Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

राजकीय धुसफूस!
नवी दिल्ली, ११ जून/खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांचे निकाल लागून १६ जूनला महिना होईल. पण दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील अस्वस्थता, खदखद आणि अंतर्गत धुसफूस कमी होण्याऐवजी आणखीच वाढली आहे. केंद्रातील सत्ताधारी आघाडीत तसेच भाजप-रालोआ आणि डाव्या आघाडीसारख्या विरोधकांमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून तणाव निर्माण झाला आहे. सारेच राजकीय पक्ष व आघाडय़ा आपली ‘स्वच्छ’ प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून धडपडत आहेत.

राज्याच्या एटीएस प्रमुखपदी के. पी. रघुवंशी
कोर्टाच्या तंबीनंतर गृह विभागाला आली जाग
मुंबई, ११ जून / प्रतिनिधी
राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून रेल्वेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक के. पी. रघुवंशी यांची आज नियुक्ती करण्यात आली. गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज सायंकाळी उशिरा विधानसभेबाहेर पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. उच्च न्यायालयाने आजच एका आदेशाद्वारे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुखपद येत्या चार आठवडय़ात भरण्याचे आदेश दिले होते.

मुख्यमंत्र्यांचा मराठी पुकारा!
मुंबई, ११ जून / खास प्रतिनिधी
विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये आज मराठीचा पुकारा झाला. रोजगारांमध्ये मराठी टक्का कमी होऊन परप्रांतीयांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. मात्र उद्योग खात्याने केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील खासगी आस्थापनांमध्ये मराठी टक्का ८० टक्के असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच रेल्वे, टपाल खाते यासह विविध केंद्रीय आस्थापनांमध्ये मराठी तरुणांना प्राधान्य मिळावे म्हणून राज्य शासन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असून, बिगर मराठी भाषकांवरील हल्ल्याचे निमित्त करून राज्यातील केंद्रीय सेवेची भरती केंद्रे व परीक्षा रद्द करण्याचा डाव कुणी रचला तर तो उधळून टाकू, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.

पदपथावर झोपलेल्या दोघींना डम्परने चिरडले
मृतांमध्ये पाच महिन्यांची मुलगी

मुंबई, ११ जून / प्रतिनिधी

भरधाव वेगातील डम्पर पदपथावर चढून झालेल्या दुर्घटनेत पाच महिन्यांच्या एका चिमुरडीसह एक महिला ठार झाली. ही दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्री गेट वे ऑफ इंडिया येथे घडली. अपघातात अन्य चारजण गंभीर जखमी झाले असून त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजश्री मायकल डिसोझा (२०) आणि निर्मला दत्तू काळे (पाच महिने) या दोघी अपघातात मृत्यूमुखी पडल्या.

समुद्रमार्गे अतिरेकी हल्ल्याची खबर पोलिसांकडे जुलैपासूनच
अतिवरिष्ठांच्या अनुत्साहामुळे टेहळणीत शिथीलता
मुंबई, ११ जून / प्रतिनिधी
दक्षिण मुंबईतील विशिष्ट ठिकाणे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर होती तसेच समुद्रमार्गे अतिरेकी हल्ला होणार असल्याबाबतची विशिष्ट माहिती कनिष्ठ अधिकाऱ्यांना जुलै महिन्यापासूनच मिळालेली होती आणि त्यानुसार आवश्यक ती काळजी घेण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला होता. मात्र त्या प्रयत्नांना अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनीच फारशी दाद दिली नाही, अशी धक्कादायक माहिती बाहेर येत आहे.

ऐन महत्त्वाच्या वेळीच वैद्यकीय आणि नागरी सेवा कोलमडल्या..!
श्वेता देसाई/स्वाती खेर
मुंबई, ११ जून

दहशतवादी हल्ला मुंबई पोलिसांना नवीन नाही; तसेच नागरी आणि तातडीच्या, आपत्कालीन सेवा पुरविणाऱ्या यंत्रणांनासुद्धा ही बाब नवी नाही. आपत्ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित असो, त्यांनी यापूर्वीही अशा प्रसंगांना तोंड दिलेले आहे; परंतु २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी कायदा अंमलबजावणी आणि सुरक्षा यंत्रणा यांच्याबरोबरच नागरी आणि वैद्यकीय सेवा संस्थांचीही अकार्यक्षमता प्रत्ययास आली.२६ जुलै २००५ चा जलप्रलय, ११ जुलै २००६ चे उपनगरी गाडय़ांमधील बॉम्बस्फोट, दरवर्षी होणारे इमारती कोसळण्याचे प्रकार यापासून या संस्थांनी काहीच बोध घेतला नसल्याचे जाणवते. प्रत्येक वेळी नेतृत्वाचा अभाव, निर्णय क्षमतेचा अभाव यामुळे उडणारा गोंधळ कायम आहे. (उर्वरित वृत्त )

