Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

राज्य


उन्हाळी सुट्टी संपत असताना पर्यटकांनी मुरुडचा जंजीरा किल्ला पाहण्यासाठी गर्दी केली. पाऊस जवळ आल्याने समुद्राच्या लाटांना उधाण आले होते. त्याची तमा न बाळगता पर्यटक मोठय़ा संख्येने मुरुडचा किल्ला पाहण्यासाठी चालले होते. (छाया : सुधीर नाझरे)

चिपळूण व गुहागर तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित
धीरज वाटेकर, चिपळूण, १० जून

पावसाळी हंगामाच्या पाश्र्वभूमीवर चिपळूण व गुहागर तालुक्यातील रस्त्यांच्या कामाला वेग आला असला, तरी अनेक ठिकाणची कामे आजही वर्षांनुवर्षे प्रलंबित आहेत. नव्याने सुरू असलेल्या काही कामांच्या अंदाजपत्रकात अचानक झालेली वाढ, योग्य वेळेत तरतूद न केली गेल्याने रस्ते रखडण्याचे चित्र दिसून येत आहे. दोन्ही तालुक्यांत असलेल्या धनगरवाडय़ांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांची वर्षांनुवर्षे असलेली दुरवस्था अद्यापि कायम आहे. मूलभूत मानवी अधिकार हक्काने मिळविण्याच्या युगात आजही पावसाळ्यात अनेक गावांमध्ये नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचे कुटुंब शेतीकामात मग्न
संगमेश्वर, १० जून/वार्ताहर

गत आठवडय़ात कोकणच्या विविध भागांत दमदार पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांचे सर्व कुटुंबच शेतीच्या कामात मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत मात्र अपेक्षित पाऊस पडलेला नाही. कोकणातील मुख्य पीक भातशेती हेच असल्याने पेरणीपासून कापणीपर्यंत कोकणचा शेतकरी शेतीच्या कामात मग्न असतो. यावर्षीही वेळापत्रकानुसारच पेरण्या आटोपल्या असून, सद्यस्थितीत रोपांची वाढही चांगली होत असल्याचे पाहायला मिळते.

गृहमंत्री जयंत पाटील यांची घोषणा
पोलिसांसाठी राज्यात गृहनिर्माण प्रकल्प

अलिबाग, १० जून/प्रतिनिधी

पोलिसांकडून कार्यक्षम सेवा आणि कायदा सुरक्षा टिकवण्याची अपेक्षा आपण करीत असतानाच त्यांना आधुनिक सुविधाही मिळणे आवश्यक आहे. या विचारास राज्य सरकारने चालना दिली असून, अलिबाग येथे होत असलेल्या पोलीस गृहनिर्माण प्रकल्पासारखेच गृहनिर्माण प्रकल्प राज्यात सर्वत्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री जयंतराव पाटील यांनी आज येथे बोलताना केली़

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या महसुलात वाढ
चंद्रपूर,१० जून/ प्रतिनिधी

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यंदा देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी वाढल्याने ताडोबाच्या पर्यटन महसुलात तब्बल पाच लाखाने वाढ झालेली आहे. यापूर्वी आठ ते दहा लाखाचे वार्षिक उत्पन्न देणाऱ्या ताडोबा प्रकल्पाने यंदा पंधरा लाख रुपयांवर पर्यटन महसूल गोळा केल्याने वन खात्यात आनंदाचे वातावरण आहे.

सप्टेंबरमध्ये नागपुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया आणि निर्झर फिल्म सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात प्रथमच येत्या सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

कुटाफळी शिवारातील घटना
विहिरीत पडलेल्या बिबटय़ाच्या दोन छाव्यांना जीवदान

नेरपरसोपंत, १० जून / वार्ताहर

तालुक्यातील कुटाफळी जवळील जंगलात अर्धवट खोदलेल्या विहिरीत पडलेल्या बिबटय़ाच्या दोन छाव्यांना वन कर्मचारी व गाककऱ्यांच्या मदतीने जीवदान मिळाले आहे. दोन्ही छाव्यांना विहिरीतून बाहेर काढून जंगलात सोडून देण्यात आले.

ज्येष्ठ पत्रकार शंकर कासकर यांचे निधन
सावंतवाडी, १० जून/वार्ताहर शिरोडा येथील पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर शंकर ऊर्फ चंदू कासकर (७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी शुभांगी कासकर शिरोडा गावच्या सरपंच आहेत.
चंदू कासकर यांनी दै. गोमंतकमध्ये गोव्यात पत्रकारिता केल्याने त्यांची कर्मभूमी गोवा ठरली. त्यांनी १९७२ पासून पत्रकारितेला प्रारंभ केला. कासकर यांची जडणघडण राष्ट्रसेवा दलातून झाली. बॅ. नाथ पै, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, प्रा. मधु दंडवते, किशोर पवार, जयानंद मठकर आदींशी त्यांचे कौटुंबिक स्नेहसंबंध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी, चार विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

वीज दरवाढ आक्षेपांची नियामक आयोगाकडून दखल
देवरुख, १० जून/वार्ताहर

देवरुख संघर्ष समितीतर्फे महावितरणच्या वीज दरवाढीच्या निर्णयावर घेण्यात आलेल्या आक्षेपाची दखल राज्य वीज नियामक आयोगाने घेतली आहे. महावितरणच्या हरकतींबाबत २१ जून रोजी पुण्यात वीज नियामक आयोगातर्फे बैठक होणार असून, ग्राहकांचे म्हणणे मांडण्यासाठी या सुनावणीस देवरुख संघर्ष समितीचे चार पदाधिकारी हजर राहणार आहेत. वीज नियामक आयोगासमवेत होणाऱ्या चर्चेत देवरुख संघर्ष समितीतर्फे युयुत्सु आर्ते, देवरुख सरपंच दिलीप बोथले, देवरुख व्यापारी संघटना अध्यक्ष विकास जागुष्टे, वीजग्राहक संघटनेचे अशोक जाधव आदी सहभागी होणार आहेत. वीज दरवाढ प्रस्ताव, स्थिर आकार, अतिरिक्त आकार, इंधन समायोजन आणि वितरण हानी, अतिरेकी खर्च, भांडवली खर्च, अंमलबजावणी यंत्रणा आणि दरवाढ या विविध मुद्दय़ांवर हरकती घेण्यात आल्या आहेत. आयोगासमोर या प्रत्येक मुद्दय़ावर सविस्तर चर्चा होणार आहे. प्रत्येक वीज बिलात १२ ते १३ टक्के गव्हर्न्मेंंट डय़ुटी आकारली जाते व थकित बिलांवर २४ टक्के व्याज आकारले जाते, ही लूट असल्याची समितीची भूमिका आहे.