Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या महसुलात वाढ
चंद्रपूर,१० जून/ प्रतिनिधी

 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यंदा देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी वाढल्याने ताडोबाच्या पर्यटन महसुलात तब्बल पाच लाखाने वाढ झालेली आहे. यापूर्वी आठ ते दहा लाखाचे वार्षिक उत्पन्न देणाऱ्या ताडोबा प्रकल्पाने यंदा पंधरा लाख रुपयांवर पर्यटन महसूल गोळा केल्याने वन खात्यात आनंदाचे वातावरण आहे.
देशातील पहिल्या दहा व्याघ्र प्रकल्पात समावेश असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे देश विदेशातील पर्यटकांचा कल वाढला आहे. मागील वष्रेभरातील पर्यटकांची आकडेवारी बघितली तर ही गोष्ट लक्षात येते. वाघांच्या सानिध्यात मनसोक्त निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातील पर्यटक सातत्याने या प्रकल्पाला भेटी देत असतात. वाघ व बिबटय़ांसोबत विदेशातून स्थानांतरण होऊन येणारे पक्षी, सरपटणारे प्राणी, यासोबतच निरनिराळे प्राणी या प्रकल्पात आहेत. मागील दहा वर्षांत प्रकल्पाचा चांगला विकास झाला आहे. इको टुरिझमच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाने या प्रकल्पाचा विकास केल्याने देश विदेशात या प्रकल्पाचे नाव झाले आहे. यातूनच या प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. हे सर्व उत्पन्न पर्यटकांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्क व वाहन भाडय़ाचे आहे. मागील तीन वर्षांचा विचार केला तर दरवर्षी ताडोबात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सहा ते सात हजाराने वाढ होत आहे. २००६-०७ मध्ये ताडोबाला ४२ हजार ३४५ पर्यटकांनी, २००७-०८मध्ये ६१ हजार ७९० पर्यटकांनी भेट दिली तर यावर्षी ताडोबाला तब्बल ६८ हजार १८३ पर्यटकांनी भेट दिली. २००६ पासूनचा विचार केला तर २६ हजार पर्यटक गेल्या तीन वर्षांतच वाढलेले आहेत.
ताडोबात प्रवेश करण्यासाठी एका पर्यटकाकडून वीस रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. पर्यटकाचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असेल तर दहा रुपये शुल्क आकारले जाते. यंदा ६८ हजार पर्यटकांकडून १३ लाखांचे पर्यटन महसुली उत्पन्न गोळा करण्यात आले. यासोबतच हलक्या चार चाकी वाहनासाठी ५० रुपये व जड चार चाकी वाहनासाठी ७५ रुपये शुल्क आकारण्यात येते. यंदा या प्रकल्पात जवळपास तीस हजार वाहने आली. या सर्व वाहनांकडून गोळा करण्यात आलेले उत्पन्न लाखो रुपये आहे. यापूर्वी राज्य व केंद्र शासनाने पर्यटनाला महत्त्व न दिल्याने कोटय़वधीच्या पर्यटन महसुली उत्पन्नापासून शासनाला वंचित राहावे लागत होते. मात्र मागील तीन वर्षांत शासनानेच पर्यटनाला वाव दिल्याने पर्यटन महसूली उत्पन्नात दरवर्षी भर पडत आहे.
ताडोबा प्रकल्पाला दरवर्षी किमान एक लाख पर्यटकांनी भेट द्यावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने पर्यटनावर आधारित विविध उपक्रम येथे राबविण्याचा विचार केला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या विकासाची कामे सुरू आहेत. पर्यटन महसुली उत्पन्नात आणखी भर पडावी म्हणून प्रकल्पात हत्तीवरून पर्यटकांना सफारी सुरू करण्यात आलेली आहे. यापूर्वी ताडोबा प्रकल्पात जाण्यासाठी केवळ एकच मार्ग खुला होता. मात्र आता चिमूर व भद्रावती हे दोन्ही मार्ग सुरू करण्यात आलेले आहेत. हे दोन मार्ग खुले झाल्याने पर्यटकांच्या संख्येत निश्चितच भर पडेल, असा विश्वास ताडोबा प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
ताडोबात नऊ बछडे
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेत वाघाचे नऊ बछडे असल्याची माहिती समोर आली आहे. यात सात बछडे ताडोबात तर दोन कोळसा वनपरिक्षेत्रात आहेत. या नऊ बछडय़ांचे वय साधारणत: तीन ते सहा महिन्यापर्यंतचे आहे. बछडय़ांची एक वर्षांत पूर्ण वाढ होते. बछडय़ांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून ताडोबाचे अधिकारी विशेष लक्ष ठेऊन आहेत.