Leading International Marathi News Daily
गुरुवार, ११ जून २००९
  स्पेलिंग बी!
  ओपन फोरम
  ग्रूमिंग कॉर्नर - दिसतं तसं नसतं..
  क्रेझी कॉर्नर - ‘वाइफ इज ऑलवेज राइट’
  स्मार्ट बाय
  मेल बॉक्स
  दवंडी - गावकुसातली आकाशवाणी
  लँग्वेज कॉर्नर - जर्मनीतील ‘हरित क्रांती’
  यंग अचिव्हर्स - गवसलेलं क्षेत्रं
  एका लग्नाची गोष्ट
  इव्हेंटस कॉर्नर - शिल्पा आनंद यांचे ब्रायडल कलेक्शन
  नेट कॉर्नर - Little girl
with spunk!
  ब्यूटी कॉर्नर - मुलायम, घने लंबे बाल..

मेल बॉक्स
आम्ही भांडतो तुम्ही गंमत बघा
चार जूनच्या व्हिवातील संजय पेठे यांचा ‘आम्ही भांडतो तुम्ही गंमत बघा’ हा लेख खूप आवडला. लेखात जे लिहीले आहे ते खरंच आहे. संबंधित राजकारणी मंडळी तो लेख वाचतील आणि काहीतरी शिकतील अशी आशा आहे.
प्राची

संजय पेठे यांनी एका ‘हॉट टॉपिक’वर लिहिण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. पण भट्टी जमली नाही. सुरुवातीला वाचताना

 

लेख चांगला वाटला. पण लेखाच्या मध्यापासून त्यावरची पकड ढिली होत गेली आहे. पण हा प्रश्न खरंच खूप गुंतागुंतीचा आहे. सगळ्यांना माहीत आहे की काही तरी चुकतंय. पण त्यावरचा उपाय मात्र कोणालाच सुचत नाही. हजारोंच्या मनात हा प्रश्न आहे. या लेखाने त्यांच्या विचारांना चालना मिळाली असेल. ही चालना मिळणे हे ही काही कमी महत्त्वाचे नाही.
सुनील

