Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

शेतकरी पीक कर्जापासून वंचित
बुलढाणा, १० जून / प्रतिनिधी

मृग लागूनही पावसाची चिन्हे नाहीत, खरीप पेरणीच्या तोंडावर गटसचिवांनी पुकारलेला संप आणि नवीन पीक कर्ज वाटप करणाऱ्या बँकांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित राहावे लागत आहे. पेरणीजवळ आली असतानादेखील जिल्ह्य़ातील बहुतांश शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही. यावर्षी कृषी खात्याने ७ लाख ७० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे.

विहिरीत पडलेल्या बिबटय़ाच्या दोन बछडय़ांना जीवदान
कुटाफळी शिवारातील घटना
नेरपरसोपंत, १० जून / वार्ताहर

तालुक्यातील कुटाफळी जवळील जंगलात अर्धवट खोदलेल्या विहिरीत पडलेल्या बिबटय़ाच्या दोन बछडय़ांना वन कर्मचारी व गाककऱ्यांच्या मदतीने जीवदान मिळाले आहे. दोन्ही बछडय़ांना विहिरीतून बाहेर काढून जंगलात सोडून देण्यात आले. कुटाफळी हे जेमतेम सात घरे असलेले छोटेसे खेडेगाव. शिवारात प्रकाश हरलाल चव्हाण यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू आहे. अगदी १५ फुटावर पाणी लागले आहे.

२० लाखांची लाकडे रस्त्यावर बेवारस
बुलढाणा, १० जून /प्रतिनिधी

सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद रस्त्यावरील सामाजिक वनीकरण विभागाच्या शेजारी असलेल्या जागेवर जवळपास २० लाख रुपये किमतीच्या आडजात लाकडांचा साठा बेवारस स्थितीत पडून आहे. परंतु, वन विभागाने अद्यापही लाकडे जप्तीची कारवाई केली नाही. त्यामुळे ही लाकडे कोणाच्या मालकीची आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून परिसरात मोठय़ा प्रमाणात आडजात वृक्षांची तोड करण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा
पावसाळ्यात मुख्यालयी हजर राहणे बंधनकारक

धारणी, १० जून / वार्ताहर

पावसाळ्यात आदिवासी भागात मुख्यालयी अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा अमरावतीचे जिल्हा अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी धारणी येथे दिला. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सभागृहात नवसंजीवन आढावा बैठकीत ते बोलत होते.

शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाला ‘मनसे’ने काळे फासले
चिखली, १० जून / वार्ताहर

येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक समाधान पडघान यांच्या शिकवणी वर्गावर छापा घालून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष तुषार बोंद्रे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पडघान यांच्या तोंडाला काळे फासले.शासकीय व अनुदानित संस्थांमधील शिक्षक व प्राध्यापक यांच्या विरोधात कठोर कारवाई करीत शहरातील सर्व शिकवण्या त्वरित बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर शाखेने केली. प्रशासनाच्यावतीने यावर कोणतीही कारवाई न झाल्याने मनसे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आंदोलन सुरू केले. मंगळवारी सायंकाळी शिवाजी महाविद्यालयासमोरील समाधान पडघान यांच्या शिकवणी वर्गावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. मनसेचे शहर प्रमुख तुषार बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली १०-१२ कार्यकर्त्यांनी शिकवणी घेत असलेले समाधान पडघान यांच्या तोंडाला काळा रंग फासला. शहरातील अवैध शिकवणी वर्गावर धाड घालून आंदोलनाचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.