अग्निपरीक्षा
भारत वेस्ट इंडिजशी आज भिडणार
लंडन, ११ जून/ पीटीआय
‘वासरात लंगडी गाय शहाणी’ या म्हणीनुसार भारताने अ गटातील साखळी सामन्यात अव्वल स्थान राखले. पण ‘सुपर एट’ फेरीमध्ये भारताची अव्वल संघांशी गाठ पडणार असल्याने आता ट्वेन्टी-२० विश्वचषक गतविजेत्यांची खरी अग्निपरीक्षा असेल. आर्यलड आणि बांगलादेश सारखे सोपे पेपर आत्तापर्यंत भारताच्या वाटय़ाला आले होते. पण उद्या भारताचा पहिला ‘सुपर एट’ मधील पहिला सामना ख्रिस गेलच्या वेस्ट इंडिज संघाविरूद्ध होणार असून त्यांनी ऑस्ट्रेलियाला नमविल्याने शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात ‘धोनी ब्रिगेड’चा कस लागेल. बांगलादेश आणि आर्यलडला सहज नमविल्याने भारतीय संघाचे मनोधैर्य चांगलेच उंचावलेले असेल. सेहवागची जागा रोहित शर्मा चांगल्या पद्धतीने भरून काढताना दिसत आहे. त्याला गंभीरची चांगली साथ लाभत असून ही जोडी भारताला चांगली सलामी देण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. पण चांगली सुरूवात दिल्यानंतर मात्र धावांची गती ‘पॉवर प्ले’नंतर दोन्हीही सामन्यात कमी होताना दिसली आहे आणि त्यावर योग्य तोडगा काढायला हवा.

राणा जगजीतसिंह यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा -अण्णा हजारे
लोहा, ११ जून /वार्ताहर
सुसंस्कृत व प्रगत अशा महाराष्ट्राला पद्मसिंह पाटील यांच्या प्रकरणाने कलंकित केले आहे. लोकशाहीची शाश्वत मूल्ये जपायची असतील तर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राज्यमंत्री राणा जगजितसिंह यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. जनजागरण मोहिमेअंतर्गत अण्णा हजारे लोहा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य प्रगत व सुसंस्कृत आहे. या राज्यात खासदार पद्मसिंह पाटील यांच्या प्रकरणाने कलंक लावला. पुरोगामी विचाराच्या राज्याने विविध क्षेत्राला दिशा देण्याचे काम केले आहे. राजकारणातील गुन्हेगारी थोपविण्याची आज गरज आहे. प्रभावी आंदोलने होतात तरीही भ्रष्ट लोक निवडून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार पद्मसिंह पाटील यांची हकालपट्टी केली पण त्यांच्या मुलाला मंत्रिमंडळात ठेवले. लोकशाहीचे पावित्र्य जपायचे असेल तर राणा जगजीतसिंह यांनी स्वत: राजीनामा द्यावा.
राजकारणात चांगले लोक येत आहेत; परंतु त्यांचे काही चालत नाही. जिल्हा मध्यवर्ती बँका डबघाईला येत आहेत; त्यामुळे ठेवीदारांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. लवकर तीन नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे. तीन जण कोण हे मात्र वेळ आल्यानंतर सांगू असे अण्णा म्हणाले.

पद्मसिंह पाटील यांची नार्को चाचणी?
मुंबई, ११ जून / प्रतिनिधी

काँग्रेसनेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित नेते आणि खासदार पद्मसिंह पाटील यांची ‘केंद्रीय अन्वेषण विभाग’ (सीबीआय) नार्को आणि लाय डिटेक्टर चाचणी करण्याची शक्यता आहे. पाटील हे चौकशीत सहकार्य करीत नसून त्यांचे वर्तन पुढेही असेच राहिले तर त्यांची नाकरे अ‍ॅनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चाचणी करण्यात येईल, असे सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, निंबाळकर यांची ज्या गाडीमध्ये हत्या करण्यात आली ती गाडी आणि त्यांचे मारेकरी ज्या गाडीतून पळून गेले, अशा दोन गाडय़ांच्या तपासणीसाठी दिल्ली येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक आज मुंबईत दाखल झाले.

पोलिसांच्या ताब्यातून आरोपीचे पलायन
मुंबई, ११ जून / प्रतिनिधी

शौचाला जाण्याच्या बहाण्याने एका आरोपीने व्ही. पी. रोड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आज पलायन केले. शेर मोहम्मद जमीर खान असे या आरोपीचे नाव असून ३ जून रोजी त्याला नसीम खान नावाच्या इसमाला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र शौचाला जाण्याचा बहाणा करून मोहम्मद गेला तो परत आलाच नाही. बराच वेळ तो न आल्याने पोलिसांनी त्याला शोधले. मात्र त्याने हातावर तुरी देऊन पलायन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

 

महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी