Leading International Marathi News Daily
गुरुवार, ११ जून २००९
  स्पेलिंग बी!
  ओपन फोरम
  ग्रूमिंग कॉर्नर - दिसतं तसं नसतं..
  क्रेझी कॉर्नर - ‘वाइफ इज ऑलवेज राइट’
  स्मार्ट बाय
  मेल बॉक्स
  दवंडी - गावकुसातली आकाशवाणी
  लँग्वेज कॉर्नर - जर्मनीतील ‘हरित क्रांती’
  यंग अचिव्हर्स - गवसलेलं क्षेत्रं
  एका लग्नाची गोष्ट
  इव्हेंटस कॉर्नर - शिल्पा आनंद यांचे ब्रायडल कलेक्शन
  नेट कॉर्नर - Little girl
with spunk!
  ब्यूटी कॉर्नर - मुलायम, घने लंबे बाल..

ग्रूमिंग कॉर्नर - दिसतं तसं नसतं..
माझा ‘स्वत:चा स्वीकार’ हा लेख वाचल्यावर बऱ्याच वाचकांनी मला धन्यवाद द्यायला पत्र लिहिली. तो लेख त्यांना बरंच काही शिकवून गेला. एका बाईंनी लिहिलं की ती खूप भयानक दिसते असं तिला सारखं वाटायचं. ती करीना कपूर, ऐश्वर्या राय यांचे फोटो बघायची, त्यांचे सिनेमे बघायची आणि आपण तसे कधीच दिसू शकणार नाही म्हणून खूप निराश व्हायची. माझा तिच्यासाठी सल्ला होता- ‘तुम्ही जे बघता त्यावर कधीच पूर्णपणे विश्वास ठेवू नका आणि जे ऐकता त्यावर तर मुळीच विश्वास ठेवू नका. आजकाल डॉक्टर्स कंबर लहान करू शकतात, नाकाचा आकार, हनुवटी, गाल, ओठ, स्तन, मांडय़ा सगळं प्रमाणबद्ध करू शकतात. राखी सावंत ही त्यापैकीच एक जी खुलेआम सांगते की ‘देवाने मला काही दिले नाही, जे काही दिलंय ती डॉक्टरने!’ पण बाकीचे कितीजण असे सांगतात?
माझी बायको, अ‍ॅन्ड्रिया, ‘सॅव्ही’ आणि ‘सॅव्ही फॅशन अ‍ॅण्ड ग्लॅमर’ या दोन मासिकांची संपादक आहे. तिला फोनवर

 