थर्ड आयमधील संजय पेठे यांचा लेख वाचला. आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत जे घडले त्यावरुन (किंवा पूर्वी जे घडत आले त्यावरुन) मराठीच्या मुद्यावरुन भांडणे सुरु आहेत. लोकांची विभागणी होत आहे असं म्हणणं काही प्रमाणात खरं आहे. पण माझ्या मनात एक मुद्दा येतो की, सध्या दोन गट आहेत, तर आपण तिसरा सूर का आवळावा? आपणही त्यापैकी एका गटात सामील व्हावे. मराठी माणूस संघटीत होत आहे असं म्हणतानाच आपलाही एक स्वतंत्र ‘गट’ स्थापन करणं योग्य होईल का! संबंधित गटाचे गुण-दोष स्वीकारुन आपण प्रवाहातलेच होणार की बाहेरुनच खडे मारणार याचा प्रत्येक मराठी माणसाने विचार करण्याची गरज आहे.
मराठी माणसामध्ये काही ‘विशेष’ दोष आहेत असं सर्रास म्हटलं जातं. ते किती दिवस उगाळायचं? त्याचाच प्रचार आपण किती दिवस करायचा? काही दोष असतीलही, पण ते विसरुन, मागे टाकून आपण पुढे कधी जाणार? पुढे जाण्यासाठी एखादी संघटना/ राजकीय पक्ष ‘वेगळा’ प्रयत्न करत असेल, तर आपण त्याच्याकडे सकारात्मकतेने पाहणार की नाही? की सवंग बातम्याच फक्त डोळ्यासमोर ठेवून मत व्यक्त करणार? राज ठाकरे यांनी ४० सभा घेतल्या. या सभांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कुठेही वैयक्तिक टीका केली नाही. मराठी माणूस, मराठी संस्कृती, भाषा हेच विषय त्यांनी सातत्याने मांडले. निवडणूक निकालानंतर एका पत्रकार परिषदेत व पदाधिकारी मेळाव्यात राज यांनी एक-दोन विधाने केली, ज्याच्यावर पेठे यांच्या टीकेचा रोख आहे. पण टीका करताना गेल्या ४० सभा, गेल्या दोन वर्षांतील कार्य आपण विसरत आहात असं खेदाने म्हणावसं वाटतं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राज ठाकरे यांनी स्वतंत्रपणे, काही भूमिका व्यवस्थितपणे मांडून स्थापन केलेला पक्ष आहे. त्यामागे कदाचित काही वैयक्तिक कारणे असतीलही पण त्यांची भूमिका स्पष्ट आणि व्यापक आहे- ‘मराठी माणसाच्या स्वाभिमानासह, अस्मितेसह महाराष्ट्राचा सर्वागीण विकास’. पक्षाचा सुरुवातीचा काळ असल्यामुळे आपणास कदाचित मराठी मते फुटली, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला असे वाटेल पण सखोल अभ्यासानंतर लक्षात येते की मनसेला केवळ फुटलेली मतेच मिळाली आहेत असं नाही. मराठी मतदार, नवमतदार, राज यांचा चाहता वर्ग, इतर पक्षांना कंटाळलेला मतदार.. अशा असंख्य लोकांनी मनसेला मतं दिली आहेत. ‘मनसे फॅक्टर सगळ्यांना धोकादायक ठरणार आहे, हे शरद पवार यांचे विधान लक्षणीय आहे, कृपया नोंद घ्यावी. फुटणारी मते ही २५-३५ -५० हजार असू शकतात. पण लाखात मते फुटतात असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मुद्दा हा की, मनसेला मिळणारा पाठिंबा व्यापक आणि सकारात्मक आहे. पुढील काळात विभागणी, फूट असे शब्द येणार नाहीत अशी खात्री वाटते.
मूळ मुद्दा सोडून फक्त टीकाच होते आहे. हे विधान कृपया तपासून पहावे. मराठीच्या विकासासाठी मनसेने आत्तापर्यंत काय केलं याची सूची कृपया पुढे पहावी. वरचे राजकारणविषयक मुद्दे एक वेळ सोडा पण पुढील मुद्दे अधिक महत्त्वाचे.
www.manase.org हे पक्षाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. खुद्द पक्षाबद्दलची आणि पक्षप्रमुखाची कमी माहिती आणि महाराष्ट्राबाबतची प्रचंड अभिमानास्पद माहिती अशा प्रमाणात, अशी माहिती देणारा हा एकमेव पक्ष आहे. संकेतस्थळ आवर्जून पहावे. संपूर्ण महाराष्ट्र, त्यातील जिल्हे, महाराष्ट्र घडवणाऱ्या, समृद्ध करणाऱ्या १२५ व्यक्ती यांबद्दलची सविस्तर माहिती मराठी आणि इंग्रजीमध्ये या संकेतस्थळावर दिली आहे. मराठी भाषेत एवढी माहिती देणारी वेबसाईट दुर्मिळच. यामागची प्रेरणा राज यांचीच आणि संकल्पनाही त्यांचीच.
’ मनसेने शिवाजी पार्कवर मराठी पुस्तक प्रदर्शन, प्रात्यक्षिकासह शस्त्रप्रदर्शन भरविले होते. या ठिकाणी मान्यवरांनी भाषणबाजी न करता काव्यवाचन केले. हा वेगळा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला.
’ जागतिक पुस्तकदिनानिमित्त पुण्यात छोटा कार्यक्रम झाला. काही काळासाठी अतिशय स्वस्त दरात पुस्तक विक्रीही झाली.
’ गिनीज बुकमध्ये नोंद असलेल्या पुण्यातील गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मनसेच्या पाठिंब्यावर यशस्वी झाले.
’ शिवजयंतीच्या वेळी भव्य कार्यक्रमाचे आयोजनही मनसेने केलं.
’ स्वत: राज ठाकरे यांची उपस्थिती असलेले कार्यक्रम, त्यांनी मांडलेली मते. याकडे काळजीपूर्वक पाहिले तर असे लक्षात येईल की, त्यांचा ओढा (मूळ कलाकाराचा पिंड असल्याने) विधायक कार्यक्रमांकडे असतो आणि त्यांनी तसे विचार नेहमीच मांडले आहेत.
ही पक्षाची सुरुवात आहे. मनसे राजकीय पक्ष असल्याने आंदोलनांवर भर राहणारच. एक मराठीप्रेमी पक्ष व विरोधी पक्ष म्हणूनही मनसेची कामगिरी उल्लेखनीय आहे. तीही लक्षात घ्यायला हवी. स्थानिक पातळीपासून राज्यपातळीवर हाती घेतलेले मुद्देही महत्त्वाचे आहेत. मनसे हा राजकीय पक्ष आहे. केवळ सांस्कृतिक मुद्दय़ांकडे लक्ष देऊन चालणार नाही. राजकारण आणि राजकीय कार्यही आलेच. उलट इतक्या कमी वेळात राजकीय संघटन करत असताना, आंदोलने हाती घेत असताना इतके विधायक- सांस्कृतिक-रचनात्मक उपक्रम कार्यान्वित करणारा पक्ष म्हणून मनसेचे कौतुक करणे उचित ठरेल.
एक वेगळा मुद्दा मांडतो. वाचनसंस्कृती, खाद्यसंस्कृती, शुद्धलेखन इत्यादी मुद्दे आपण विकासासाठी केवळ राजकीय पक्षांकडे द्यायचे का? संबंधित सांस्कृतिक संघटना, साहित्यीक, सुशिक्षित मराठी नागरिक, ही मंडळी काही करणार की नाही? म्हणून शेवटी एवढेच म्हणतो की, ‘कोणीही केवळ गंमत बघत बसू नये’, सर्वानीच मराठी संस्कृतीच्या विकासार्थ सिद्ध व्हावे.
विनय माळवणकर, पुणे

व्हिवाचं कौतुक करणाऱ्या पत्रांचं आम्हाला निश्चितच कौतुक आहे. पण त्याहीपेक्षा आम्हाला आवडतील विश्लेषणात्मक पत्रं. तुम्ही विचार करा आणि इतरांना विचार करायला लावा. व्हिवासाठी मजकूर किंवा पत्र खालील पत्यावर पाठवा- व्हिवा-लोकसत्ता, लोकसत्ता संपादकीय, एक्सप्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरीमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१. अथवा खालील ई मेलवर पाठवा. viva.loksatta@gmail.com