Leading International Marathi News Daily
गुरुवार, ११ जून २००९
  स्पेलिंग बी!
  ओपन फोरम
  ग्रूमिंग कॉर्नर - दिसतं तसं नसतं..
  क्रेझी कॉर्नर - ‘वाइफ इज ऑलवेज राइट’
  स्मार्ट बाय
  मेल बॉक्स
  दवंडी - गावकुसातली आकाशवाणी
  लँग्वेज कॉर्नर - जर्मनीतील ‘हरित क्रांती’
  यंग अचिव्हर्स - गवसलेलं क्षेत्रं
  एका लग्नाची गोष्ट
  इव्हेंटस कॉर्नर - शिल्पा आनंद यांचे ब्रायडल कलेक्शन
  नेट कॉर्नर - Little girl
with spunk!
  ब्यूटी कॉर्नर - मुलायम, घने लंबे बाल..

घरोघरी - खारीचा वाटा
वेदा : अरे, इथे हॉलमध्ये कोणीच नाहीये आणि तरी दिवे-पंखे सगळं चालू आहे. नक्कीच विराजचं काम असेल हे..
वैशाली : वेदा, काय झालं?
वेदा : काय झालं? नेहमीप्रमाणे विराजनं दिवे-पंखे तसे चालू ठेवलेत आणि स्वत: कुठे तरी निघून गेलाय..
वैशाली : विराजचं हे नेहमीचं आहे हं. किती वेळा सांगितलं खोलीतून बाहेर पडताना सगळे दिवे-बिवे बंद केलेत का नाहीत ते बघूनच बाहेर पडावं पण ते काही त्याला अजून जमत नाही.

 

विराज : कोणाला काय जमत नाही?
वेदा : घ्या. म्हणजे हा सगळा आरडा ओरडा तुझ्या नावानं चाललाय तरी तुला पत्ताच नाही ना त्याचा.
विराज : माझ्या नावानं आरडाओरडा ना.. तो काय सतत चालूच असतो. नवीन काय त्यात? बरं पण आता कशासाठी माझ्या नावानं शिमगा करत होतात दोघीजणी?
वेदा : नेहमीचच कारण. दिवे चालू ठेवणं..
विराज : पण आता कुठले दिवे चालू होते?
वेदा : हॉलमधले.
विराज : मग माझा काय संबंध? मी तर अजून हॉलमध्ये पायही टाकला नाहीये. माझ्या खोलीतून मी आता बाहेर येतोय. हे बरंय हं, काहीही झालं की तुम्ही दोघी माझ्यावरच संशय घेता हं.
वेदा : कारण तू वागतोसच तसा.
विराज : अहाहा, जसं काही तू कधी चुकतच नाही. नाही, पण तुझ्यावर नाही कधी कोणी संशय घेणार. मी बरा सारखा सगळ्यांच्या कचाटय़ात सापडतो. कानफटय़ा नाव पडल. माझं. उद्या इथिओपियात काही झालं तरी तुम्ही पहिल्यांदा माझंच नाव घ्याल..
वैशाली : ए, उगीच मूर्खासारखं काही तरी बोलू नकोस. पण मला हे कळत नाहीये की आपण तिघंही हॉलमध्ये नव्हतो. मग हॉलमधला दिवा-पंखा कोणी लावला?
विराज : obviously बाबांनी.
वैशाली : पण हे तर फिरायला गेलेत ते अजून आलेत कुठे?
वेदा : मग कोणी दिवे लावले?
विराज : तूच असशील. तुलाच सकाळी टीव्ही बघायचा असतो.
वेदा : ए शहाण्या, दिवे चालू ठेवले तर मला राग येतो. त्यामुळे मी नेहमी दिवे बंद करते. अरे वीज वाचवण्याची किती गरज आहे. जरा खेडय़ात जाऊन बघा. १७-१७, १८-१८ तास लोड शेडिंग असतं. कशी राहत असतील. कशी जगत असतील ती माणसं? आपल्याकडे आहे म्हणून वाट्टेल तसं वापरायचं हा निव्वळ स्वार्थीपणा आहे..
विजय : काय वेदाबाई, अजून पर्यावरण दिनामधून बाहेर आला नाहीत वाटतं?
वेदा : म्हणजे काय? तुम्हाला असं म्हणायचंय का की फक्त पर्यावरण दिनाच्या दिवशीच मी ही पथ्यं पाळते. सॉरी हं बाबा. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे फक्त एका दिवसापुरतं मर्यादित नाही. त्यासाठी आम्ही वर्षभर काम करत असतो आणि इतरांनीही ही बांधिलकी मानावी यासाठी प्रयत्न करत असतो.
विराज : त्यामुळेच आज सकाळी सकाळी व्होल्कॅनो जागृत झाला आहे. हॉलमधले दिवे कोणी चालू ठेवले म्हणून आणि या कारणासाठी मला धारेवर धरण्यात आलं आहे.
विजय : हॉलमधले दिवे? हां, हां ते माझ्याकडून चालू राहिले. बाहेरून फिरून आलो तर घामाच्या नुसत्या धारा लागल्या होत्या. कोण उकडतंय नुसतं. म्हणून आल्या आल्या पंखा फुलवर केला आणि शांतपणे बसलो होतो. तेवढय़ात अविनाशने हाक मारली म्हणून खाली गेलो तर दिवा आणि पंखा चालूच राहिला.
विराज : बघ आणि तू उगीचच माझ्या नावाने शंख केलास. आता का गप्प बसली आहेस़? दे ना मला देतेस तसं लेक्चर..
विजय : नाही पण वेदा, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे हं. माझं चुकलंच. मी बाहेर जाताना दिवे-पंखा बंद करायलाच हवा होता. खरं तर आपल्या हातालाच ती सवय लागायला हवी.
विराज : म्हणजे आपण अगदी एवढी एवढी वीज बचत करायची आणि उधळणारे मात्र वाटेल तशी उधळणार. त्यांना कोणी जाब विचारायचा?
वैशाली : हो नं. जरा बाहेर जाऊन बघा. वीजटंचाई आहे का, विजेचा प्रश्न भेडसावतो आहे का, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. काय नुसता झगमगाट आणि चकचकाट असतो..
विराज : तेच तर म्हणतो मी. बरं आपण वीज वाचवून अशी किती वाचवणार? खरी गरज आहे या मॉल्स, मल्टिप्लेक्सेस, थिएटर्स, हॉटेल्स यांनी वीज वाचवण्याची. पण तिथला एकंदरीत भपका पाहिला की वीजटंचाई वगैरे शब्द तरी त्यांना माहीत आहेत का नाहीत असं वाटतं.
वेदा : म्हणजे ते मूर्ख आहेत म्हणून आपणही मूर्खपणा करायचा का? अरे, त्यांना आपण शहाणपणा शिकवायचा की त्यांच्याप्रमाणे आपण मूर्खासारखं वागायचं?
विराज : अगं. तुम्ही मारे सगळे घसा खरवडून खरवडून सांगताय पण त्यांच्या डोक्यात कुठे शिरतंय. एवढंच नाही तर परवाच्या कार्यक्रमाच्या त्या प्रमुख पाहुण्या प्रेक्षकांना सांगत होत्या की, सगळ्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा. पण स्वत: मात्र गाडीतून आल्या होत्या. मग यांना कोणी अधिकार दिले लोकांना शिकवण्याचे? येऊन जाऊन सगळ्यांनी आपल्याला शिकवायचं.
वैशाली : खरं म्हणजे या असल्या दिखाऊ लोकांना बोलवूच नाही. जे खरंच तळमळीनं काम करताहेत, आपले विचार आचरणात आणत आहेत, लोकांसमोर काही आदर्श ठेऊ शकत आहेत, अशा लोकांना बोलवा ना. आणा नं त्यांना लोकांच्या डोळ्यासमोर. ठेवा नं त्यांचं कार्य पुढे.
विजय : खरय. असे अनेकजण भेटतील. पण आज दुर्दैव असं आहे की ग्लॅमरची सगळ्यांना एवढी भूल पडलेली असते की त्यांना सगळं ग्लॅमर कोटेड लागतं. पूर्वी ही मंडळी पण इतकी सहजी उपलब्ध होत नव्हती. हल्ली काय सगळे तारे जमिनपर आले आहेत.
वैशाली : जमिनपर कसले? अभिनेतेच ते. अभिनयाच्या बळावर व्यवस्थित वेळ मारून नेतात. शेंबडय़ा पोरांना कवटाळतील, हातात झाडू घेऊन रस्ते झाडतील..
विजय : ..आणि सारासार विचारबुध्दी हरवून बसलेली जनता तेच खरं मानते. त्यांच्या नाटकांना भुलते.
विराज : उद्या बोले तैसा चालेची वेळ आली तर फटाफट विकेटस् पडतील.
वेदा : म्हणूनच मला असं वाटतं, प्रत्येकानं विचार करावा आणि या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करावा. भले आपले प्रयत्न छोटय़ा पातळीवर असतील पण प्रत्येकानं हा खारीचा वाटा उचलायलाच हवा. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ हे लक्षात ठेवायलाच हवं.
शुभदा पटवर्धन
shubhadey@gmail.com