Leading International Marathi News Daily
रविवार, ७ जून २००९

सुवर्णयोग
राशिस्थानी शुक्र-मंगळ, लाभात गुरू-राहू या ग्रहमानामुळे मेष व्यक्तींची आगेकूच वेगाने होईल. चंद्रभ्रमणाच्या शुभ परिणामांनी त्यामध्ये व्यापकता येऊ शकेल. दीर्घ काळानंतर येत असलेला सुवर्णयोग हुशारी, प्रयत्न, दूरदृष्टी यातून सत्कारणी लावला तर काहीजण बडी असामी बनू शकतील. शिक्षणात चमकाल. व्यापारात पैसा मिळेल. राजकीय, कला, साहित्य क्षेत्रातील व्यक्तीचे कर्तृत्व उजळून निघेल.
दिनांक : ८ ते १३ शुभकाळ.
महिलांना : सांसारिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात आघाडीवर राहता येईल.

प्रतिष्ठेला कवच मिळेल
राशिस्थानी रवी-बुध, भाग्यात राहू, दशमात गुरू या ग्रहांचे सहकार्य मिळाल्याने प्रयत्नाने महत्त्वाची प्रकरणे मार्गी लावता येतील. परंतु चतुर्थात शनी, व्ययस्थानी शुक्र-मंगळ असेपर्यंत मार्गी प्रकरणात पैसा टाकावा लागेल. आशा-निराशेचे खेळ पचवावे लागतील आणि नियमांचे काटे तज्ज्ञांच्या मदतीने दूर करावे लागतील. यामुळे शनिवारच्या चंद्र-गुरू युतीपर्यंत अखेर आपण यशस्वी झालेले असाल. धंदा, नोकरी, राजकारण यात प्रतिष्ठेचे कवच मिळालेले असेल.
दिनांक : ७, ११, १२, १३ शुभकाळ.
महिलांना : अचानक मार्ग सापडतील.

समीकरणातून सफलता
भाग्यात गुरू, लाभात शुक्र-मंगळ, पराक्रमी शनी प्रयत्न-सफलतेच्या समीकरणातून मिथुन व्यक्तींना शनिवारच्या चंद्र-गुरू युतीपर्यंत पुढे पुढे सरकता येणार आहे. तरीही अष्टमात राहू, व्ययस्थानी रवी-बुध असल्याने समस्यांशीही सामना करावा लागणार आहे. शक्तीपेक्षा येथे युक्तीचाच उपयोग होऊ शकेल. परिचितांच्या मध्यस्थीने काही प्रश्न सोडवता येतील. बुध-नेपच्यून केंद्रयोग होत असताना महत्त्वाची कागदपत्रे सांभाळावी लागतील. शासकीय कामकाज आणि आर्थिक देवघेव यात त्याचा फायदा होईल. शिक्षण, व्यापारात चालढकल नको.
दिनांक : ८, ९, १०, १३ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्न, हुशारीतून बरीच प्रकरणे मार्गी लावता येतील.

सामना यशस्वी होईल
दशमात शुक्र-मंगळ, लाभात सूर्य-बुध, सप्तमांत राहू या ग्रहांमधील प्रतिक्रिया विचारांना वेग देतील आणि कर्तृत्वाला उत्थान देतील. त्यामुळे अनिष्ट शनी, गुरूशी सामना यशस्वी करून अनेक क्षेत्रांत प्रभाव निर्माण करता येईल. मंगळवारच्या बुध-हर्षल शुभयोगाच्या आसपास याचा विशेष प्रत्यय यावा. प्रवास होतील. शिक्षणातले प्रश्न सुटतील. समाजकार्ये गाजतील, व्यापार पैसा देईल आणि शत्रू समोरून दिसेनासे होतील. चंद्र-गुरू युती परमेश्वरी चिंतनातून आनंद देणारी आहे.
दिनांक : ७, ११, १२ शुभकाळ.
महिलांना : सत्य आणि शिस्त सफलता निश्चित करतील.

