Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

शिक्षणाधिकारी आणि सदस्यांमध्ये हाणामारी

 

पनवेल/प्रतिनिधी : पनवेल नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी भास्करराव सूर्यवंशी आणि मंडळाचे सदस्य अजय भोईर, सुरेंद्र पाटील यांच्यातील बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या हाणामारीत जखमी झालेल्या सूर्यवंशी आणि पाटील यांना वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मंगळवारी रात्री सूर्यवंशी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पनवेल शहर पोलिसांनी अजय भोईर यांना अटक केली, तर भोईर यांनी सूर्यवंशी यांच्या विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार नोंदविली आहे.
सूर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये ‘शालेय पोषण आहार योजनेची’ जाहिरात दिली होती. निविदेसंबंधीच्या या जाहिरातीत महिला बचत गटांना आवाहन करण्यात आले होते. ही जाहिरात परस्पर छापून आल्याची भावना झाल्याने पाटील आणि भोईर हे दोघे सदस्य अस्वस्थ होते. याबाबत सूर्यवंशी यांना जाब विचारण्यासाठी त्यांनी मंगळवारी दुपारी सरस्वती मंदिर येथील कार्यालय गाठले आणि सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली. ही जाहिरात नियमानुसार दिली असून, ती देण्याचे आपणास अधिकार आहेत, असे उत्तर सूर्यवंशी यांनी दिल्याने, त्यांच्यात बाचाबाची झाली. पाटील आणि भोईर यांनी खुर्ची फेकून मारल्याने सूर्यवंशी यांच्या हाताला दुखापत झाली. सूर्यवंशी यांनी दाखविलेल्या बाहुबलात पाटील जखमी झाले. या दोघांना वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. पाटील आणि भोईर हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून, भोईर माजी नगरसेवक आहेत. भोईर यांना शासकीय कामकाजात अडथळे आणणे, सरकारी अधिकाऱ्याला धमकी देणे या गुन्ह्यांखाली अटक करण्यात आली, तर सूर्यवंशी यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खांदेश्वर तलावाच्या सुरक्षेसाठी आठ रक्षक
पनवेल/प्रतिनिधी - खांदेश्वर तलावाच्या नियोजित सुशोभीकरणामध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी सिडकोने आठ सुरक्षारक्षक दिवस-रात्र तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. खांदेश्वर येथील प्राचीन शंकर मंदिराजवळच हा तलाव असून, त्याचे संवर्धन करण्याची योजना सिडकोने काही महिन्यांपूर्वीच आखली आहे. ‘टेरी’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने सिडकोने तलावाच्या परिसराचा विकास करण्याचे कामही सुरू केले. नैसर्गिक गोडय़ा पाण्याचे असंख्य स्रोत असणाऱ्या या तलावात मोठय़ा प्रमाणावर गाळ असल्याने पाण्याचे अनेक उगम बुजले आहेत, ही बाब लक्षात घेऊन सिडकोने तलावातील एक मीटपर्यंतचा गाळ उपसला आहे, परंतु तलावात निर्माल्य टाकणे, कपडे-वाहने धुणे आदी प्रकारांमुळे तलावाच्या सुशोभीकरणास बाधा येत आहे. त्यामुळे अखेर येथे आठ खासगी सुरक्षारक्षक दिवस-रात्र तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सिडकोचे नवीन पनवेल येथील कार्यकारी अधिकारी दहिदार यांनी दिली. या जलसंवर्धनात शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची योजना असून, प्रात्यक्षिके आणि दृकश्राव्य माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. तलावाचे सुशोभीकरण झाल्यानंतर तेथे जलविहाराची सुविधाही सुरू करण्याची योजना सिडकोने आखली आहे.

अनैतिक संबंधातून पतीचा खून, तिघांना अटक
बेलापूर/वार्ताहर - अनैतिक संबंधातून पतीचा खून करणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकरास व त्याच्या साथीदारास नवी मुंबईच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सलमान कुरेशी (२५), बाबू पंगेरकर (२२), गीता सोनारे (३५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कळंबोली येथे भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विलास सोनारे याची राहत्या घरी ४ जून रोजी धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. तपासाअंती ही हत्या सोनारेची पत्नी गीता हिने तिचा प्रियकर सलमान कुरेशी व बाबू यांच्या मदतीने लग्नातील अडथळा दूर करण्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले. विलासला सायंकाळी चहात झोपेच्या गोळ्या घालून नंतर तो झोपल्याची खात्री झाल्यावर त्याच्यावर चाकूने वार करून हे त्रिकूट पसार झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत शेळके व त्यांच्या पथकाने सहा दिवसांत या खुनाचा तपास केला.

वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू
पनवेल/प्रतिनिधी- पनवेलजवळ राष्ट्रीय, तसेच द्रुतगती महामार्गावर नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे येणारी एक मारुती गाडी इंधन संपल्यामुळे कोन पुलाजवळ थांबली होती. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव गाडीने या गाडीला धडक दिली आणि त्यात मारुती कारमधील सुरेश बामणे यांचा मृत्यू झाला, तर प्रवीण बामणे जखमी झाले. अन्य एका अपघातात पनवेल-उरण बायपास मार्गावर कुंडेवहाळ गावाजवळ अवजड वाहनाने धडक दिल्याने राजनाथ देवधारी माटी या तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्यासह असलेला संदेश ठाकूर हा तरुण गंभीर जखमी झाला.