शूटबद्दल एका अ‍ॅक्ट्रेसशी बोलताना ऐकलेलं. त्या तरुण बाईने नुकताच दोन महिन्यापूर्वी बाळाला जन्म दिलेला. शूट करताना ती खूप जाड दिसेल अशी तिला काळजी वाटत होती. अ‍ॅन्ड्रियाने तिला समजावलं. ‘तुझ्या गालांबद्दल आणि कंबरेबद्दल मुळीच काळजी करू नकोस. कॉम्प्युटरवर सगळं सांभाळण्यात येईल आणि मेकअप आहेच. फोटोग्राफरला त्याचं काम माहिती आहे. तर तू आता शांत हो. आम्ही सगळ्याची काळजी घेऊ!’
फोटोग्राफर वेगवेगळ्या अँगल्समधून फोटो काढतात. वेगळे लाइट्स वापरतात. बरेचसे कपडे बदलतात, खूप प्रकारची सेटिंग्स लावतात,
त्वचेचा टोन बदलण्यासाठी मेकअप असतोच. जे आपण शेवटी बघतो ते खरं नसतं. एका मोठय़ा उद्योगपतीच्या बायकोला मी एका मासिकाच्या पहिल्या पानावर बघितलं. ती पन्नाशीची असली तरी त्या फोटोत चाळिशीची वाटत होती. मी फारच प्रभावित झालो. एका आठवडय़ाने तिलाच एका ‘लाइव्ह’ कार्यक्रमात बघितलं आणि ती पन्नाशीचीच दिसत होती. काय झालं?
प्रत्येक अ‍ॅक्टर, मॉडेल किंवा कोणत्याही प्रोफेशनल फोटोमागे एक अख्खी टीम उभी असते, हे आपल्याला कळायला हवं. या टीममध्ये डॉक्टर्स असतात, कॉस्मेटॉलॉजिस्ट, आहारतज्ज्ञ, फिटनेस ट्रेनर, फॅशन डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, लाइट्स लावणारे, फोटोग्राफर/ कॅमरामॅन, डिरेक्टर, स्टायलिस्ट, डिजिटल आर्टिस्ट (कॉम्प्युटरवर काम करणारे), एडिटर्स आणि बरेच जण त्यांना मदत करतात. तो माणूस बघायला, ऐकायला सुंदर वाटला पाहिजे हेच त्यांचं काम असतं.
अ‍ॅक्टर्स सिनेमात जे डायलॉग म्हणतात ते त्यांनी स्वत: लिहिलेले नसतात. कोणीतरी स्क्रिप्ट लिहिलेले असते. टीव्हीमध्येसुद्धा असं भासवतात की सगळं ‘ऑन दि स्पॉट’ होतंय पण तसं नसतं. बहुतेक ओळी अशा प्रकारे लिहिलेल्या असतात की बघणाऱ्याला वाटेल की त्या क्षणी आपोआप तोंडातून त्या ओळी आल्या आहेत. टीव्ही किंवा पेपरमध्ये त्यांच्या ज्या मुलाखती छापून येतात; त्यांत पण शक्यतो त्यांचे स्वत:चे विचार नसतात. त्यांची पी.आर. टीम (पब्लिक रिलेशन्स) त्यांना तसं बोलायचा सल्ला देत असते. हे सगळं त्यांना स्मार्ट दाखवायला केलं जातं.
माझे सासरे एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये मॅनेजर आहेत. त्यांच्याबरोबर मी एक हिंदी सिनेमा बघत होतो. त्यातला हीरो बॉम्बची वायर डिफ्यूज करताना दाखवला होता. माझे सासरे म्हणाले, ‘इथे हा शहाणपणा करतोय, पण तो एकदा आमच्या ऑफिसमध्ये आला. एका कागदावर kXl ही खूण केलेली आणि त्याखाली सही करणे असं लिहिलेले तरी त्याला विचारावं लागलं की सही कुठे करू?!!’
एक चांगला फोटो येण्यासाठी त्यांना आठ तास झगडावं लागतं. पंधरा सेकंदांच्या जाहिरातीसाठी त्यांना तीन महिने लागतात आणि एक चांगला सिनेमा पूर्ण व्हायला काही वेळा बरीच र्वष लागतात. आपण त्यांच्याशी तुलना कशी करू शकतो? आणि करावी तरी कशाला?
त्या लोकांशी तुलना करता करता उगाच निराश होण्यापेक्षा त्यांच्याकडून काहीतरी शिका आणि स्वत:ला प्रेरणा द्या. सलमान खान बुटका आहे, शाहरूख खान तोतरा आहे, बिपाशा बासू गोरी नाही तरी त्यांनी काहीतरी मोठं करून दाखवलंय. त्यांच्यात नक्कीच काही तरी आहे पण आपणही काही कमी नाही. एक सोप्पी प्रार्थना लक्षात ठेवा आणि नेहमी म्हणा- ‘देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही, त्या स्वीकारण्याची मला शक्ती दे. ज्या गोष्टी मी बदलू शकतो, त्या बदलण्याचं मला सामथ्र्य दे आणि गोष्टींमधला फरक ओळखण्याचं मला शहाणपण दे..!
अनुवाद : यशोदा लाटकर
डॉमिनिक कोस्टाबीर
dominiccostabir@yahoo.com