Leading International Marathi News Daily
गुरुवार, ११ जून २००९
  स्पेलिंग बी!
  ओपन फोरम
  ग्रूमिंग कॉर्नर - दिसतं तसं नसतं..
  क्रेझी कॉर्नर - ‘वाइफ इज ऑलवेज राइट’
  स्मार्ट बाय
  मेल बॉक्स
  दवंडी - गावकुसातली आकाशवाणी
  लँग्वेज कॉर्नर - जर्मनीतील ‘हरित क्रांती’
  यंग अचिव्हर्स - गवसलेलं क्षेत्रं
  एका लग्नाची गोष्ट
  इव्हेंटस कॉर्नर - शिल्पा आनंद यांचे ब्रायडल कलेक्शन
  नेट कॉर्नर - Little girl
with spunk!
  ब्यूटी कॉर्नर - मुलायम, घने लंबे बाल..

यंग अचिव्हर्स - गवसलेलं क्षेत्रं
ईटीव्ही मराठीवरील ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेने नुकतेच २००० भाग पूर्ण करून भारतीय दूरचित्रवाणी इतिहासात इतिहास निर्माण केला आहे. गेली सात वर्षे सुरू असणाऱ्या या मालिकेत अनेक नवीन-जुने कलाकार दिसतायत जशी प्रिया मराठे..! आता तर प्रियाने स्टार टी. व्ही.वरून प्रसारित होणाऱ्या ‘भले भी बुरे भी हम’ या मालिकेद्वारे हिंदीमध्येही पदार्पण केले आहे.
ईटीव्ही मराठीवरील ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेने नुकतेच २००० भाग पूर्ण करून भारतीय दूरचित्रवाणी इतिहासात इतिहास निर्माण केला आहे. गेली ७ वर्षे सुरू असणाऱ्या या मालिकेत अनेक नवीन-जुने कलाकार दिसतायत जशी प्रिया मराठे..! मालिकेतील पुढच्या पिढीतील नंदिनी आणि अशोक यांची धाकटी मुलगी सोना म्हणून असणारी

 