लाखनीत नवविवाहितेची आत्महत्या
भंडारा, १० जून / वार्ताहर

लाखनी तालुक्यातील केसलवाडा (पोवार) येथे कल्पना संदेश रामटेके (१८) या नवविवाहितेनी रॉकेल टाकून पेटवून घेतले. येथील जिल्हा रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. गेल्या ३ मे २००९ रोजी तिचे लग्न झाले पण, लग्नाला महिनाही उलटण्याच्या आत २७ मे रोजी तिने जाळून घेतले. कल्पनाचे माहेर कोरंबीचे (देवी) आहे. ती एक वर्षांची असताना तिच्या आईने विष घेऊन आत्महत्या केली होती, असे समजते. वडील अपंग आणि आजारी आहे. गावसमाजाने तिचे लग्न लावून दिले. परंतु सासरी जाताच तिला मानसिक यातनांना तोंड द्यावे लागले.तसे तिने कोरंबी येथे काकांना कळविले होते. २७ मे ०९ रोजी भर दुपारी कुपनलिकेवर पाणी भरायला गेली असता नवऱ्याने तिला केस ओढत घरी आणले आणि मारहाण केली. अखेर तिने रॉकेल अंगावर ओतून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना दिलेल्या बयाणात नवऱ्याच्या त्रासामुळे जाळून घेतले, असे तिने सांगितले. लाखनी पोलीस ठाण्यात संदेश रामटेकेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नागझिरा अभयारण्याचे आरक्षण म्हणजे द्राविडी प्राणायाम
भंडारा, १० जून / वार्ताहर

नागझिरा अभयारण्य क्षेत्र भंडारा जिल्ह्य़ातील साकोलीला निकटचे असले व पर्यटकांनाही ते जवळचे वाटत असले तरी आरक्षणाकरिता मात्र पर्यटकांना गोंदिया किंवा नागपूर वनविभागाकडेच जावे लागते. नागझिरा अभयारण्य विभाजनानंतर गोंदिया जिल्ह्य़ाच्या ताब्यात गेले आहे. परंतु, या अभयारण्याचा बहुतेक अधिकाधिक भाग तसेच पर्यटकांना प्रवेशाकरिता सोयीचा भाग भंडारा जिल्ह्य़ातील साकोली या स्थानापासूनच आहे. या अभयारण्याचे विभागीय कार्यालय साकोली येथे आहे. परंतु, नागझिरा अभयारण्यात राहण्याच्या दृष्टीने आरक्षणाची सोय किंवा नोंदणीची सोय साकोली कार्यालयात नाही व भंडारा वनकार्यालयातही आरक्षण करता येत नाही. त्याकरिता गोंदिया आणि नागपूर या दोन ठिकाणाशीच संपर्क साधावा लागतो.बहुतेक पर्यटक साकोली कार्यालयात आरक्षणाकरिता येतात. येथून नकार मिळाल्यावर गोंदियाकडे त्यांना सुमारे ६० मैलाचे अंतर कापून जावे लागते. नोंदणी संदर्भात साकोली येथे कार्यालय ठेवले तर पर्यटकांना विनाकारण लांबचा चक्कर मारावा लागणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे १३ जूनला अनावरण
उमरखेड, १० जून / वार्ताहर
वसंत सहकारी साखर कारखाना परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण येत्या १३ जून रोजी माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर.आर. पाटील यांच्या हस्ते होणार आहे.याप्रसंगी पालकमंत्री मनोहर नाईक, वनमंत्री बबनराव पाचपुते, काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती ‘वसंत’चे अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर यांनी दिली.कृषीमंत्री शरद पवार यांच्या तारखेसाठी दोन वेळा या पुतळ्याचे अनावरण लांबले होते. दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला कोणी येत नसेल तर आम्हीच ६ जूनला पुतळ्याचे अनावरण करू, असे निवेदन दिले होते. त्यामुळेच हा कार्यक्रम १३ जून रोजी पार पडत आहे.

