Leading International Marathi News Daily
गुरुवार, ११ जून २००९
  स्पेलिंग बी!
  ओपन फोरम
  ग्रूमिंग कॉर्नर - दिसतं तसं नसतं..
  क्रेझी कॉर्नर - ‘वाइफ इज ऑलवेज राइट’
  स्मार्ट बाय
  मेल बॉक्स
  दवंडी - गावकुसातली आकाशवाणी
  लँग्वेज कॉर्नर - जर्मनीतील ‘हरित क्रांती’
  यंग अचिव्हर्स - गवसलेलं क्षेत्रं
  एका लग्नाची गोष्ट
  इव्हेंटस कॉर्नर - शिल्पा आनंद यांचे ब्रायडल कलेक्शन
  नेट कॉर्नर - Little girl
with spunk!
  ब्यूटी कॉर्नर - मुलायम, घने लंबे बाल..

लँग्वेज कॉर्नर - जर्मनीतील ‘हरित क्रांती’
जर्मन भाषा, संस्कृती आणि परंपरा यांची ओळख करून देणारं पाक्षिक सदर
टीम-बिल्डिंग विषयावरचा सेमिनार होता. साधारणत: १५ ते १६ देशांचे मिडल लेव्हल मॅनेजमेंटचे मेंबर होते. सगळे एकाच प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी काम करणारे. त्यांच्यात उत्तम टीम स्पिरीट तयार होण्यासाठी प्रत्येकाच्या मनातील अमुक एका देशाविषयी असलेली स्टीरिओटाईप चित्रे प्रथम मनाच्या तळातून बाहेर येऊ देणे जरुरीचे होते. टीम बिल्डिंग ही नंतरची स्टेप. स्टीरिओटाईप्स म्हणजे प्रत्यक्ष अनुभवावर (बहुतेक वेळा) न आधारलेली आणि तरीही घट्टमुट्ट मुळे असलेली मते. म्हणजे उदा. इंडियन्स ना? म्हणजे सदैव उशीरा येणारे, वेळेची किंमत नसलेले! इटालिअन्स? ते म्हणजे एक नंबरचे बेशिस्त!

 

अमेरिकन्स? ते म्हणजे सदैव पिस्तुल बाळगून मजा म्हणून कोणालाही ठार मारणारे! प्रत्येकाने अशा तऱ्हेने एखाद्या छोटय़ा प्रसंगाने, अविर्भावाने, छोटय़ाशा संवादाने आपल्या मनातल्या या १५ देशांच्या स्टीरिओटाईप्सना वाचा करून द्यायची अशी टास्क दिली होती. एका अमेरिकन आणि स्पॅनिश जोडगोळीने मोठय़ा मार्मिकपणे त्यांच्या मनातील जर्मन स्टीरिओटाईप ग्रुपपुढे सादर केले. सेमिनारच्या कक्षात चहाचे सामान होते. त्यांनी त्यातला टी बॅगचा खोका आणला. चहा बनवण्याची अ‍ॅक्शन केली आणि समोर ५-६ तऱ्हेची छोटय़ा छोटय़ा डस्टबिन्स-वेगवेगळ्या रंगाच्या- तयार करून ठेवल्या होत्या. मोठा गंभीर आव आणून टी बॅगला असलेली पीन एकात, चहापत्ती दुसऱ्यात, चहापत्तीच्या आवरणाचा छोटा पाऊच तिसऱ्यात, टीबॅगचा बॉक्स चौथ्यात आणि टी बॅग्जच्या बॉक्सवरचे पातळ प्लॅस्टिक आवरण पाचव्या डस्टबिनमध्ये टाकून एकदम सीरिअस हावभाव करून ‘पर्यावरणाच्या दृष्टीने कचऱ्याचे सॉर्टिग करणे कसे महत्त्वाचे आहे’- जर्मन देहबोलीची नक्कल करीत आपला सीन या जोडीने सादर केला. सगळ्या ग्रुपने टाळ्यांचा कडकडाट करून संमतीदर्शक माना हलवल्या.
