Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

निवडणूक कामात कसूर : सांगलीत १८२ जणांना फौजदारीच्या नोटिसा
सांगली, ११ जून / प्रतिनिधी
मिरज विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामात कसूर केल्याचा ठपका ठेवून सांगली महापालिकेकडील सुमारे १८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० च्या कलम १३४ प्रमाणे कामात कसूर केल्याप्रकरणी आपणावर फौजदारी गुन्हे का दाखल करू नयेत, अशा आशयाच्या नोटिसा जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने गुरुवारी बजाविण्यात आल्या आहेत. या नोटिशीमुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

बालवाडी प्रवेशप्रकरणी शाळेसमोर निदर्शने
कोल्हापूर, ११ जून / प्रतिनिधी

सातत्याने प्रशासनाच्या विशेषत: शिक्षण खात्याच्या आदेशांना केराची टोपली दाखविणाऱ्या होलिक्रॉस हायस्कूलच्या व्यवस्थापनाविरुद्ध आज भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विद्यार्थी पालक प्रवेश संरक्षण हक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. सुमारे दोन-अडीच तास व्यवस्थापनाला धारेवर धरण्यात आले. अखेर या व्यवस्थापनाला संतप्त कार्यकर्ते आणि पालकांच्यासमोर आज नमते घ्यावे लागले.

भोसले नाटय़गृहातील रंगमंचावर जेवणावळी; शिवसेनेची निदर्शने
कोल्हापूर, ११ जून / विशेष प्रतिनिधी

पवित्र रंगभूमी म्हणून रसिकांच्या मनामध्ये श्रद्धेचे स्थान असलेल्या केशवराव भोसले नाटय़गृहाच्या रंगमंचावर जेवणावळीचा कार्यक्रम उरकणाऱ्या कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनाने जनतेची जाहीर माफी मागावी अन्यथा राजीनामा देऊन बाहेर पडावे, अशी मागणी गुरुवारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. याप्रश्नी सेनेने महापालिकेवर मोर्चा काढून गुरुवारी निदर्शने केली.

उजळाईवाडी विमानतळ विस्ताराची सूत्रे प्राधिकरणाकडे !
मोबदला स्वीकारण्यास बाधित शेतकऱ्याचा नकार
कोल्हापूर, ११ जून / विशेष प्रतिनिधी
कोल्हापूरच्या उजळाईवाडी विमानतळाचा विस्तार करण्यासाठी विमानतळाची सूत्रे भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सोपविण्याचा निर्णय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुंबईत जाहीर केला असतानाच कोल्हापुरात विस्तारीकरणात बाधित होणाऱ्या शेतकऱ्याने शासनाने जाहीर केलेला मोबदला स्वीकारण्यास नकार दिल्याने विमानतळ विस्तारीकरणाची अवस्था ‘तीळभर पुढे आणि गहूभर मागे’ अशी झाली आहे.

अनुदान समप्रमाणात वाटपाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
सांगली, ११ जून / प्रतिनिधी

सांगली महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी देण्यात येणाऱ्या तीन कोटी रुपयांच्या शासकीय अनुदानाचे समप्रमाणात वाटप करण्याची ग्वाही महापौर मैनुद्दीन बागवान व आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी दिल्याने विरोधी काँग्रेसच्या नगरसेवकांनी गेले चार दिवसांपासून सुरू केलेले आमरण उपोषण गुरुवारी मागे घेतले.

विठ्ठल मंदिराचे पावित्र्य राखणार- गोपीचंद कदम
पंढरपूर, ११ जून / वार्ताहर

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पावित्र्य राखूनच भाविकांना कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे नव्याने स्वतंत्र कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेतलेले गोपीचंद कदम यांनी सांगितले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर स्वतंत्र कारभार पाहण्यासाठी कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून, कदम यांनी संजीव पलांडे यांच्याकडून कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी संपूर्ण देवस्थान कामकाजाची पाहणी केली व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

एस. एस. सूर्यवंशी पंढरपूरचे नवे तहसीलदार
पंढरपूर, ११ जून / वार्ताहर
पंढरपूरचे तहसीलदार संजय तेली यांची बदली अलिबाग येथे प्रांताधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी सोलापूर येथे करमणूक कर अधिकारी म्हणून कार्यरत असलेले एस. एस. सूर्यवंशी यांनी पंढरपूरचे नवे तहसीलदार म्हणून आज पदभार स्वीकारला. एस. एस. सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारून सर्व खाते प्रमुख यांची बैठक घेतली व त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. सर्वानी सलोख्याने काम करावे अशा सूचना दिल्या. सूर्यवंशी यांनी यापूर्वी तहसीलदार म्हणून अलिबाग, गुहागर, पुणे शहर आदी ठिकाणी काम केले आहे, तीन महिन्यांपूर्वी सोलापूर येथे करमणूक कर अधिकारी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. संजय तेली यांची अलिबाग येथे बदली झाल्याने रिक्त जागेवर तहसीलदार म्हणून सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला आहे.