विद्युत रोहित्रातून तारेची चोरी
वाशीम, १० जून / वार्ताहर
तालुक्यातील बोराळा धरणानजीक विद्युत रोहित्र पाडून चोरटय़ांनी ६० हजार रुपये किमतीची तांब्याच्या तार चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली.तालुक्यातील बोराळा धरणानजीक असलेल्या विद्युत रोहित्रातील ११० किलो तांब्याची तार ४ जून रोजी अज्ञात चोरटय़ांनी चोरून नेली. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता रवींद्र व्यवहारे यांनी मंगळवारी वाशीम पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वाशीम तालुक्यामध्ये यापूर्वी विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या अ‍ॅल्युमिनियमच्या तारा, विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारा अनेकवेळा चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत. वाढत्या घटनांमुळे विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी हतबल झाले असून पोलिसांनी या घटनांचा शोध लावावा, अशी मागणी होत आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा उबदा येथे मेळावा
हिंगणघाट, १० जून / वार्ताहर
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा उबदा येथे नुकताच पार पडला.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष किरण उरकांदे होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव माधव घुसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मेळाव्याच्या सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित खासदार दत्ता मेघे यांच्या अभिनंदनाचा व मतदारांच्या आभाराचा ठराव मंजूर करण्यात आला.सभेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणूक पक्षाने स्वबळावर लढवावी, असा सूर निघाला.संचालन जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रसन्न बैद यांनी केले. मेळाव्याला काँग्रेसच्या सेवकांसह गिरधर राठी, काशिराम श्रीवास, जसवंत आर्य, शालीक डेहणे, दादाराव वैद्य, प्रा. शेष तळवेकर, शेख सरफू, विजय जवादे उपस्थित होते.

निवडणुकीत ‘एसटी’ला अडीच कोटींचा नफा
भंडारा, १० जून / वार्ताहर
लोकसभा निवडणुकीमुळे अडीच कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी राज्य परिवहनाच्या भंडारा-गोंदिया आगाराला मिळाला आहे.भंडारा विभागात भंडारा, गोंदिया, तुमसर, तिरोडा, साकोली व पवनी आगार येतात. मागच्या आर्थिक वर्षांत ६६ कोटी तीन लाख रुपये या विभागाला प्राप्त झाले होते. त्यात नफ्याचे प्रमाण तीन कोटी ८६ लाख रुपये होते परंतु, यंदा निवडणुकीमुळे छत्तीसगड राज्यामध्ये बसगाडय़ांची मागणी होती. शिवाय राजकीय पक्षांचे शेतकरी मेळावे, महिला मेळावे आदींसाठी बसगाडय़ांची मागणी वाढली होती. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षांत भंडारा विभाग पाच कोटी ९८ लाख रुपयांनी नफ्यात असल्याचे भंडाऱ्याचे विभाग नियंत्रक अ.ना. गोहत्रे यांनी सांगितले.

अडय़ाळ उपबाजार समितीचे ‘लिलावशेड’ निरुपयोगी
भंडारा, १० जून / वार्ताहर
अडय़ाळ येथील कृषी उपबाजार समिती अंतर्गत उभारलेले लिलावशेडमध्ये गेल्या ६ ते ७ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाचा लिलाव या ठिकाणी न झाल्याने निरुपयोगी ठरले आहे.शेतकऱ्यांनी घेतलेल्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा व खासगी व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये म्हणून पवनी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत अडय़ाळ येथे कृषी उपबाजार समिती तयार करून सन २००० मध्ये लिलावशेड उभारण्यात आले. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाचा बोलीद्वारे लिलाव करून खुल्या बाजारामध्ये उपबाजार समितीच्या माध्यमातून माल विकून चांगला भाव मिळवून दिला जातो परंतु, अडय़ाळ येथील कृषी उपबाजार समितीत शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला भाव तर सोडाच साधा लिलावसुद्धा होत नाही. पवनी कृषी उत्पन्न बाजार समितीने अडय़ाळ उपबाजार समिती वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला भाव मिळण्यापासून वंचित ठेवले आहे.अडय़ाळ येथील बाजार समिती बंद असल्याने या परिसरात खासगी व्यापाऱ्यांचा शिरकाव झालेला आहे, असे दिसून येते.

