Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

लग्नाआधी अपत्य झालेल्या आदिवासी वधु-वरांचे ‘कन्यादान’ करण्यास शासनाचा नकार!
श्रमजीवी संघटना करणार हल्लाबोल
सोपान बोंगाणे
ठाणे- लग्नाचा खर्च करण्याएवढेही पैसे नसल्याने आदिवासी समाजातील हजारो जोडपी विवाह न करताच एकत्र राहतात आणि पुढे आर्थिक ऐपत झाली की काही वर्षांंनंतर त्यांची मुलेच त्यांचा रीतसर विवाह लावून देतात! वर्षांनुवर्षे आदिवासींत सुरू असलेली ही प्रथा शासनाला ठाऊक असूनही सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या अशा अपत्य असलेल्या जोडप्यांना विवाहापूर्वीच मुल झाल्याचे कारण पुढे करून शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘कन्यादान’ योजनेचा लाभ देण्यास अधिकारी नकार देत आहेत.

अशी आहे कन्यादान योजना!
अठरा विसे दारिद्रय़ात जगणाऱ्या आदिवासीला लग्नासाठी कर्ज घेऊन पुन्हा वेठबिगारीच्या विळख्यात अडकण्याची वेळ येऊ नये, म्हणून त्यांच्या सामूहिक विवाह पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘कन्यादान’ योजना सुरू केली आहे. १८ ते २१ वयोगटातील वधु-वरांच्या प्रथम विवाहासाठी १० हजार रुपये अनुदान देण्याची ही योजना आहे. राज्यभरात दरवर्षी आदिवासींचे १० ते १२ हजार विवाह अशा प्रकारे होतात.
२००४-२००५ मध्ये शासनाने ही योजना लागू केली.

विजेचा गोंधळ आणि घामाच्या धारा!
ठाणे/ प्रतिनिधी

ये रे ये रे पावसा, असे बोलवूनही पाऊस यायचे नाव नाही. त्यामुळे घामाच्या धारांनी ठाणेकर हैराण झाले असताना रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराने लोकांच्या त्रासात आणखीनच भर पडत आहे. गेले दोन दिवस वागळे इस्टेट परिसरातील लुईसवाडी भागात रात्री नऊ, साडेनऊ वाजले की वीजपुरवठा खंडित होतो. सोमवारी रात्री नऊ वाजता गेलेली वीज पहाटे तीन वाजता आली.

नालेसफाईचा बोजवारा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा ठराव मंजूर
ठाणे/प्रतिनिधी

आगामी पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर दोन कोटी रुपये खर्चून शहरातील नालेसफाई करण्यात आल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र नालेसफाईच्या कामाचा बोजवारा उडाल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. त्यावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश महापौर स्मिता इंदुलकर यांनी सर्वसाधारण सभेत दिले.

ग्राहक न्यायालयाने निकाल देऊनही पैसे देण्यास सिटी बँकेची टाळाटाळ!
ठाणे/ प्रतिनिधी

कर्जाची रक्कम देताना ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी नुकसानभरपाई देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने देऊनही सिटी बँकेने ग्राहकाला पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. वागळे इस्टेट भागातील हॉटेल हिंदुस्तानचे मालक एस.एन.अहमद यांनी २००१ मध्ये कार खरेदीसाठी सिटी बँकेकडे दोन लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. बँकेने त्यांना कर्जाचा पहिला हप्ता म्हणून ७२१६ रुपये कापून एक लाख ९१ हजार २८४ रुपयांचा चेक दिला.

ठाण्यात साकारतेय अद्ययावत वाचनालय
ठाणे/प्रतिनिधी

वाचनाची भूक भागविण्यासाठी ठाण्यातील वर्तकनगरमध्ये एक अद्ययावत आणि २४ तास सुरू राहणारे वाचनालय सुरू करण्यात येत आहे. त्यात मराठी भाषेची उत्पत्ती, विकासावर आधारित खास दालन तयार करण्यात येणार असल्याची माहिती अभिनेता, लेखक मिलिंद गुणाजी यांनी दिली तर २३ जुलै रोजी वाचनालयाचा लोकार्पण सोहळा होईल, असे माजी नगरसेवक प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

साठी उलटली तरी आदिवासी स्वातंत्र्याच्या शोधात !
वाडा/वार्ताहर

देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली असली तरी ग्रामीण, आदिवासी भागातील हजारो जनतेला आजही स्वातंत्र्याची फळे चाखायला मिळत नसतील तर हे स्वातंत्र्य काय कामाचे? कुठे स्वातंत्र्य, कुणा स्वातंत्र्य, आता स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईसाठी सज्ज व्हा, अशी संतप्त भावना श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदिश धोडी यांनी मंगळवारी विक्रमगड येथे व्यक्त केली.