सफल प्रवासाचा काळ
गुरूची कृपा, भाग्यात शुक्र-मंगळ, दशमांत सूर्य प्रगतीचा आलेख उंचावत नेणारी शक्ती याच ग्रहांमधून मिळणारी आहे. शनिवारच्या चंद्र-गुरू युतीपर्यंत सफल प्रवास सुरूच राहील. साडेसाती, अनिष्ट राहू, केतू यांच्या विरोधावरही विजय संपादन करू शकाल; परंतु शक्ती-मस्तीचे प्रदर्शन कटाक्षाने टाळा आणि पुढे सरकत राहा. शिक्षण, साहित्य, कला क्षेत्रातील अवघड प्रकरणे मार्गी लागतील. आर्थिक समस्या सुटतील, उद्योगाची घडी बसवता येईल. प्रकृतीवर रामबाण औषध सापडेल.
दिनांक : ८, ९, १०, १३ शुभकाळ.
महिलांना : नवे तंत्र, नवी कृती संसारात आणि व्यवहारात यश देईल.

गुप्तता आवश्यक
साडेसातीची प्रखरता गुरूच्या नाराजीने अनिष्ट शुक्र-मंगळामुळे सातत्याने वाढत आहे. घेतलेले निर्णय, केलेली कृती, संशय आणि शत्रूंच्या कारस्थानामध्ये गुरफटण्याची शक्यता असल्याने अंतिम टप्प्यातून बाहेर पडेपर्यंत गुप्तता उपयुक्त ठरणारी आहे. भाग्यातील रवी-बुध-मंगळवारचा बुध-हर्षल शुभयोग इभ्रतीला धक्का बसू देणार नाहीत. आर्थिक देवघेव करारातील शब्दप्रयोग, आश्वासन या संबंधात बुध-नेपच्यून केंद्रयोगाच्या काळात सावध राहावे लागते.
दिनांक : ७, ११, १२ शुभकाळ.
महिलांना : रविवारची वटपौर्णिमा ते शनिवारची चंद्र-गुरू युती प्रवासात प्रसन्नता देईल.

संधीचे सोने होईल
पंचमात गुरू, सप्तमात शुक्र, मंगळ आणि शनीचे सहकार्य कार्यचक्र वेगात फिरत राहावे. नव्या नव्या क्षेत्रात प्रवेश व्हावा आणि प्रवेशाचे प्रचंड स्वागत व्हावे असा समर्थ ग्रहकाळ लाभलेला आहे. प्रयत्न, हुशारी, दूरदृष्टी यातून संधीचे सोने होईल आणि कर्तृत्वाच्या अनेक बाजू उजळून निघतील. प्रवास कराल. शेतीची कामे मार्गी लावता येतील. व्यापारी घडी बसवता येईल, समाजकार्य उभे करू शकाल. चतुर्थात राहू असल्याने अंतर्गत असंतोषावर गोड बोलणे हाच मार्ग राहील.
दिनांक : ८, ९, १०, १३ शुभ काळ.
महिलांना : वटपौर्णिमेपासूनच समस्या वेगाने सुटू लागतील.

परिश्रमातून आनंद
पराक्रमी राहू, दशमांत शनी, पंचमात सूर्य-बुध आणि बुध-हर्षलचा शुभयोग सार्थकी परिश्रमाचा आनंद याच ग्रहांमधून मिळवता येतो. परंतु गुरू, शुक्र नाराज असल्याने संयमच शनिवारच्या चंद्र-गुरू युतीपर्यंत आनंद सांभाळून ठेवू शकतो याचे विस्मरण नको. प्रापंचिक, आर्थिक, व्यावसायिक विभागात याच मार्गाने आनंद स्थिर ठेवता येईल, प्रवास होतील, शिक्षण, साहित्यात चमकाल, बुध-नेपच्यून केंद्रयोगाचा उलाढालीत हस्तक्षेप टाळण्यासाठी कागदपत्रे सांभाळावी लागतील.
दिनांक : ७ ते १० शुभ काळ.
महिलांना : संयमाने वागा.

