Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

व्यक्तिवेध

भाषांतर हा कोणत्याही लेखकाला आणि वाचकाला सतत आव्हान वाटणारा विषय. एका भाषेतली साहित्यकृती दुसऱ्या भाषेत जशीच्या तशी पोहोचवणे हे केवळ दोन भाषा अवगत असणाऱ्याचे काम असते, असे वरवर वाटत असले तरीही केवळ भाषा समजणे आणि त्याच्या आधारे एखादी कलाकृती दुसऱ्या भाषेत अनुवादित करणे एवढे हे सोपे काम नसते. दोन भाषांचा हा संगम म्हणजे दोन भाषक संस्कृतींचा संगम असतो आणि तो अतिशय तरलपणे आणि गांभीर्यानेच होणे आवश्यक असते. भाषांतराच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असलेले पुण्यातील भाषातज्ज्ञ विद्यासागर

 

महाजन यांचे अकाली निधन, त्यामुळेच अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने भाषांतराच्या चळवळीला काहीसा ब्रेक लागणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या कार्याचे महत्त्व सतत अधोरेखित होणार आहे. जर्मन आणि स्पॅनिश या दोन भाषांवर प्रभुत्व असलेले महाजन हे केवळ त्या भाषांचे प्राध्यापक नव्हते. त्या भाषांतील साहित्याची मराठी भाषकांना केवळ ओळखच नव्हे तर त्यातून व्यक्त होणारी संस्कृती पोहोचवण्याची त्यांची धडपड असे. त्यासाठी त्यांनी ‘कलासक्त’ ही संस्था व ‘केल्याने भाषांतर’ हे त्रमासिकही सुरू केले. देशोदेशीच्या उत्तम कलाकृती त्या त्या भाषेतून भाषांतरित करून त्या मराठी वाचकापर्यंत पोहोचविण्याचा हा एक आगळा उपक्रम होता. त्या भाषेतील अनुभवाच्या अधिकाधिक जवळ जाणारे भाषांतर करण्याचे कसब आणि कौशल्य आत्मसात करणाऱ्या नव्या लेखकांचा संच तयार करण्यासाठी विद्यासागर महाजन त्यांना सतत प्रोत्साहित करीत असत. मराठीतील बहुतेक भाषांतरे इंग्रजी भाषेतील अनुवादावर आधारित असतात. महाजन यांच्या प्रयत्नांमुळे मूळ परदेशी भाषेतून थेट मराठीत भाषांतर होण्याच्या प्रक्रियेला वेग आला. त्यामुळे अनुभवांतराच्या प्रक्रियेतील एक टप्पा आपोआप गळून पडला आणि दोन भाषांमध्ये थेट संवाद सुरू झाला. भाषांतर हे केवळ कौशल्यावर आधारित असता कामा नये. त्यासाठी तेथील संस्कृतीशी ओळख होणे महाजन यांना अधिक महत्त्वाचे वाटत असे. तसा त्यांचा सतत आग्रह असे. ते आयोजित करीत असलेल्या भाषांतर कार्यशाळेतही यावरच भर देण्यात येत असे. त्यामुळे भाषांतर ही एक चळवळ व्हायला हवी, असे त्यांना वाटे. त्या वाटण्यातूनच त्यांनी त्रमासिक सुरू केले. परंतु ते तेवढय़ावरच थांबले नाहीत. त्यांनी भाषांतरित कथांच्या वाचनाचा एक आगळावेगळा प्रयोगही सादर केला. ‘तिकडून आणलेल्या गोष्टी’ या नावाच्या या प्रयोगात अमोल पालेकर, अतुल कुलकर्णी यांच्यासारखे अनेक प्रथितयश कलावंत सहभागी होत असत. कथांच्या अभिवाचनाचा हा प्रयोग मराठी वाचकांनी खूपच उचलून धरला. परभाषेवर प्रेम करायला शिकवणारा हा प्रयोग महाराष्ट्रातील सध्याच्या ‘मराठीप्रेमी’ वातावरणात अधिक उठून दिसणारा होता. आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगत असताना परभाषेतील साहित्याचा आस्वाद घेण्याची आपली आवड आपण दाबून टाकता कामा नये, हे सूत्र या उपक्रमांमागे होते. जगाच्या कानाकोपऱ्यात निर्माण होत असलेल्या साहित्याचे अनुवाद करणाऱ्या अनेक भाषांमध्ये मराठी भाषेचाही समावेश होण्यात विद्यासागर महाजन यांच्या भाषांतर चळवळीचाही वाटा आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. भारतीय भाषांच्या अनुवादाबाबत मराठी भाषेने बऱ्यापैकी मजल मारलेली आहे. कन्नड, गुजराती, सिंधी, हिंदी अशा भाषांतील उत्तम कलाकृतींचा अनुवाद आज मराठीत उपलब्ध होऊ लागला आहे. भारतीय अनुभवाच्या अवकाशाबाहेरचे जग मराठी मनाला कवेत घेता यावे, यासाठीही चळवळीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, यात शंका नाही. स्वत: महाजन यांनी प्रसिद्ध जर्मन लेखिका इव्हा हेलरच्या बेस्ट सेलर पुस्तकाचा ‘दुसऱ्या जोडीदाराच्या शोधात’ हा केलेला अनुवादही खूप गाजला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्राध्यापक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी होण्यासाठी आवश्यक ज्ञान देण्यापेक्षा त्या भाषेच्या माध्यमातून एका वैश्विक अनुभवापर्यंत त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न महाजन यांनी केला. त्यामुळेच ते विद्यार्थिप्रिय अध्यापक ठरले. वयाच्या अवघ्या ५३व्या वर्षी त्यांचे निधन होणे म्हणजे मराठीची जगातील अन्य भाषांबरोबर नाळ जोडण्याच्या प्रयत्नांना धक्का आहे.