यातली गंमत बाजूला ठेवली तरी जर्मनांचे पर्यावरणावरील आणि त्याच्या रक्षणावरील प्रेम आणि धडपड ही खरोखरच नजरेत भरण्यासारखी गोष्ट आहे. इतकी वर्षे झाली तरी जर्मन मित्रमंडळांच्या स्वयंपाकघरात वावरताना ‘अगं, अगं हे या डस्टबिनमध्ये नाही, तर त्या डस्टबिनमध्ये टाक.’ हे सांगताना आविर्भावही असा असतो की आपल्याला वाटावं- ‘काय खूनबीन तर नाय ना केला आपण!’ असे हे पर्यावरणप्रेमी जर्मन्स!
गेल्या वेळेच्या सदरात आपण अडसष्टच्या क्रांतीच्या तिसऱ्या परिणामाचे सूतोवाच केले होते आठवतंय? पर्यावरणवादाची चळवळ हा या क्रांतीचा तिसरा पैलू! त्यासाठी ‘द ग्रीन्स’ हा राजकीय पक्षही स्थापण्यात आला. जर्मनभूमीवर सदैव घडलेल्या युद्धांमुळे झालेले निसर्गाचे अतोनात नुकसान, औद्योगिक क्रांतीचा वेग गाठण्यासाठी, निर्यात वाढती ठेवण्यासाठी विशेषत: जर्मन रासायनिक आणि औषध कंपन्यांनी व मोटार कंपन्यानी हवा, पाणी, जंगले इतक्या मोठय़ा प्रमाणात प्रदूषित करून ठेवली होती की, त्या भरात जर्मन राहणीमान सतत उंचावत राहिले असले तरी आयुष्याची क्वालिटी अत्यंत खालावली गेली असा या चळवळीचा दावा होता. तेव्हा कारखान्यांमधून बाहेर पडणारे सांडपाणी, दूषित वायू, इतर द्रव्ये याचे शुद्धीकरण करून मगच ती पर्यावरणात सोडली जावी असा सणसणीत कडक कायदा जनमानाच्या रेटय़ाने सरकारला अमलात आणावा लागला. सर्व नद्यांमधील पाण्याचे सतत विश्लेषण करून प्रत्येक दिवशी ते जनतेपुढे सर्व आकडेवारीसह मांडत राहण्याचे सरकारवर बंधन आले. ते आजही कसोशीने पाळले जाते. प्रचंड ग्राहक चळवळ उभी राहिली. करदाता व ग्राहक म्हणून प्रत्येकाला जर्मन देश आणि त्याची कायदेव्यवस्था इतर पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत माझ्या माहितीप्रमाणे सर्वात जास्त हक्क देते. श्वासावाटे मी घेत असलेली हवा, पीत असलेले पाणी आणि खात असलेले अन्न दूषित असताच कामा नये, मी कर भरतो म्हणून हे मागण्याचा माझा हक्क आहे. यावर जर्मन लोक अगदी ठामपणे एकत्र येऊन सरकारला नाकीनऊ आणत असतात. दरवर्षी एक जाडजूड ग्रंथराज (stiftung-Warentest म्हणजे जर्मन बाजारपेठेत उपल्बध असलेल्या प्रत्येक मालाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण) प्रत्येक सुशिक्षित नागरिक विकत घेतो. वॉशिंग मशीनपासून लिपस्टिकपर्यंत प्रत्येक ब्रँडची पूर्ण छाननी त्यात असते. त्यासाठी झालेला ऊर्जा वापर, वापरलेली रसायने, पॅकिंग, त्यावरची माहिती, त्यातील तथ्यता याची नुसती चिरफाड केलेली असते. ते सर्व वाचून जर्मन ग्राहक शक्यतो खरेदी करतो. ‘वरलीया रंगा’ ला भुलण्यापेक्षा पर्यावरणाच्या आकडेवारीचा आधार त्याला खरेदीच्या वेळी फार महत्त्वाचा वाटतो. सर्व जर्मन घरात, सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे स्टेशन्स, विमानतळ येथे ठेवलेले विविध रंगाचे कचऱ्याचे डबे आपले लक्ष वेधून घेतात. पिवळ्या डस्टबिनमध्ये सर्व पॅकिंग मटेरियल, हिरव्यात सर्व भाज्यांची साले, उरलेले अन्न थोडक्यात ज्याचे कंपोस्ट होऊ शकेल