Leading International Marathi News Daily
गुरुवार, ११ जून २००९
  स्पेलिंग बी!
  ओपन फोरम
  ग्रूमिंग कॉर्नर - दिसतं तसं नसतं..
  क्रेझी कॉर्नर - ‘वाइफ इज ऑलवेज राइट’
  स्मार्ट बाय
  मेल बॉक्स
  दवंडी - गावकुसातली आकाशवाणी
  लँग्वेज कॉर्नर - जर्मनीतील ‘हरित क्रांती’
  यंग अचिव्हर्स - गवसलेलं क्षेत्रं
  एका लग्नाची गोष्ट
  इव्हेंटस कॉर्नर - शिल्पा आनंद यांचे ब्रायडल कलेक्शन
  नेट कॉर्नर - Little girl
with spunk!
  ब्यूटी कॉर्नर - मुलायम, घने लंबे बाल..

क्रेझी कॉर्नर - ‘वाइफ इज ऑलवेज राइट’
‘सुखी संसाराचे रहस्य कशात असते’ असा प्रश्न तमाम विवाहग्रस्त नवरे मंडळींना सतत छळत असतो. या प्रश्नाचे उत्तर अर्थातच सापेक्ष आहे. सुख कशाला म्हणायचे याच्या व्याख्या, निकष व्यक्तीगणिक बदलत असतात. हिंदी-मराठी चित्रपटातून (अर्थातच पूर्वीच्या) आदर्श विवाहित स्त्रीचे जे चित्र रंगविले जात होते, त्याची प्रतिमा पत्नीच्या रूपाने घरात उमटणे म्हणजेच आपला संसार सुखी झाला, अशी अनेक मंडळींची धारणा असते. परंतु अशा पत्नींची संख्या मुळातच कमी असल्याने मागणी व पुरवठय़ाचे प्रमाण अर्थातच व्यस्त बनले आहे. परिणामी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नवरोबा मंडळी ‘दरबदर’ भटकत बसतात. सुखी संसाराचे रहस्य कशात असते, या कूट प्रश्नाचे उत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी एका वाक्यात

 