तिची ओळख तिच्या ‘कळत नकळत’, ‘साता जन्माच्या गाठी’, ‘या सुखानो या’ सारख्या इतर मालिकांमधील ओळखी इतकीच महत्त्वाची आहे. आता तर प्रियाने स्टार टी. व्ही.वरून प्रसारीत होणाऱ्या ‘भले भी बुरे भी हम’ या मालिकेद्वारे हिंदीमध्येही पदार्पण केले आहे.
तिच्या या अभिनय प्रवासाची सुरुवात कशी झाली? सांगताना ती म्हणते, ‘लहान असल्यापासून माझं हेच स्वप्न होतं असलं काही नाहीये माझ्याबाबतीत. खरं तर अभिनेत्री व्हायचंय असा मी कधी विचार केलाच नव्हता. ठाणा कॉलेजमध्ये बी.एस्सी. करत असतानाच एकांकिका करू लागले. मग इंटर कॉलेजिएट, अल्फा महाकरंडक, मृगजळ यांसारख्या स्पर्धामधून भाग घेऊ लागले.’
या स्पर्धामधूनच ती नजरेत आली आणि तिला पहिली मालिका मिळाली ‘या सुखांनो या’. ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आणि प्रियाने या क्षेत्रात स्वत:ची जागा निर्माण केली. ‘या सुखांनो..’च्या चित्रीकरणाचा पहिला दिवस तिला आजही अगदी ठळकपणे आठवतो आहे!
‘बी.एस्सी.च्या तिसऱ्या वर्षांला असताना मला ही मालिका मिळाली. त्या वेळी मी अगदीच नवखी आणि वयानं लहानही होते. पहिलाच सीन होता तो विक्रम गोखलेंबरोबर. प्रचंड भीतीही वाटत होती, टेन्शनही होतं. पण त्यांनी मला मी नवखी असल्याचं कधीही जाणवून दिलं नाही. उलट जिथे होईल तिथे मदत करायचे. सल्ला द्यायचे. या सगळ्यामुळे मला याच क्षेत्रात करिअर करायची प्रेरणा मिळाली.’
पण या क्षेत्रात करिअर करणं वाटतं तितकं सोपं नसतं, याचा अनुभव तुलाही नक्कीच आला असेल?
‘इथे एस्टॅब्लिश व्हायला खूप वेळ लागतो. पण माझं नशीब चांगलं की मला मराठीमध्ये अजिबात स्ट्रगल करावं लागलं नाही. खरं तर मला मार्गदर्शन करायला माझ्या घरातलं कोणीच नव्हतं, तरीही मला सतत चांगल्या मालिका मिळत गेल्या. त्या मालिका लोकप्रिय झाल्याने मलाही ओळख मिळाली.’
कसं वाटतं जेव्हा लोक ओळखतात, सह्य़ा वगैरे मागतात तेव्हा?
‘अर्थात आनंद होतोच, पण माझ्यापेक्षा माझ्या घरचे खूप खूश होतात. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रिअ‍ॅक्शन्स मिळतात लोकांकडून तेव्हा. लोक इतक्या बारकाईने मालिका बघतात याचा आनंद सगळ्यात जास्त होतो!’
या बाबतीतल्या काही आठवणी, अनुभव?
‘तसं तर तुम्हाला या मालिकेत बघतो सांगणारे खूप जण भेटतात. पण काही अनुभव असे असतात जे नेहमी लक्षात राहतात. जसं सुखांनो करताना माझं एक दृश्य होतं की, त्यात मी दत्ताची तसबीर फेकून देते वगैरे. त्या एपिसोडनंतर मी बसमधून जात असताना माझ्या शेजारी एक बाई होत्या. त्या मला समजावू लागल्या की, इतकं नास्तिक होणं बरोबर नाही वगैरे! मला इतकं आश्चर्य वाटलं! माझा पहिला फॅनचा अनुभव माझ्या कॉलेजमधलाच होता.. माझ्या कॉलेजमधल्याच एका मुलानं माझा पहिला ऑटोग्राफ घेतला होता! सगळ्यात मस्त अनुभव होता तो ‘कळत नकळत’मधल्या ‘ऋतु’ बाबतीतला. एका शाळेतल्या मुलाला विचारलं ऋतु किती असतात? त्यानं उत्तर दिलं होतं चार.. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आणि कळत नकळत मधली ऋतु!’
अरे बापरे! हा असा अनुभव बहुतेक कोणालाही आला नसेल! मराठी ते हिंदी हा प्रवास कसा झाला?
‘मराठीसाठी मला अजिबात स्ट्रगल करावं लागलं नाही. मी जे स्ट्रगल करतेय ते हिंदीसाठीच! खूप ऑडिशन्स देत असे, अजूनही देते.. हे हर्षदाताईला (खानविलकर) माहिती होतं तेव्हा तिने बालाजीच्या ऑडिशन्स सुरू असल्याचं सांगितलं..’
बालाजी म्हटलं की लगेच भुवया उंचावतात हे जाणवून ती लगेच म्हणाली..
‘हो, मलाही सुरुवातीला असंच टेन्शन आलं होतं. ‘कसम से’साठी मी ऑडिशन दिली आणि माझी निवडही झाली, मुख्य म्हणजे मी जे काही काम केलं त्याचा माझा तरी अनुभव चांगला होता. हिंदीचा कॅनव्हास खूप मोठा असतो, भारतभर ओळख मिळते. भले भी हम बुरे भी हमचा माझा अनुभव खूप छान आहे. मी आता एका मैत्रिणीच्या लग्नासाठी भरुचला गेले होते, तिथे गुजराती लोकांना वाटलं की मी गुजरातीच आहे म्हणून त्यांनी माझ्याशी गुजरातीतच बोलायला सुरुवात केली!’
प्रियाच्या मराठीतल्या भूमिका लोकांना माहितीच आहेत, ‘भले भी हम बुरे भी हम’ या नवीनच सुरू झालेल्या भूमिकेबद्दल सांगताना ती म्हणते, ‘आता तरी माझा या मालिकेत तीनच महिन्यांचा ट्रॅक आहे. माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे सोनिया. यात जो मेन लीड करतोय; जय त्याच्यावर फिदा होते, त्याच्या खूप मागे मागे करत असते पण तो तिला अजिबात भाव देत नाही. एकदम बबली भूमिका आहे. माझ्या स्वभावाच्या अगदी उलट व्यक्तिरेखा आहे ही म्हणून बहुधा करायला जास्त मजा येते.’
नवीन मालिका, चित्रपट?
‘एक हिंदूी मालिका आहे. झीसाठी एकता कपूरची. मराठी कुटुंबातल्या तीन बहिणींची कथा आहे ही, सध्या इतकेच सांगता येईल. चित्रपट करण्याची संधी मात्र अजून मिळालेली नाही. बहुधा ते वर्तुळच वेगळं असतं आणि मी अजून तिथपर्यंत पोहोचलेले नाही. पण कोणत्याही कलाकाराला चित्रपट करण्याची इच्छा असते, तशी मलाही आहेच.’