असे सर्व, निळे झाकण असलेल्या कचऱ्याच्या पिंपात सर्व रद्दी. बॅटरीज्, जुनी औषधे यासाठी वेगळ्या जागी ठेवलेला लहान डबा. वितळवल्यावर गडबड नको म्हणून पांढरी, हिरवी व ब्राऊन काच वेगळी करायची. हिरव्या काचेच्या बाटल्यांसाठी भल्या मोठय़ा पोटोबाचा वेगळा कंटेनर, ब्राऊन रंगाच्या काचेच्या बाटल्यांसाठी पुन: तसाच पण वेगळा कंटेनर. जुन्या कपडय़ांसाठी चौकावर हा थोरला चौकोनी कंटेनर. काचेच्या बाटल्यांसाठी असलेले कंटेनर भारीच मोठे व खोल असतात. त्यात बाटल्या टाकताना खूप आवाज येतो. आवाज हेसुद्धा प्रदूषण आहे हे विसरलात वाटतं? त्यामुळे या कंटेनर्सवरही डोळे वटारल्यासारखी विविक्षित वेळ दिलेली असते. तेव्हाच तुमच्या बाटल्या तुम्ही त्यात टाकू शकता. आवाजाचे प्रदूषण यालाही तितकेच महत्त्व असल्यामुळे गाडीचा हॉर्न कसा असतो हे इथे विसरायला होते. फक्त नव विवाहित वधू-वर चर्चच्या किंवा रजिस्ट्रारच्या ऑफिसबाहेर पडून आपल्या गाडीत बसले की, त्यांचे २-४ नातेवाईक व मित्र चार वेळा गाडय़ांचे हॉर्न वाजवून असा शिस्तशीर व बेताचा जल्लोष दाखवतात, झालं! फ्रँकफर्ट एअरपोर्टवर रात्री ११ नंतर व सकाळी सहापूर्वी विमाने उतरायला बंदी आहे. त्यामुळे पूर्वी प्रसिद्ध असलेल्या कॉनकोर्ड विमानाला त्याच्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजामुळे जर्मनीभर कुठेही टेक ऑफ वा लँडिंगला पूर्ण बंदी होती. री-सायकलिंग होऊ शकणारेच पॅकिंग मटेरिअल वापरणे ही बऱ्याच उद्योगांना सक्त पाळावी लागणारी लक्ष्मणरेषा आहे. जर्मन कायदा इथे थांबत नाही तर तो उत्पादकाला हेही बजावतो की, तुझे काम फक्त उत्पादन करणे एवढेच नसून, वापरून झाल्यावर त्या प्रॉडक्टचे पुढे काय घडले हीसुद्धा तुझीच जबाबदारी आहे. त्यामुळे समजा फोल्क्सवागन कंपनीने एक एक कार ग्राहकाला विकली तर ती जुनी व टाकाऊ झाल्यावर मधे भले २० वर्षे का गेलेली असेनात त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे हेही फोल्क्सवागन या कंपनीचे काम आहे व जबाबदारी आहे. सरकारची नव्हे. उदाहरणार्थ या जुन्या गाडीच्या टायर्सचे ग्रॅन्युअल्स किंवा पावडर करून ती रस्तेबांधणीसाठी वापरणाऱ्या सामानाची विक्री करणाऱ्या कंपन्यांना विकून टाकणे, या जुन्या गाडीतला जाळण्यायोग्य (म्हणजे प्रदूषणाची भीती नसलेला) माल जाळून, धूर स्वच्छ करून मगच तो वातावरणात सोडणे ही सर्व जबाबदारी कार मॅन्युफॅक्चर्सवर असल्यामुळे सतत पर्यावरणवादी टेक्नॉलॉजी शोधत राहाणे, तद्नुसार कच्चा माल वापरणे याचे त्यांच्यावर कायम दडपण राहाते. भविष्यवेधी तांत्रिक प्रगती हा जर्मन औद्योगिक जगाचा जणू मूलमंत्र बनला आहे. सारे जग EU-४ या नॉर्मच्या दिशेने आत कुठे जडशीळ पावले टाकते आहे. जर्मन कार कंपन्यांकडे EU-६ ची संहिता जवळ जवळ तयार आहे. नॉर्थ सीमध्ये उभा राहात असलेला समुद्राच्या लाटांतून आणि वाऱ्यातून ऊर्जा तयार करणारा भव्य प्रकल्प, त्यातले तंत्रज्ञान यावरचा अमीट जर्मन ठसा त्यांच्या या पर्यावरणाच्या अतीव प्रेमाचा जणू परिपाक आहे.
