Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

विविध

दहशतवादी वाटाघाटींसाठी तयार होते, पण..
दहशतवाद्यांना वाटाघाटीत रस होता याचे संकेत ताज महल हॉटेलमधील अतिरेकी आणि त्यांचे पाकिस्तानातील म्होरके यांच्यातील मोबाईलवरील संभाषणावरून मिळत होते. या संभाषणाचा तर्जुमा ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाला आहे. हल्ला झाल्यानंतर सहातासांच्या आत चार अतिरेक्यांनी हॉटेलच्या हेरिटेज विंगचा ताबा घेतल्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.१० वाजता फोन केला.

‘एकला चलो’विषयी अजून काँग्रेसमध्ये विचार नाही
नवी दिल्ली, १० जून/खास प्रतिनिधी

दहा वर्षांची स्वतंत्र राजकीय वाटचाल पूर्ण करूनही काँग्रेसमध्ये विलीन होणार काय, या प्रश्नाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिच्छा सोडलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहाव्या स्थापनादिनी आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांना आणि काँग्रेसश्रेष्ठींना हाच प्रश्न विचारला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाविषयी किंवा महाराष्ट्रात स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याच्या मुद्यावर अजून काँग्रेसच्या सर्वोच्च स्तरावर विचार झालेला नाही, असे काँग्रेसश्रेष्ठींच्या वतीने सांगण्यात आले.

टेनिस खेळणाऱ्या भारतीयांना किशोरवयीन मुलांनी लुटलेभारतीयांवरील हल्ल्याचे लोण आता कॅनडातही..
टोरांटो १० जून / पीटीआय

ऑस्ट्रेलियात भारतीयांवर होत असलेल्या वांशिक हल्ल्यांचे लोण आता कॅनडात पसरले असून तेथे सहा भारतीयांवर तरुण कॅनेडियन तरुणांनी हल्ला केला. व्हँकुव्हर नजीकच्या एका शहरात टेनिस खेळत असताना हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार कॅनेडियन व्यक्तींना अटक केली आहे. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. गेल्या शुक्रवारी अल्डरग्रोव येथे या कॅनेडियन तरुणांच्या टोळक्याने या भारतीयांवर हल्ला केला व वांशिक शिवीगाळ केली; तसेच लुबाडणूकही केली.

कर्जाचे दर कमी करा!
अर्थमंत्र्यांचा बँकांना आदेश
नवी दिल्ली, १० जून/पीटीआय

गृह व इतर किरकोळ कर्ज तसेच इतर औद्योगिक कर्जे स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. सार्वजनिक बँकांनी त्यांचे कर्जाचे दर कमी करून अर्थव्यवस्थेला चालना द्यावी, असे आदेश अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज सार्वजनिक बँकांना दिले आहेत. सार्वजनिक बँकांच्या प्रमुखांची आज अर्थमंत्री मुखर्जी यांच्याशी चर्चा झाली त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन ओ.पी.भट्ट यांनी वार्ताहरांना सांगितले की, या महिनाअखेरीस आमची बँक कर्जाचे दर कमी करील. बँकांकडून लोकांना किफायतशीर दराने कर्ज उपलब्ध होत नसल्याबाबत चिंता व्यक्त करून मुखर्जी यांनी असे सांगितले की, एक मध्यस्थ संस्था या नात्याने बँकांनी किफायतशीर दराने कर्जपुरवठा केला पाहिजे. अनेक क्षेत्रात सरकारमध्ये व बाहेरही याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने काही महत्त्वाचे दर कमी करूनही प्रत्यक्षात सार्वजनिक बँकांनी त्यांचे कर्जाचे दर पुरेशा प्रमाणात उतरवले नाहीत, त्यामुळे आता बँकानी कर्जाचे दर कमी करावेत व त्यासाठी पावले उचलावीत. त्यामुळे आर्थिक वाढीला उत्तेजन मिळेल.

पेशावरमधील स्फोटात १६ ठार
इस्लामाबाद, १० जून / ए.पी.

पेशावरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या स्फोटात १६ जण ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये दोन अमेरिकन नागरिकांचा समावेश असून जखमींमध्येही अनेक विदेशी नागरिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पेशावरमध्ये प्रसिध्द असलेल्या पर्ल कॉण्टीनेंटल या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा शक्तीशाली स्फोट करण्यात आला. स्फोटकांनी भरलेली कार हॉटेलमध्ये घुसवण्यात आली. हा स्फोट एवढा प्रचंड होता की त्यामुळे या हॉटेलचे छत कोसळले. या छताखाली अनेकजण अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. या स्फोटाआधी हॉटेलच्या आवारात गोळीबाराच्या फैरी ऐकल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. स्फोटामुळे हॉटेलच्या आवारात असलेली अनेक वाहने जळू खाक झाली तर जवळच असलेल्या एका मशिदीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या हॉटलमध्ये अनेक विदेशी नागरिक वास्तव्यास होते.

भारतीय विद्यार्थ्यांच्या दक्षता उपायांमुळे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान रूड संतप्त
मेलबोर्न, १० जून / पीटीआय

वांशिक हल्ल्यांनी संतप्त झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी सिडनीत सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने केली. मात्र, वांशिक हल्ले रोखण्यासाठी दक्षतेची कृती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारवाईमुळे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान केव्हिन रूड हे खवळले असून त्या विरोधात त्यांनी इशारा दिला आहे.
ऑस्ट्रेलियात कोणत्याही वंशाच्या किंवा देशाच्या विद्यार्थ्यांंवर होणारे हल्ले आपणाला मान्य नसून त्याविरोधात आपले सरकार कठोर कारवाई करेल. ऑस्ट्रेलियातील हे हल्ले नागरी जीवनातील खेदजनक भाग आहे. मात्र, त्याचबरोबर हल्ले टाळण्यासाठी कायदा हातात घेऊन कृती करण्याची भारतीय विद्यार्थ्यांची कृतीही आपणाला अमान्य असल्याचे सांगून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान केव्हिन रूड म्हणाले, की या हल्ल्याप्रकरणी सर्वानी संयम बाळगण्याची गरज आहे.

माओवाद्यांच्या हल्ल्यात ११ पोलीस ठार
जमशेदपूर, १० जून/पी.टी.आय.

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्हयात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या सुरुंगस्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधीक्षकासह ११ पोलीस ठार झाले असून सहा अन्य पोलीस जखमी झाले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांचे एक पथक दोन दिवसांच्या गस्तीनंतर सारंडा जंगलातून परतत असताना सेरेंगडा आणि अरुअंगा गावांमध्ये माओवाद्यांनी हा सुरुंग स्फोट घडवून आणल्याची माहिती झारखंडचे पोलीस महासंचालक व्ही.डी. राम यांनी दिली. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधीक्षक पी. परिमल यांच्यासह गोईकेरा पोलीस स्थानकाचे प्रभारी फिलीप्स टेटे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पी. सी. हेमब्रम यांचा मृतांमध्ये समावेश आहे. या स्फोटानंतर नक्षलवादी व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू झाली व ती चालूच होती, असे दलाचे कमांडंट संजय सिंह यांनी सांगितले.