Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

नवीन मतदारसंघ अनुकूल कुणासाठी?
लक्ष्मण राऊत

पुनर्रचनेनंतर पूर्वीच्या जालना विधानसभा मतदारसंघाच्या भौगोलिक क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. पूर्वीच्या मतदारसंघातील गावांपैकी ६७ गावे आता घनसावंगी विधानसभा मतदारसंघात गेली आहेत. तर पूर्वीच्या बदनापूर विधानसभा मतदारसंघातील ५७ गावे पुनर्रचित जालना मतदारसंघात आली आहेत. जालना मतदारसंघात आता जवळपास ६८ टक्के मतदार शहरी तर ३२ टक्के मतदार ग्रामीण आहेत.

राष्ट्रवादीचं गणित भाजपसाठी ‘फायद्या’चे
वसंत मुंडे

‘झुंजार विरोधी पक्षनेता’ अशी ओळख निर्माण करणारे गोपीनाथ मुंडे यांचा रेणापूर हा मतदारसंघ. पुनर्रचनेत आता रेणापूरचे अस्तित्व संपून परळी मतदारसंघ असे नामांकरण झाले आहे. तर तब्बल पाच वेळा प्रतिनिधित्व केलेल्या मुंडे यांनीही लोकसभेत प्रवेश केल्याने त्यांचा ‘वारसदार’ जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय मुंडे यांनी आगामी निवडणुकीतून विधानसभेत पाऊल ठेवण्याची तयारी केली आहे.

पुनर्रचनेनंतर आता महिला आरक्षणाची धास्ती!
केंद्रात पुन्हा सत्तेत आल्यावर यूपीए सरकारने सुरुवातीच्या १०० दिवसांमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचा निर्धार केला आहे. संसद आणि विधिमंडळांमध्ये ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यासाठी सरकार पाऊल उचलेल, असे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या अभिभाषणातही नमूद केले आहे. केंद्र सरकारने निर्धार केल्याप्रमाणे पहिल्या १०० दिवसांमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेच तर त्याची पहिली अंमलबजावणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये होऊ शकते.

‘श्रावणबाळ’ योजनेवरून विरोधकांचे टीकास्त्र
मुंबई, ११ जून/ खास प्रतिनिधी

राज्यातील ६० वर्षांवरील वृद्धांना श्रावणबाळ योजनेतून अनुदान मिळण्यासाठी दारिद्रय़रेषेखालील नागरिकांच्या यादीत त्यांचा समावेश केला जायला हवा, अशी जोरदार मागणी आज विरोधकांनी विधानसभेत केली. या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी या नागरिकांकडे पिवळी शिधापत्रिका असणे आवश्यक आहे, असा शासकीय आदेश असल्यामुळे हजारो गोरगरीब वृद्धांना या योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे, याकडेही विरोधकांनी सरकारचे लक्ष वेधले.

जातीय राजकारण मतदारांनी नाकारले - सोनिया गांधी
रायबरेली, ११ जून / पीटीआय

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जातीय राजकारण करणाऱ्या पक्षांना स्पष्टपणे नाकारले असून विकासाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या बाजूने कौल दिला असल्याचे मत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज व्यक्त केले. स्पष्ट कौल मिळवून संयुक्त पुरोगामी आघाडी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर प्रथमच आपल्या मतदारसंघाला भेट देण्यासाठी आलेल्या सोनियांनी आजच्या भेटीत मतदारांचे आभारही मानले.

मुंबईवरील चर्चेत शिवसेना, भाजपचे परस्परविरोधी सूर
मुंबई, ११ जून/प्रतिनिधी

अमूक काम महापालिकेचे तमूक काम एमएमआरडीएचे असे वाद न घालता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए)ने मुंबईच्या विकासाचा २०२० सालाचा नवा आराखडा (व्हिजन डॉक्युमेंट) तयार करावा, अशी मागणी भाजपचे नितीन गडकरी यांनी केली तर महापालिकेवर बोट उगारणाऱ्या एमएमआरडीए आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना उत्तर प्रदेशात मायावतींच्या सेवेला धाडा, अशी टीका शिवसेनेचे दिवाकर रावते यांनी केली.

मंत्र्यांनी मराठीतूनच उत्तर देण्यावरून विरोधकांचा सभात्याग
मुंबई, ११ जून / प्रतिनिधी

मंत्र्यांनी सभागृहात बोलताना मराठी भाषेतूनच उत्तर द्यावे, अशी विरोधकांची मागणी सभापतींनी फेटाळून लावल्याने गुरुवारी विधान परिषदेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा देत सभात्याग केला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांमध्ये एनसीसी सक्तीचे करण्याबाबतचा प्रश्न संजय दत्त, जैनुद्दीन जव्हेरी आदी सदस्यांनी विचारला होता. या वेळी उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी हिंदी भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. सदर विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने त्यांना भावना कळविण्यात येतील, असे राज्यमंत्री शेट्टी म्हणाले. शेट्टी यांनी हिंदीतून दिलेल्या उत्तराला शिवसेनेचे दिवाकर रावते यांनी हरकत घेतली. हा मराठी भाषेचा अवमान असून मंत्र्यांनी मराठीतच बोलावे असा आग्रह त्यांनी धरला. सदस्यांनी प्रश्न हिंदीत विचारला म्हणून हिंदीत उत्तर दिले. आम्हाला घटनेप्रमाणे हिंदीत बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. त्यावर विरोधकांनी गदारोळ घातला. त्याला हिंदी ही राष्ट्रभाषा आहे त्यामुळे हिंदीला विरोध नको, असे प्रत्युत्तर सत्तारूढ सदस्यांनी दिले. मंत्र्यांना चांगले मराठी येते, प्रश्न हिंदीतून विचारला म्हणून त्यांनी हिंदीतून उत्तर दिले, त्यामध्ये काहीही गैर नाही, असे सभापती शिवाजीराव देशमुख म्हणाले. या वेळी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी हस्तक्षेप केला. मराठीचा पुळका यांना केवळ राजकारणापुरता येतो. अन्यथा यांची मुले इंग्रजी शाळेतच शिकत असतात, असे राणे म्हणाले. त्याचा निषेध करीत विरोधकांनी सभात्याग केला.