देऊन टाकले आहे. या न्यायाधीश महोदयांनी एक निकाल देताना म्हटले आहे की, ‘वाईफ इज ऑलवेज राईट’ हाच सुखी संसाराचा मूलमंत्र आहे. अर्थात अनेक ‘हुश्शार’ मंडळींना हा मंत्र आधीच सापडला आहे. संसाररूपी रणभूमीवर आपले ‘एन्काऊंटर’ होऊ द्यायचे नसेल तर मुकाटपणे शस्त्रे म्यान करण्याचे काम अनेकांनी केव्हाच करून टाकले आहे. पती समुदायात ‘लष्कर ए होयबा’ च्या अनेक पलटणी दिसतात त्या यामुळेच. पण ज्यांना हे त्रिकलाबाधित सत्य उगमत नाही किंवा उमगूनसुद्धा त्या प्रमाणे वागण्याची ज्यांची तयारी नसते त्यांच्यासाठी आयुष्यभर सुख हे मृगजळ ठरते. आतापर्यंत नोकरदारांमध्ये ‘बॉस इज ऑलवेज राईट’ हा शब्दप्रयोग रुढ होता. आता दस्तुरखुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ‘वाईफ’चे बॉसपण अधोरेखित करणारा शब्दप्रयोग रुढ केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ‘वाईफ इज ऑलवेज राईट’ या निष्कर्षांप्रत का आले असतील, याचा शोध घेताना घरोघरी दररोज घडणारे असे प्रसंग वानगीदाखल पहा.
ती : आज हे कपडे घालून ऑफिसला जाऊ नका/नकोस
तो : हा माझा प्रश्न आहे.
ती : पण तुला हे कपडे चांगले दिसत नाहीत. ऑफिसची लोकं काय म्हणत असतील.
तो : ते माझे मी बघून घेईन. तू मला सल्ले देऊ नकोस.
ती : परवा अभिजितच्या लग्नात ड्रेसऐवजी साडी नेस, असे का म्हणत होतास, त्यावेळी तुझे ऐकून मी साडी नेसली ना?
तो : बरोबर आहे. पण याचा अर्थ उठसूठ प्रत्येक गोष्टीत तू मला सल्ले द्यायचे, असा होत नाही.
ती : तू सल्ला नाही तर आदेशच देतो. मी तसे तर करीत नाही.
तो : लग्नात तू ड्रेस घालून आली असतीस तर नातेवाईकांनी मला नावे ठेवली असती.
ती : हे बरंय, तुला कोणी बोलू नये म्हणून तुझे मी ऐकायचे. माझी मात्र एकही गोष्ट तू ऐकू नकोस.
दोन्ही बाजूंनी तलावारीचा खणखणाट बराच वेळ चालू राहतो. ‘तो’ काही तिला न आवडणारे कपडे बदलत नाही. त्या क्षणापासून घरात ‘मूकपट’ चालू होतो. या लढाईची अखेर तहामध्ये होते. तहामध्ये ‘त्याला’ आपला स्वाभिमान, अहंकार, नवरेशाहीचे काही ‘किल्ले’ सोडावे लागतात. याचा अर्थ ‘तो’ लढाई संपूर्णपणे हरला असे होत नाही. तहाद्वारे मिळालेली शांतता काही दिवस टिकते. त्याच्या आठवडय़ाच्या सुटीच्या दिवशी तिला कोठे तरी फिरायला जायचे असते तर त्याला घरात निवांत बसून सुट्टी घालवायची असते. अशा मुद्दय़ांवरून म्यान तलवारी पुन्हा बाहेर निघतात. ‘तुला बायकोच्या भावनांची फिकीर नाही’ असा एकतर्फी निष्कर्ष काढून ‘सौ’ पक्ष पुन्हा ‘विपश्यना’ प्रयोग चालू करतो. एकूणात काय पिनेवालेको पिनेका बहाना चाहिये. त्याप्रमाणे भांडणाला निमित्त हवे असते.
आदर्श राजकीय नेत्याची स्व. रामभाऊ म्हाळगी यांनी छान व्याख्या सांगितली होती. ‘डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी’ अशी आदर्श राजकीय नेत्याची म्हाळगींनी लक्षणे सांगितली होती. यातील दोन लक्षणे नवरोबांकडे असली तर त्यांनाही सुखी संसाराचा ‘एक्स्प्रेस वे’ सापडतो. ही दोन लक्षणे म्हणजे ‘डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर.’ शत्रू पक्षाकडून (म्हणजे पत्नी हे सांगण्याची अर्थातच गरज नाही) कितीही हल्ले झाले तरी तोंडातून चकार शब्द देखील प्रत्युत्तरादाखल उच्चारायचा नाही. म्हणजेच डोक्यावर बर्फ. पत्नी पक्षाशी सतत गोडच बोलायचे. म्हणजे नवरोबाच्या पँटीत काही महत्त्वाचे कागद असतील व पत्नीने न पाहताच पँट वॉशिंग मशिनमध्ये टाकली असेल, अशा वेळीही यत्किंचितही आवाज न चढविता, पँटचे खिसे तपासायचे, तू कामाच्या गडबडीत विसरली असशील. खरे तर मीच खिसे तपासून पँट टाकायला ही होती. माझेच चुकले, असे प्रवाळयुक्त गुलकंदी स्वरात म्हणणे हे नवरोबाचे कर्तव्य ठरते. ‘पायाला भिंगरी’ हा आदर्श नेत्याचा निकष मात्र ‘आदर्श’ पतीराजाला लागू होऊच शकत नाही. नवरोबा पायाला भिंगरी लावून हिंडत राहिले तर घरात वारंवार ‘प्लासीची लढाई’ होत राहील. एकूणात काय, झालेला अपमान मुकाट गिळणे व रागाचा नव्हे तर ‘दिखाऊ’ समाधानाचा सुस्कारा सोडणे, असा सुखी संसाराचा ‘अनुलोम-विलोम’ अर्थ आहे.
हे सारे आख्यान ऐकल्यावर न्यायाधीश काही चुकीचे बोलले असे म्हणण्याची कुणाची शामत होणार नाही. कारण दुसऱ्याला गीतेवर हात ठेऊन खरं बोलण्याची शपथ घालणारा खोटं बोलेलंच कसा? त्यामुळं म्हणावंसं वाटतं, ‘आई शप्पथ, तुम्ही खरं बोललात’ , ‘वाईफ इज ऑलवेज राईट’..
चंद्रहास मिरासदार
cm.dedhakka@gmail.com