Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

मास्तरांना किती मार्क मिळणार?
चॉईस इज युवर्स

चित्रपट प्रदर्शित होताना एखाद्या चित्रपटाबाबत वाद निर्माण झाला प्रेक्षकांमध्ये त्याबाबत उत्सुकता वाढते. ‘मास्तर एके मास्तर’वरही शिक्षकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा चित्रपट सेन्सॉरने संमतच केला नव्हता. पुढे दुसरी समिती नेमण्यात येऊन हा वाद एकदाचा शमला. पण या घटनेला आता बरेच महिने होऊन गेल्यामुळे हा वाद प्रेक्षकांच्या विस्मरणात गेला असेल. भावनाप्रधान चित्रपट देण्यात संजय सूरकर यांची हातोटी. ‘चौकट राजा’, ‘सातच्या आत घरात’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

‘नंबर वन’ फेम निर्मात्याचा चित्रपट ‘कुली नंबर वन’, ‘हिरो नंबर वन’, ‘बिवी नंबर वन’ या चित्रपटांचे निर्माते वासु भगनानी यांचा ‘कल किसने देखा’ हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. त्याच्या कथेपेक्षा वासु भगनानी यांच्या मुलाचा पहिला चित्रपट म्हणून या चित्रपटाची अधिक चर्चा आहे. प्रेक्षकांसाठी ‘अ‍ॅडेड अ‍ॅट्रॅक्शन’ म्हणून या चित्रपटात शाहरूख खान, जूही चावला, ऋषी कपूर आणि संजय दत्त यांनाही घेण्यात आले आहे.

कमिंग सून..
वीकएण्डला रात्री चित्रपट पाहणे, हा फिक्स्ड कार्यक्रम असलेल्यांची गेले दोन महिने गैरसोय झाली होती. या दरम्यान काही मराठी, इंग्रजी आणि क्वचित हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले, पण ‘लार्जर दॅन लाइफ’ पाहायची सवय झालेल्या भारतीय प्रेक्षकांना मल्टिप्लेक्सपर्यंत खेचून आणण्यासाठी ते पुरेसे नव्हते. आता मात्र पुन्हा एकदा ‘बॉक्स ऑफिस’ जिवंत होणार आहे. चित्रपटांची चर्चा, त्यांनी गोळा केलेला गल्ला, कलाकारांबद्दलचे गॉसिप्स सर्व काही पूर्ववत सुरू होईल. येत्या काही आठवडय़ांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटांची ही ओझरती झलक..मल्टिप्लेक्सचालक आणि हिंदी चित्रपट निर्माते यांच्यातील वादग्रस्त मुद्यांचा तिढा सुटता सुटत नव्हता. गेले नऊ आठवडे हिंदी चित्रपट पाहायला मिळत नसल्याने ‘पिटातले प्रेक्षक’सुद्धा हवालदिल झाले होते.

रोल चेंजिंगची फेरी..
गुरुवारच्या भागात स्पर्धक तरुणांनी आपापले जोडीदार निवडले. आता शुक्रवारच्या भागात ‘जोडी जमली रे’मध्ये ‘रोल चेंजिंग’ ही गमतीदार फेरी पाहायला मिळणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रात्री दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी रात्री १० वाजता प्रसारित होणाऱ्या ‘जोडी जमली रे’ या विवाह जुळविण्याच्या ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये इंटरॅक्टिव्ह खेळ आणि ‘कम्पॅटिबिलिटी टेस्ट’ करण्याच्या नवीन पद्धतींचा अवलंब करण्यात येत असल्यामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार बनत आहे.

अभिनेता संदीप कुलकर्णीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
‘श्वास’, ‘डोंबिवली फास्ट’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांतून प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता संदीप कुलकर्णी यांना ‘एक डाव संसाराचा’ या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी ‘नायजेरिया एण्टरटेन्मेंट फिल्म फेस्टीव्हल अ‍ॅण्ड अ‍ॅवॉर्ड २००९’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. संजय सूरकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट असून संदीप कुलकर्णीला प्रथमच आंतरराष्ट्रीय बहुमान मिळाला आहे.
प्रतिनिधी

स्क्रीन रायटर्स लॅब
भारतीय सिनेमाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ अर्थात एन. एफ. डी. सी. तर्फे विविध उपक्रम राबविले जातात. एन. एफ. डी. सी. ने ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये अशा दोन टप्प्यात ‘स्क्रीनरायटर्स लॅब २००९’चे आयोजन केले आहे. या उपक्रमाला बिंगर फिल्मलॅब, लोकानरे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एण्टरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा आदी संस्थांनी सहकार्य केले आहे. पटकथाविषयक प्रशिक्षण देणाऱ्या ‘स्क्रीन रायटर्स लॅब २००९’ या कार्यशाळेत पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट बाजारपेठेच्या दृष्टीने पटकथाकार त्यांच्या मूळ भारतीय संहितांवर काम करतील. हा पहिला टप्पा ८ ते १२ ऑगस्ट दरम्यान लोकानरे (स्वित्र्झलड) येथे होईल. या कार्यशाळेचा दुसरा टप्पा गोव्यात २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या भारत सरकारच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान होणार आहे. उदयोन्मुख आणि होतकरू पटकथाकारांना हे उत्तम व्यासपीठ एन. एफ. डी. सी. ने उपलब्ध करून दिले आहे. पटकथाकारांनी या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आपले अर्ज writer@nfdcindia.com या ईमेलवर पाठविण्याचे आवाहन एन. एफ. डी. सी. तर्फे करण्यात आले आहेत.
प्रतिनिधी