आणि त्याच्या जोडीला त्याचे अफूचे व्यसन. आलमगीरचा वंशज असूनही तसा डामडौल तो राखू शकला नाही.दिल्लीच्या तख्तावर बसल्यानंतर त्याने आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले. त्यातच क्षयाने उचल खाल्ली. आपण मरणार याची त्याला जाणीव होताच ‘माझ्या भावास तख्तावर बसवल्यास मी सुखाने मरेन.’ अशी कळकळीची विनंती सय्यद बंधूंना केली. नशिबाने ती मान्य झाली. आपल्या मोठय़ा भावाला तख्तावर बसवून दि. ११ जून १७१९ रोजी तो मरण पावला.
संजय शा. वझरेकर

गोष्ट डॉट कॉम
पैशाचे झाड

हाश्श्हुश्श् करत छोटी यशू घरात आली. चिखलात बरबटलेले हात तिने नळाखाली धरले. पाण्याची कळकट रंगाची धार वाहू लागली. तिला फार बरे वाटत होते. आता फक्त वाटच पाहायची होती आणि तिची गम्माडी गंमत तोपर्यंत कुणाला सांगायची नव्हती. ती विचाराने खुद्कन स्वत:शी हसली. खरंच किती मज्जा होणार होती आणि ती कुणालाच ठाऊक नव्हती.
‘‘यशस्विनी! ए यशस्विनी!’’ आईची हाक ऐकू आली. ‘‘अगं, कुठं होतीस मगाचपासून? हाका मारून दमले मी. चल, दूध आणि बिस्किटं टेबलवर ठेवली आहेत. नंतर काकूआजीकडे जायचंय ना तुला?’’शहाण्या मुलीसारखी यशू दूध प्यायला गेली. महेंद्र माळी आत येऊन आईशी काहीतरी बोलत असल्याचे तिच्या कानावर पडले. बाबा नेहमीसारखे चहाचे घुटके घेत पेपर वाचत होते. सकाळची उन्हं बागेवर पडली होती. मनी उन्हाला पंजे चाटत आरामात पहुडली होती. मोत्या दूर बसून एकटक मनीच्या हालचाली बघत होता. आता कुठल्याही क्षणी हा उठून मनीवर भुंकेल असं येशूला वाटलं. तेवढय़ात आई तरातरा बाबांच्या व्हरांडय़ातल्या आरामखुर्चीकडे जाताना तिला दिसली. आईचा मूड बरा नसावा. यशूही उठून व्हरांडय़ाच्या दारापाशी गेली. आई तणतणत म्हणाली, ‘‘ऐकलेत का तुमच्या लेकीचे प्रताप?’’ बाबांनी पेपरमधून डोकं वर न काढता विचारलं. अगं, एवढं वैतागायला झालं तरी काय?’’ ‘‘आधी डोळय़ासमोरचा पेपर खाली करा. जेव्हा पाहावं तेव्हा तुमचं आपलं पेपर वाचणं चालूच असतं.’’ आईनं बाबांवरचा रागही काढून घेतला. ‘‘हं सांग!’’ बाबांनी पेपर खाली ठेवला. ‘‘अहो, यशूनं किनई पैसे पुरून ठेवलेत. महेंद्रनं पाहिलं.’’ आईनं जरा हळू आवाजात सांगितलं. ‘‘काय? पैसे पुरून ठेवले. का? घरात कपाटं नाहीत का पैसे ठेवायला आणि किती पैसे पुरले? कुठे पुरले? आणि कसे पुरले एवढय़ाशा पोरीनं?’’ बाबांची प्रश्नांची सरबत्ती संपेचना.आता मात्र आपल्याला बाबा रागावणार याची यशूला खात्री झाली. आई वर आधीच थयथयाट करत होती. मनीही उठून बाबांच्या पायाशी येऊन काय चाललंय म्हणून कुतूहलाने पाहात होती. मोत्याने कान टवकारले होते. ‘‘काय गं तू पैसे पुरून ठेवलेस?’’ ‘‘हो, पण ते माझ्या बक्षिसाचे होते.’’ यशू रडवेली होऊन म्हणाली. ‘‘अगं, पण असे पुरून कशासाठी ठेवलेस? कुणी घेणार नव्हतं तुझे पैसे. किती पैसे पुरलेस?’’ आई ओरडली. तसे येशूला फारच रडे आले. ती हुंदके आवरत म्हणाली, ‘‘अहो, मी पैसे पुरलेत ना त्याला पाणी घालीन रोज. मग झाड उगवेल. त्याला पैसे लागतील. मग खत घालू म्हणजे तर चिक्कारच पैसे लागतील. मी पाच रुपयांचं नाणं पुरलंय. मग तुम्हाला काम करायला नको बाबा.’’ आईबाबा कौतुकाने हसले. तिला जवळ घेऊन बाबा म्हणाले, ‘‘अगं राणी, पैसे झाडाला लागत नाहीत.’’कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. आयुष्यात जे मिळवायचंय त्यासाठी आयोजन, कष्ट आणि जिद्द यांची आवश्यकता असते. सहज काहीच प्राप्त होत नाही. त्यासाठी योग्य तो वेळ द्यावाच लागतो. केवळ स्वप्न पाहून उपयोग नसतो. स्वप्न पाहावीत, पण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक ते परिश्रम घ्यावेत.
आजचा संकल्प- सहज काही मिळेल अशी अपेक्षा मी करणार नाही.
ज्ञानदा नाईक