वर्षांतील आठ-नऊ महिने जर्मनीत चांगली थंडी असते. त्यामुळे घरे-दारे, कारखाने, ऑफिसेस, बस, ट्रेन उबदार ठेवण्यासाठी येणारे उर्जेचे बील हा सदैव चर्चेचा, काळजीचा, खर्चाचा विषय. ऑफिसला जाण्याच्या गडबडीत हिटिंग बंद करायला विसरणारे किंवा खिडकी चुकून उघडी ठेवणारे धांदरट लोक कमी का असतात? लगेच जर्मन टेक्नॉलॉजीने उत्तर शोधले. अशी जर खिडकी चुकून उघडी राहिली तर अमुक एक वेळानंतर आपली पूर्ण हिटिंग सिस्टिम आपोआप स्विच ऑफ होते. ऑफिसमधून हिवाळ्यात उबदार घरटय़ाच्या आशेने धावत यावे आणि बर्फाळ थंडगार घरात चपराक बसावी, असा हा टेक्नॉलॉजीचा पंतोजी जर्मनीत सर्वाना ऊर्जाबचतीची शिस्त कायम लावत असतो. १९६८ च्या क्रांतीच्या रेटय़ामुळे आणलेल्या या शिस्तीची गोड फळे जर्मन नागरिकाला आज चाखायला मिळत आहेत. किती अभिमानाने जर्मन माणूस आपल्या नीतळ, स्वच्छ झालेल्या नद्या, सशक्त तरतरीत जंगले आपल्याला दाखवतो, कापडी पिशवी घेऊनच भाजी/ वाणसामान खरेदी करतो, ब्रँडेड सूट आणि उच्च प्रतीची लेदर बॅग असली तरी सायकलने ऑफिसला जाण्याची धडपड करतो. जगभरातली प्रचार माध्यमे आर्थिक मंदी, बँकेचे घोटाळे, अनेक मोठय़ा कंपन्यांची पडझड, त्यामुळे येणारी बेकारीची कुऱ्हाड यावर भाष्ये व विश्लेषणे सघ्या करीत आहेत. हे सर्व जर्मन वृत्तपत्रातही चालू आहे. पण तितक्याच खंबीरपणे आणि अग्रस्थळी आणखी एक समांतर विश्लेषण सर्व मुख्य वृत्तपत्रांत वेळोवेळी केले जात आहे. ते म्हणजे आर्थिक मंदीमुळे आपल्या जराजर्जर होत चाललेल्या पृथ्वीला मात्र Co2 च्या विळख्यातून जरा नि:श्वास टाकायला मिळत आहे आणि आर्थिक मंदीची कशी ही सगळ्यात चांगली बाजू आहे, असे जर्मनीतील सर्वोच्च शिखर Zugspitze तेथे बसवलेली यंत्रे दर ५ मिनिटांत वातावरणात उत्सारित होत असलेल्या कर्बवायूची आकडेवारी व पातळी दाखवत असतात. आर्थिक मंदीची तीव्रता जसजशी जास्त तसतशी वातावरणात उत्सर्जित होणाऱ्या कर्बवायूची पातळी कशी कमी कमी होत आहे, त्यामुळे निसर्गावर एक तऱ्हेनी कशी कृपाच होत आहे असे आवर्जून वाचकांच्या नजरेला आणले जाते. मग आत्ता आपण थोडी कळ सोसली तर आपल्या मुलाबाळांच्या दृष्टीने निसर्गाच्या चलनवलनाचा समतोल हा अधिक महत्त्वाचा नाही का? असाही सूर असतो. चंगळवादाच्या मागे लागून आपण आपल्या गरजा कशा वाढवल्या आहेत, माणसाला सन्मानाने जगण्यासाठी जे काही लागते त्याच्या कितीतरी पटीने अधिक जर्मन समाजावर सुबत्तेचा जो मेद चढला आहे तो जरा झडला म्हणून कुठे बिघडले? किंवा आणखी एक आकडेवारी असे दाखविते की गेल्या ३० वर्षांत जर्मन राहणीमानाचे प्रमाण ३० टक्क्याने उंचावले. उदा. एक गाडी असलेल्यांकडे दोन गाडय़ा आल्या, त्याही आलिशान प्रकारातल्या! त्याच्याच जोडीने आयुष्यात समाधान व आनंद वाढला का याची गेल्या ३० वर्षांची आकडेवारी पाहिली तर त्याचा आलेख मात्र सतत खालावत गेला आहे अशीच उत्तरे सर्व सव्‍‌र्हेमध्ये आली आहे. मग आर्थिक मंदी आली म्हणून आपण एवढा गळा काढणे बरोबर आहे का? त्याऐवजी जास्त शुद्ध हवा (कर्बवायूचे प्रमाण कमी झालेली) अधिक महत्त्वाची आहे असे आपण का नाही समजून घ्यायचे! प्रवासात, विमानात ब्रिटिश, अमेरिकन आणि जर्मन वृत्तपत्रांचे Media Paedagogy च्या दृष्टीने तौलनिक वाचन करणे हा त्या त्या समाजाचा एक खूप मोठा आरसा असल्याचे काम करत असतो.