स्मरणात राहणारा ग्रहकाळ
पराक्रमी गुरू, पंचमात शुक्र, मंगळ-शनीचे सहकार्य धनू व्यक्तींच्या दृष्टीने हा ग्रहकाळ दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या शुभ घटनांचा ठरावा असाच आहे. बौद्धिक प्रांतात, राजकीय क्षेत्रात, व्यापारात याची प्रचीती यावी. शनिवारच्या चंद्र-गुरू युतीपर्यंत स्थगित प्रकरणे मार्गी लावता येतील. शेती उपक्रम पूर्ण करू शकाल, कला, साहित्यातले विषय निश्चित होतील. षष्ठात रवी, बुध असेपर्यंत तणाव, दडपण असे प्रकार मधूनमधून त्रास देतील, पण प्रगती रोखू शकणार नाहीत. अनपेक्षित उधारी वसूल होणे शक्य आहे. दूरचे प्रवास होतील.
दिनांक : ८ ते १२ शुभ काळ.
महिलांना : वटपौर्णिमा ते शनिवारची चंद्र-गुरू युती प्रयत्नातून प्रगती, प्रतिष्ठा देणारा काळ आहे.

कृतीमधून श्रेष्ठत्व
गुरूची कृपा, राहूचे सहकार्य, सूर्य, बुध पंचमात, झटपट निर्णय घेऊन केलेली कृती श्रेष्ठत्व सिद्ध करणारे यश देऊ शकेल. मंगळवारच्या बुध-हर्षल शुभयोगाच्या आसपास काही घटनांची प्रचीती येईल. शनिवारच्या चंद्र-गुरू युतीपर्यंत मोठी मजल मारता येणे शक्य आहे. अष्टमात शनी असल्याने शत्रूच्या कारस्थानांवर मात्र सतत लक्ष ठेवणे आवश्यक राहील. दूरचे प्रवास होतील. नवे परिचय होतील, मुलांचे प्रश्न सुटतील, व्यापारातून पैसा मिळेल, समाजातून सन्मान मिळतील, देवधर्म आनंद देईल. प्रकृतीवर रामबाण औषध सापडेल.
दिनांक : ७, ११, १२, १३ शुभ काळ.
महिलांना : संसारात प्रसन्नता लाभेल. शुभवार्ता समजतील.

ग्रहांचे सहकार्य मिळेल
राशिस्थानी गुरू, पराक्रमी शुक्र, मंगळ, सप्तमात शनी प्रयत्नाने यश मिळवून समाजात प्रतिष्ठा मजबूत करण्यासाठी एवढय़ा अनुकूल ग्रहांची भरपूर मदत होणार आहे. शनिवारच्या चंद्र-गुरू युतीपर्यंत कमी अधिक वेगाने आपली आगेकूच सुरूच राहील. रवी, राहू, केतू अनिष्ट असल्याने आरोग्य आणि आश्वासन यांनी व्यवहारात घोटाळे होऊ नयेत याची मात्र काळजी ठेवा. कला, साहित्य, विज्ञानात आघाडीवर राहाल. व्यापारातून पैसा मिळेल, समाजकार्य उभे करू शकाल. अवघड प्रकरणे मार्गी लागतील. कृषी कार्ये वळणावर येतील.
दिनांक : ७ ते १० शुभ काळ.
महिलांना : धर्मकार्यातून उत्साह लाभेल, प्रपंचात नवीन उपक्रम सुरू कराल.

रूपरेखा पक्की ठेवा
द्वितीयात शुक्र, मंगळ, पराक्रमी सूर्य, बुध आणि लाभात राहू प्रयत्न, कृती आणि घडय़ाळाचे काटे यांचा समन्वय ठेवून शनिवारच्या चंद्र-गुरू युतीपर्यंतची रूपरेखा पक्की ठेवली तर गुरू-शनीच्या अनिष्टतेवर नियंत्रण ठेवून अनेक क्षेत्रांत बाजी मारता येईल. नवे परिचय, अभिनव उपक्रम यांचा त्यात समावेश करता येईल. व्यापार, राजकारण यात जम बसवता येईल. साहस करू नका, संधी सोडू नका, आगेकूच सुरू ठेवा. कृषी उपक्रमात अधिक परिश्रम घ्यावे लागतील, प्रवास होतील.
दिनांक : ८ ते १२ शुभ काळ.
महिलांना : सामाजिक उपक्रम, धर्मकार्ये यातून प्रसन्नता लाभेल.