Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

कलावती यांच्या पदरी दिल्ली दरबारी निराशा
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

 

वर्षभरापूर्वी घरी येऊन आस्थेने विचारपूस करणारे काँग्रेसचे सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्या भेटीनंतर आशेचा किरण दिसलेल्या यवतमाळ जिल्ह्य़ातील कलावती यांच्या पदरी दिल्ली दरबारी मात्र निराशा पडली. ‘राहुल गांधी हे सत्तारूढ पक्षाचे असल्याने ते सतत व्यस्त असतात. यामुळे त्यांना यापुढे भेटणार नाही आणि तशी इच्छाही नाही’, असा निर्धार त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी विदर्भाचा दौरा केला. यात त्यांनी यवतमाळ जिल्ह्य़ातील जळका येथील कलावती यांच्या झोपडीला भेट देऊन आस्थेने विचारपूस केली. यानंतर लोकसभेतील भाषणातही गांधी यांनी कलावतीच्या दयनीय स्थितीकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. यामुळे सर्वत्र त्यांच्या नावाची चर्चा होऊन त्या एकदम प्रकाशझोतात आल्या. यानंतर सुलभ इंटरनॅशनलच्या वतीने त्यांना सहा लाख रुपयांची मदतही करण्यात आली, हे विशेष. तसेच, इतर स्वयंसेवी संघटनाही मदतीसाठी पुढे सरसावल्या. युवा भारतीच्या वतीने त्यांना दोन दिवसांपूर्वी दिल्लीला नेण्यात आले पण, राहुल गांधी यांची भेट होऊ शकली नाही. आज सकाळीच दिल्लीहून विमानाने त्या येथे आल्या व यवतमाळकडे रवाना झाल्या. राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी भेट दिल्यानंतर फक्त विचारपूस केली होती. त्यांनी कोणतेही आश्वासन दिले नाही. मात्र, त्यांच्या दौऱ्यानंतर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व अन्य नेत्यांनी मुलांच्या शिक्षणाची, मुलीच्या लग्नाचे आणि घर बांधून देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनांची पूर्तता होईल का, हे जाणून घेण्यासाठी दिल्लीला गेल्या होत्या पण, दोन दिवस प्रयत्न करूनही राहुल गांधी यांना भेटता आले नाही. उद्या किंवा परवा भेट होईल, असे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येत होते. गावात मुले एकटी असल्याने दिल्लीत राहण्याऐवजी लगेच परतल्या, असे कलावती यांनी सांगितले.