जर्मनीतील मीडियम आणि स्मॉल स्केल कंपन्यांसाठी काम करताना जर्मनीच्या इंटीरिअर भागांमध्ये प्रवास होतो. खूपदा मोबाईल कव्हरेज नसते. माझ्या कुटुंबीयांसाठी ही गोष्ट अनाकलनीय आणि त्रासाची ठरते. एवढा प्रगत देश आणि मोबाईल नॉन रिचेबल हे कसे शक्य आहे? अगदी खरं आहे ते! आणि त्याचे कारणही आपल्या आजच्या विषयाशी निगडित आहे. मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी जे टॉवर्स उभारावे लागतात त्याच्या कंपना/स्पंदनामुळे वातावरणात होणारा किरणोत्सर्ग निसर्ग, पशु पक्षी आणि मानव यासाठी अत्यंत हानिकारक आहे हे वारंवार अनेक शास्त्रीय संशोधनांमध्ये सप्रमाण सिद्ध झाले आहे. मोबाईल कंपन्यांनी पद्धतशीरपणे हे संशोधन समाजापुढे येऊ नये व ते दाबून टाकले जावे अशी व्यवस्थाही केली आहे. या दुष्टचक्राचा भेद करून जर्मन ग्राहक संस्था वारंवार जनजागृतीचे काम करत असतात. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे मोठी शहरे सोडली तर काही ग्रामीण भागांतील लहान शहरांच्या परिघाबाहेरील प्रदेशातील नागरिक आपापल्या ग्रामपंचायतींवर प्रचंड दबाव आणून मोबाईल टॉवर्स उभे करू देत नाहीत. पर्यावरणाचे रक्षण त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. आपण सगळेजण काऊ चिऊच्या गोष्टी ऐकत मोठे झालो. त्यातली चिऊताई आपल्या कुटुंबातून जवळजवळ नष्टप्राय झाली आहे, क्वचित एखादी दिसली तर ती पंख झडलेली, रोडावलेली! ही आपण ‘मोबाईल’साठी मोजलेली जबर किंमत आहे हे आपल्या ध्यानीमनी तरी आहे का? आपल्याकडे तासन्तास मोबाईलवर बोलणारी गर्भवती स्त्री पाहिली की राहून राहून वाटते या माझ्या सखीपर्यंत हे सर्व संशोधन कधी पोहोचणार? एकाग्रता जवळजवळ नसणारी, अ‍ॅग्रेसिव्ह आणि सतत अस्वस्थ असणाऱ्या बालकांची संख्या भयप्रदरीत्या वाढत आहे! चिऊताईची तर गोष्टच सोडा! जर्मनीचा पर्यावरणवाद काही वेळा अतिरेकी वाटला तरी बऱ्याचदा तो खूप हवाहवासा वाटतो.
आजच्या भाषावर्गात आपण प्रथम पर्यावरण संबंधातले छोटे छोटे शब्द शिकू या आणि पुढच्या भागात त्याची वाक्ये बनवूयात.
die Luft दी लुफ्ट (ती) हवा
das Wasser दास् वास्सर (ते) पाणी
der Wald देअर वाल्ड (ते) जंगल
der Fluss देअर फ्लूस्स (ती) नदी
der Lärm देअर लॅर्म (तो) आवाज
die Verschmutzung दी फेरश्मूट्त्सुंग (ते) प्रदूषण
der Müll देअर म्यूॅल्ल (तो) कचरा
die Trennung दी त्रेनुंग (ते) वर्गीकरण
der Verbraucher देअर फेरब्राउखर (तो) ग्राहक
die Energie दी एनेर्गी (ती) ऊर्जा
वैशाली करमरकर
vaishalikar@web.de