Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

योगिता ठाकरे मृत्यू प्रकरणाची सुनावणी लांबणीवर
कारचालकाचे निवेदन न नोंदवल्याबद्दल कोर्टाची विचारणा
नागपूर, १० जून/ प्रतिनिधी

 

गडकरी वाडय़ाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळलेल्या योगिता ठाकरे हिच्या संशयास्पद मृत्यूच्या सी.बी.आय.मार्फत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेत पोलिसांनी सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी वेळ मागून घेतल्यामुळे याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १८ जूनपर्यंत पुढे ढकलली. ज्या कारमध्ये मृतदेह आढळला त्या कारच्या मालकाचे निवेदन पोलिसांनी अद्याप का नोंदवले नाही, अशी विचारणा आजच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने सरकारी वकिलांना केली.
योगिताची आई विमल ठाकरे हिने ही याचिका केली आहे. यापूर्वीच्या सुनावणीत खंडपीठाने सरकारला आतापर्यंतच्या तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार हा अहवाल न्या. ए.पी. लवांदे व न्या. पी.बी. वराळे यांच्या खंडपीठाला सादर करण्यात आला. या अहवालात गुन्ह्य़ाच्या तपासात आतापर्यंत झालेली प्रगती नमूद केली आहे. घटनास्थळी व त्यानजिक हजर असलेल्या काही साक्षीदारांच्या साक्षींचा यात उल्लेख करण्यात आला आहे. या तपासाच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, नुकत्याच प्राप्त झालेल्या रासायनिक विश्लेषणाच्या अहवालाचा त्यात उल्लेख करण्यात आला आहे. या मुलीचा व्हिसेरा व आवश्यक ते नमुने मुंबईला रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले होते. त्या अहवालानुसार, लैंगिक संबंधाचा प्रयत्न करण्यात आला की नाही, हे नेमके सांगता येणे कठीण आहे. या मुलीच्या अंतर्वस्त्रासह कपडय़ांवर रक्ताचे डाग आढळले असले, तरी वीर्य आढळलेले नाही. त्यामुळे बलात्कार झाल्याचा निष्कर्ष निघू शकत नाही, असे या अहवालात म्हटले आहे. या मुलीच्या अंगावर आढळलेल्या जखमा, तिचा मृत्यू गुदमरून झाला असावा, या निष्कर्षांला बळकटी देणाऱ्या आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहेत. ही मुलगी सिकलसेलच्या विकाराने ग्रस्त होती तसेच, तिला हृदयविकारही होता, याचा अहवालात उल्लेख आहे. याचिकेच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने सरकारी वकिलांना बरेच प्रश्न विचारले. या कारमध्ये ‘सेंट्रल लॉकिंग सिस्टिम’ असल्याचे कारचा चालक पानसे याने त्याच्या बयाणात म्हटले होते. असे असल्यास दारे बंद असताना ही मुलगी कारमध्ये शिरली कशी, अशी विचारणा न्यायालयाने केली. या कारची दुसरी चावी कुणाकडे आहे, हे शोधण्यासाठी कारच्या मालकाचे बयाण घेतले काय, असेही खंडपीठाने पोलिसांना उद्देशून विचारले. पोलीस आयुक्तांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन रासायनिक विश्लेषण अहवालाची माहिती दिली होती. या संदर्भात, केवळ वक्तव्ये देण्याऐवजी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करा, कारमालकाची चौकशी करा, अशी सूचना खंडपीठाने पोलिसांना केली. हा अहवाल आजच सादर करण्यात आला असल्याने त्याचा अभ्यास करून त्यावर उत्तर देण्यासाठी वेळ मिळावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांचे वकील अंजन डे यांनी केली. ती मान्य करून खंडपीठाने याचिकेची सुनावणी १८ तारखेपर्यंत पुढे ढकलली. सरकारतर्फे सरकारी वकील नितीन सांबरे आणि सहायक सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी काम पाहिले.