Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

कुटाफळी शिवारातील घटना
विहिरीत पडलेल्या बिबटय़ाच्या दोन छाव्यांना जीवदान
नेरपरसोपंत, १० जून / वार्ताहर

 

तालुक्यातील कुटाफळी जवळील जंगलात अर्धवट खोदलेल्या विहिरीत पडलेल्या बिबटय़ाच्या दोन छाव्यांना वन कर्मचारी व गाककऱ्यांच्या मदतीने जीवदान मिळाले आहे. दोन्ही छाव्यांना विहिरीतून बाहेर काढून जंगलात सोडून देण्यात आले.
कुटाफळी हे जेमतेम सात घरे असलेले छोटेसे खेडेगाव. शिवारात प्रकाश हरलाल चव्हाण यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू आहे. अगदी १५ फुटावर पाणी लागले आहे. १० जूनच्या सकाळी ९ वाजताच्या सुमारास दिलीप जयस्वाल विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेले असता ते दोन छावे त्यांना दिसले. लगेच ही बातमी पोलीस पाटलांना देण्यात आली. नेरच्या वनक्षेत्र अधिकाऱ्यांना तसेच नेर पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा वनक्षेत्र विभागाचे प्रमुख सुधाकर डोळेंसह वनअधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
त्या छावांना बाहेर काढून जंगलात सोडून देण्यासाठी ट्रॅक्वीलाइझर देण्यासाठी अकोला येथून एक वनक्षेत्र अधिकाऱ्यांची विशेष चमू येत आहे. नेर तसेच सोनखास या वनपरिक्षेत्रामध्ये वाघ, बिबटे हे प्राणी अजिबात नाही, असा दावा तीन वर्षांपूर्वी वनअधिकाऱ्यांनी केला होता तर हे छावे कोठून आलेत हा प्रश्न शिल्लक राहतो. मागील वर्षी याच जंगलात वामन राठोड यांची गाय एका वाघाने ठार केली होती. बबन श्रीवास यांनी एका वाघाला याच जंगलात मागील नोव्हेंबर महिन्यात पाहिले होते. आपल्या जंगलात वाघासारखे किंवा बिबटय़ासारखे प्राणी आहेत का? आहेत तर किती आहेत हे माहिती नसणे हे आश्चर्य आहे. या छावांची आई (मादी) बिबटय़ा याच जंगलात असावी, असा कयास आहे. यामुळे भीतीचे वातावरण या परिसरात पसरले आहे.
एल.आर. गाडे, डी.बी. राठोड, सी.एस. खडसे, महालक्ष्मी कापडे वनक्षेत्र अधिकारी नेर पोलिसांसह घटनास्थळी हजर झाले. छाव्यांना बाहेर काढण्याचे लांब लाकूड विहिरीत सोडण्यात आले. लाकडाला पकडून छावे विहिरीतून वर आले. दोन्ही छाव्यांना जंगलात सोडण्यात आल्याने गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला. छावे या परिसरात सोडू नये, असे गावकऱ्यांचे म्हणणे होते. वन अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत काढली.