शिवशक्ती-भीमशक्ती म्हणजे चार भिंतीतील तडजोड -इंदिसे
ठाणे/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे काही नेत्यांनी आरपीआय ऐक्याची सुरू केलेली भाषा स्वागतार्ह असली, तरी त्या पुढाऱ्यांनी अध्यक्षपदाची अपेक्षा धरू नये. आरपीआयचे हे ऐक्य महाराष्ट्र पुरते न ठेवता देशपातळीवर करावे, असे परखड मत व्यक्त करीत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ऐक्यवादी) नेते गंगाराम इंदिसे यांनी मंगळवारी शिवशक्ती-भीमशक्ती नाकारत विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याची घोषणा केली.

प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी
डोंबिवली/प्रतिनिधी - भोपर येथील धनलक्ष्मी फॅब्रिक्स ही कंपनी प्रदूषण करीत असून, परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. या कंपनीविरुद्ध येत्या आठ दिवसांत कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा विराट मोर्चा पालिकेवर आणला जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश म्हात्रे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाला दिला आहे.
म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे, धनलक्ष्मी कंपनीच्या चिमणीमधून कार्बनयुक्त पावडर मोठय़ा प्रमाणात बाहेर पडते. ही पावडर वाऱ्याप्रमाणे इतस्तत: पसरते. घरातील साहित्य या कर्बयुक्त पावडरमुळे काळे पडत जाते. याशिवाय या भागातील पूजा, महावीर डाईंग कंपन्यांच्या बॉयलरमधून प्रदूषण होत आहे. नागरिक या प्रदूषणामुळे हैराण झाले आहेत. नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होण्यापूर्वीच या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या भागाचा पाहणी दौरा करून मशिनद्वारे प्रदूषण नियंत्रणाचे प्रमाण बघून ज्या कंपन्या प्रदूषण करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे. मानपाडा पोलिसांना याबाबत कळविण्यात आले आहे.

कोलशेतमधील अतिक्रमणे जमीनदोस्त
ठाणे/प्रतिनिधी: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोलशेतजवळील तुरफेपाडय़ातील शासकीय जमिनीवरील ३६ अनधिकृत बांधकामे मंगळवारी महसूल विभागाने जमीनदोस्त केली आहेत. यापुढेही अशी कारवाई सुरू राहणार असून नागरिकांनी घर किंवा दुकानांचे गाळे खरेदी करू नयेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी पद्माकर रोकडे यांनी केले आहे. घोडबंदर रोडवरील महसूल जमिनीवर मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून डोंगर गिळंकृत केले आहेत.

वृद्ध दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
ठाणे /प्रतिनिधी

आर्थिक चणचणीमुळे झालेल्या वादातून एका वयोवृद्ध दाम्पत्याने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी कळवा खारेगांव येथे घडली. खारेगांवमध्ये राहणारे भगवान रंगनाथ काळे (६०) आणि त्यांची पत्नी चित्रा काळे (५०) यांच्यात पैशावरून भांडण झाले. रागाच्या भरात दोघांनीही अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. चित्रा रेल्वेतून वस्तू विकत असे, तर भगवान मजुरी करून दोघांचा उदरनिर्वाह करीत असे.

ज्ञानप्रबोधिनीतर्फे संवाद स्त्री
डोंबिवली - ‘संवाद स्त्री पुरोहिताशी’ हा कार्यक्रम शनिवार १३ जून रोजी डोंबिवलीत आयोजित करण्यात आला आहे. पेंडसेनगरमधील कानविंदे व्यायामशाळेत संध्याकाळी पाच वाजता होणारा हा कार्यक्रम ज्ञानप्रबोधिनी उपकेंद्र, डोंबिवली शाखेने आयोजित केला आहे. ‘संवादिनी’उपक्रमांतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमात सोलापूरच्या प्रसिद्ध स्त्री पुरोहित अपर्णा कल्याणी सहभागी होणार आहेत. यावेळी मुलाखत व प्रश्नांची उत्तरे असा कार्यक्रम होणार आहे. संपर्क-स्मिता चावरे- ९९३०१४५२११.