Leading International Marathi News Daily
गुरुवार, ११ जून २००९
  स्पेलिंग बी!
  ओपन फोरम
  ग्रूमिंग कॉर्नर - दिसतं तसं नसतं..
  क्रेझी कॉर्नर - ‘वाइफ इज ऑलवेज राइट’
  स्मार्ट बाय
  मेल बॉक्स
  दवंडी - गावकुसातली आकाशवाणी
  लँग्वेज कॉर्नर - जर्मनीतील ‘हरित क्रांती’
  यंग अचिव्हर्स - गवसलेलं क्षेत्रं
  एका लग्नाची गोष्ट
  इव्हेंटस कॉर्नर - शिल्पा आनंद यांचे ब्रायडल कलेक्शन
  नेट कॉर्नर - Little girl
with spunk!
  ब्यूटी कॉर्नर - मुलायम, घने लंबे बाल..

एका लग्नाची गोष्ट
कर्नाळ्यासारखी मुंबईतील निसर्गरम्य जागा.. पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमी माणसं तिथे नेहमीच भेट देतात. शाळांचाही तो एक आवडता पिकनिक स्पॉट आहे. गेल्या आठवडय़ात मात्र तिथल्याच एका प्लॉटवर लग्नाचे सूर आळवले जात होते. निसर्गाचा हिरवागार मंडप, मोकळी हवा आणि त्यात वडाच्या झाडाच्या छोटय़ाशा रोपटय़ाभोवती वधु-वरांनी आयुष्यभर एकमेकांना अशीच प्रसन्न साथ देण्याची शपथ घेतली. अविनाश आणि मैथिली.. शाळेपासूनची त्यांची मैत्री प्रेमात रुपांतरीत झाली. लग्न करायचं ठरलं तेव्हा काहीतरी वेगळं हवं या विचारावर दोघांचंही एकमत होतं. अविनाशला पर्यावरणाबद्दल विशेष प्रेम आहे. लग्नात होम करताना लाकडं जाळली जातात. धुराने प्रदुषण होतं.

 

त्यामुळे होम करायचं नाही यावर तो ठाम होता. मैथिलीला पारंपारिक पद्धतीने लग्न करण्याची इच्छा होती. मग दोघांनी त्यावर मध्यम मार्ग काढला. होमहवन तर करायचं नाही पण सात फेरेही घेतले गेले पाहिजेत. चर्चा करता करता ठरलं. पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन. त्याच दिवशी विवाहबद्ध व्हायचं. होमाच्या जागी वडाचं छोटसं रोपटं लावायचं. प्रश्न सुटला.
आपल्याकडे विवाह पद्धतीत अनेक असे विधी आहेत की जे मुलीचं दुय्यम स्थान दर्शवतात. उदाहरणार्थ, कन्यादान. हा विधीही गाळून टाकण्यात आला. विवाहाच्या वेळी मंत्रांद्वारे पती-पत्नीने कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात याबद्दल सांगितले जाते. यावर दोघांचा प्रश्न होता की नवरा-बायकोचं नातं म्हणजे फक्त देवाणघेवाण आहे का? आपल्या जबाबदाऱ्या मंत्रांद्वारे सांगण्याची गरज काय? त्या आपोआप पाळल्या गेल्या पाहिजेत. याच विचारांती अशी वाक्ये गाळून टाकण्यात आली. या सगळ्यात त्यांना पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीच्या स्नेहा जोशी आणि सुनंदा जोशी या मायलेकींनी पौरोहित्य करुन मोलाची साथ दिली.
एसी हॉल, भरपूर गर्दी, खाण्यापिण्याची चंगळ असे सर्वसाधारणपणे लग्नाचे स्वरुप असते. अविनाश आणि मैथिली याही बाबतीत जागरुक राहिले. आपल्या लग्नाचा खर्च आपल्या आईवडिलांनी करु नये. आपणच आपल्याला परवडेल अशा पद्धतीने लग्नाचा खर्च करायचा असं त्यांनी ठरवलं. आणि ते प्रत्यक्षातही आणलं. वधू-वर विवाहबद्ध झाले की त्यांना आशीर्वाद वा शुभेच्छा देऊन लोक थकून भागून घराची वाट धरतात. पण अविनाश आणि मैथिली यांच्या लग्नानंतर मात्र पाहुणे मंडळी पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन आपापल्या घरी गेली. कारणही तसंच होतं. लग्न झाल्यावर या दोघांनी वडाचं ते रोपटं लावलं. आणि आलेल्या पाहुण्यांनाही एकेक रोपटं दिलं. निसर्ग, समाज आणि माणुसकी या तिन्ही गोष्टींचा योग्य तो मान राखत केलेलं हे लग्न तरुण पिढीसमोर आदर्श ठरेल अशी आशा आहे.
नमिता देशपांडे
namiitadeshpande@gmail.com