प्रियाचा ‘चार दिवस सासूचे’ मालिकेतला हीरो आस्ताद काळे म्हणजेच मालिकेतील राहुल तिच्याबद्दल सांगतो.. आस्तादही नाटकातून मालिकांकडे आलेला आहे. तो तब्बल १७ र्वष शास्त्रीय संगीत शिकलाय. या आधी त्याला ‘तुझ्याविना’, ‘ऊन-पाऊस’, ‘वादळवाट’ या मालिकांत पाहिले आहे. सध्या तो ‘चार दिवस सासूचे’ मालिकेत काम करताना दिसतो आहे.
‘बहुधा मी तिचा पहिलाच किंवा एकमेव हीरो नाही, पण ती मात्र माझी पहिलीच हिरॉईन! प्रिया आधीपासून या मालिकेत असल्याने ती रुळलेली होती. मी अगदीच नवखा असल्याने एकटाच मेकअप रूममध्ये बसलो होतो. तिच्याबरोबर सहज गप्पा सुरू झाल्या आणि मग आमची कधी मैत्री झाली ते कळलेच नाही. या मालिकेत आमचे इंटिमेट सीन खूप आहेत. अगदी आमच्या दोघांतला पहिलाच सीन होता तो मिठीचा. त्या वेळी आमची फारशी ओळख देखील नव्हती. त्यामुळे टेन्शन होतं पण ते दृश्य आम्ही निभावून नेलं. त्यानंतर आमची मैत्री वाढू लागली आणि कामात अधिक सहजता येऊ लागली. आता तर तिला खूप छळतो, चिडवतो, तिचंही वैशिष्टय़ म्हणजे तिला स्वत:वर हसायला आवडतं! तिचं नाक मोठं आहे त्यावरून तिला चिडवत असतो, मग तिला विचारायचं तू कॉफी कशी पितेस? प्रियाला काहीही सूचना केली की ती ते ऐकते आणि त्यानुसार बदलायचा प्रयत्न करते. आमच्या दोघांमधलं लक्षात राहिलेलं दृश्य म्हणजे.. आमच्या लग्नानंतरची पहिली रात्र असते आणि तिला उचलून बेडवर ठेवतो. तसं तर टेन्शन दोघांनाही होतं पण प्रिया खूपच घाबरली होती. तेव्हा मी तिच्याशी शांतपणे बोललो, तिला विचारलं तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मग मी जे करतो त्याला तू रिअ‍ॅक्ट कर आणि प्रियाने तो सीन खूप छान दिला. मला वाटतं ऑफ स्क्रीन मैत्री किंवा ज्याला केमिस्ट्री म्हणतात ती अशा ऑन स्क्रीन दृश्यांसाठी महत्त्वाची असते.’

प्रिया अशी आहे..!
तुझ्या व्यक्तिमत्त्वातला स्ट्राँग पॉइंट?

मी स्वत:शी खूप खरी आहे. मला त्रास झाला, कधी खूप स्ट्रगल करूनही काही हाती नाही आलं तर मी रडते, माझं मलाच तपासून बघते.
स्वत:मधला आवडता आणि नावडता गुण?
अर्थात मी स्वत:शी प्रामाणिक आहे हाच आवडणारा आणि नावडता म्हणजे मी खूप आळशी आहे!
आयुष्यातलं वेगळं वळण?
या सुखांनो या.
अविस्मरणीय क्षण?
झी अ‍ॅवॉर्डसाठी नॉमिनेशन. भले पुरस्कार नसेल मिळाला पण निदान दखल तरी घेतली गेली.
आदर्श?
प्रत्येक वळणावर भेटलेले वेगळे लोक.
आवडता कलाकार?
माधुरी दीक्षित- ऑल टाइम फेव्हरेट!
पुस्तक?
मला पावलो कोएलोची सगळी पुस्तकं आवडतात.
तुझ्यावर झालेली लक्षात राहील अशी टीका? कौतुक?
कौतुक तर बरेच जण करतात, खूप छान प्रतिक्रिया देतात. टीका म्हणजे काही जण म्हणतात मी नाकात बोलते, ते सुधारण्याचा माझ्याकडून प्रयत्न करते.
तुझी आवड? कपडे.. रंग.. जेवण?
जीन्स घालायला सगळ्यात आवडतात, काळा रंग अतिशय प्रिय आहे. जेवणं घरचं, पुरणपोळी मनापासून आवडते. आणि माझी एक आवड म्हणजे मला झोपायला खूप आवडतं!
तुझी इच्छा?
त्या कालपरत्वे बदलत असतात. सध्याची इच्छा आहे ‘भले भी हम बुरे भी हम’मधली भूमिका संपायला नको! सिनेमात काम करायचंय ही कायमस्वरूपी इच्छा आहेच.
पुढच्या जन्मी काय व्हायला आवडेल?
प्रियाच झाले तरी आवडेल.
मनीषा सोमण
maneesha24april@rediffmail.com