साकोलीत पुलाचे बांधकाम थांबविण्याची मागणी
साकोली, १० जून / वार्ताहर
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून साकोलीत एका पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. हे काम बंद करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. शहरातून पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. पुलाच्या बांधकामामुळे साकोली शहराचे दोन भाग पडले आहेत. पूल बांधत असताना त्यासाठी खांब बांधणे गरजेचे होते. मात्र, खांब न बांधता पुलाखाली भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे शहराचे दोन तुकडे झाले आहे. या परिसरात असलेल्या फुटपाथ दुकानदारांनाही त्यांचा रोजगार सोडावा लागला आहे. पुलाखाली खांब बांधल्यास लहान दुकाने लागतील व पार्किंगची सोयसुद्धा होऊ शकेल. त्यामुळे या पुलाचे बांधकाम थांबवून पुलाखाली खांब घालण्यात यावेत. या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

तंबाखूजन्य पदार्थाची हिवरात होळी
गोंदिया,१० जून / वार्ताहर
जागतिक विश्व तंबाखू विरोधी दिनी बाहेकार व्यसन मुक्ती केंद्राच्या वतीने जवळील हिवरा येथे तंबाखूजन्य पदार्थाची होळी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिवरा गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजकुमार लिल्हारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यसनमुक्ती केंद्राचे चंद्रसेन शिंपे, सुनीता पटले, तंटामुक्त समितीच्या सदस्या राधिका साखरे, अनिता वालदे, ग्रामपंचायत सदस्य फुलीचंद बनोटे आदी उपस्थित होते.या प्रसंगी तंबाखूचा आरोग्यावर होणारा परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर तंबाखूजन्य पदार्थाना जाळण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन महेश भालोटिया यांनी तर आभार सीताराम फुंडे यांनी मानले.

बुलढाण्यात स्वच्छता मोहीम
बुलढाणा, १० जून / प्रतिनिधी
बुलढाणा नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई मोहीम हाती घेतली आहे. शहरातील विष्णूवाडी परिसरातील नाल्यांची सकाळपासूनच स्वच्छता मोहीम सुरू झाली होती. बुलढाणा शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता सफाई कामगारांची संख्या अपुरी आहे. तरीसुद्धा स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.

राजकारणापेक्षा समाजकारण श्रेष्ठ- प्रकाश डहाके
मानोरा, १० जून / वार्ताहर
समाजकारणाची जाणीव राजकारणापेक्षा श्रेष्ठ ठरते, असे प्रतिपादन कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके यांनी येथे केले. बहुजन प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी येथे व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. मानोरा पंचायत समितीच्या वसंतराव नाईक सभागृहात ही व्याख्यानमाला झाली. या प्रसंगी जयकिसन राठोड, संजय रोठे, बाबाराव डाळेराव, अन्नपूर्णा बुजाडे, भावसिंग राठोड, इप्तेखार पटेल, मधुकर पाटील, अरुण खंडागळे, गजानन बनारसे उपस्थित होते. माणिक डेरे, जगदीश राठोड, ठाकूरसिंग चव्हाण आदींचा यावेळी सत्कर करण्यात आला.

दीपक गव्हाणे यांचे निधन
पांढरकवडा, १० जून / वार्ताहर
पांढरकवडा येथील बाबासाहेब पारवेकर महाविद्यालयाचे निवृत्त कर्मचारी दीपक बापुराव गव्हाणे यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५९ वर्षांंचे होते. मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पत्नी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

सौरभ धकीतेचे सुयश
तुमसर, १० जून / वार्ताहर
सौरभ सुधाकर धकीते याने सीबीएससीच्या १० वीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. तुमसरच्या शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधाकर धकीते यांचा सौरभ मुलगा आहे.

शेतातील विहिरीत तरुणाचा मृतदेह
चंद्रपूर, १० जून / प्रतिनिधी

रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चक निंबाळा येथे शेतशिवारातील विहिरीत राजेश आनंदराव उमरे (२५) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते.